संकल्प-विकल्प धनुष्यबाण। रामाहाती दीधले।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 09:38 PM2018-12-13T21:38:03+5:302018-12-13T21:38:22+5:30

बाबांकडून अर्थ समजून घेतल्यापासून त्याच्या डोळ्यासमोर श्रीरामाची मनोमन केलेली पूजा प्रत्यक्ष उभी राही. विशेषत: श्रीरामाच्या हातात दिलेले संकल्प-विकल्पांचे धनुष्यबाण!

Resolution-option | संकल्प-विकल्प धनुष्यबाण। रामाहाती दीधले।।

संकल्प-विकल्प धनुष्यबाण। रामाहाती दीधले।।

googlenewsNext

- रमेश सप्रे 

सकाळी लवकर उठणारी मुलं ही आजकाल निर्वंश होत चाललेली प्रजाती किंवा जमात आहे. तसं लवकर उठण्याची संस्कृतीच लुप्त होऊ लागलीय म्हणा. या ना त्या कारणानं रात्री उशीरा झोपण्याची सवय अंगी बाणली गेलीय. विशेषत: मुलं नि तरुणाई ‘लवकर निजे, लवकर उठे! तथा आरोग्य सुख संपत्ती भेटे।।’ यावर विश्वास ठेवीनाशी झालीयत. अगदी पाश्चात्य मंडळीही ‘अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, मेक्स मॅन हेल्दी हॅपी अॅन्ड वाईज’ या शिकवणुकीपासून दुरावत चालली आहेत. 

..अन् म्हणूनच आनंदाचं पहाटे उठणं अनेकांच्या कौतुकाचा विषय झालं होतं. पण त्याला तसंच एक कारण होतं. आनंदाला बाबा म्हणायचे ती सद्गुरुंची काकडारती खूप आवडत असे. आता सोप्या मराठी रचनेचा अर्थ समजण्याएवढा तो मोठा झाला होता. त्याला जसाजसा अर्थ उमगत जाई तसं तसं त्या अर्थाचं चित्र, दृश्य त्याच्या डोळ्यासमोर उभं राही. त्याचं मन अगदी हरखून जाई. हेच पहा ना 

आर्त आवाजात बाबा मानसपूजेच्या ओव्या म्हणत

प्राणांचा लाविला धूप। नेत्रांचे लाविले दीप।

इच्छेची पक्वान्ने अनेक। रामासी भोजन घातले।।

इंद्रियांचा तांबूल जाण। षड्रिपूंची दक्षिणा सुवर्ण।

संकल्प-विकल्प धनुष्यबाण। रामाहाती दीधले।।

बाबांकडून अर्थ समजून घेतल्यापासून त्याच्या डोळ्यासमोर श्रीरामाची मनोमन केलेली पूजा प्रत्यक्ष उभी राही. विशेषत: श्रीरामाच्या हातात दिलेले संकल्प-विकल्पांचे धनुष्यबाण!

संकल्प म्हणजे विचार -होकारात्मक विचार आणि त्याच्या उलट, विकल्प म्हणजे नकारात्मक विचार. शिक्षक असल्यामुळे बाबांनी फार प्रभावीपणे सांगितलं होतं

‘कल्प’ म्हणजे कल्पना अन् विचार म्हणजे दोन्हीही. हे करूया, असं करूया असे सकारात्मक विचार, त्यानुसार योजना हे सारे संकल्प आपल्या मनात सतत येत राहतात. त्याच बरोबर ‘हे आता करावं की नंतर करावं, असं करावं की तसं करावं, आपण करावं की दुस-यांनी करावं, मुख्य म्हणजे करावे की न करावं?’ अशा विचारांच्या लाटा आपल्या मनात अखंड उठत असतात. त्यात नकारात्मक बाजू बहुतेकवेळा निवडली जाते नि प्रत्यक्ष काम एक तर पुढे ढकलली जातात किंवा चक्क टाळली जातात. 

अशा या संकल्प-विकल्पांना जर धनुष्यबाण बनवून ते श्रीरामाच्या हातात दिले की निश्चितपणे कामे केली जातात. मनात संशय, धाकधुक, अस्वस्थता काही उरत नाही हे चित्र दिवसातून अनेकदा वारंवार मनात उभं करायचं नि छान, आनंदात राहायचं. अशी जीवनशैली अर्थातच भावात्मक (सकारात्मक) बनून जाते. अभावात्मक राहत नाही. साहजिकच ती अधिक प्रभावी बनते. आनंदमयी, आनंददायिनी बनते, हीच तर मानसपूजेची फलश्रुती असते प्रचीती असते. 

आनंदाला संकल्प-विकल्पांची जोडी आणखी एका श्लोकात भेटे. ज्या तीन श्लोकांनी बाबांची उपासना संपायची त्यातला अखेरचा श्लोक. तो म्हणून झाल्यावर डोळे मिटून काहीवेळ शांतस्तब्ध बसायचं. हृदयमंदिरातून मनोदेवतेचा त्या प्रार्थनेला हुंकार उमटला की आनंदात उठायचं. पुढचा सारा दिवस आनंदात घालवण्याचा निर्धार करूनच. हा परिपाठ किंवा नित्यपाठ आनंद मोठय़ा आनंदात करायचा. बाबांबरोबर तोही म्हणायचा

विकल्पाचिया मंदिरी दीप नाही।

सदा शुद्ध संकल्प हे आत्मदेही।

यश:श्री सदानंद कल्याणमस्तु।

तथास्तु.. तथास्तु.. तथास्तु.. तथास्तु!

किती खरंय? सतत विचार-प्रतिविचार, उलट-सुलट विचार करणा-या व्यक्तीच्या मनोमंदिरात साधा दिवासुद्धा लागणं अवघड. तिथं कृतींचा, कार्याचा प्रकाश कुठून येणार? ‘तमसो मा ज्योतिगमय’ ही प्रार्थना केवळ शब्दांचे बुडबुडेच ठरणार. मनातला अंधार म्हणजे निराशा, उदासी, खिन्नता, विफलतेची भावना. थोडक्यात नकारात्मकता. याच्या उलट जर मनात चांगल्या विचारांचे, विधायक कल्पनांचे, मंगल कर्मसंकल्पांचे दीप प्रज्वलीत केले तर सर्वाचीच जीवन उजळू निघतील. मग काय निरंतर दिवाळीच! एकूण काय शुभ संकल्प नित्य दिवाळी अन् विकल्प ही आनंदाची राखरांगोळी. दुसरं काय?

Web Title: Resolution-option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.