अध्यात्मातून ईश्वराकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 08:27 AM2018-10-31T08:27:40+5:302018-10-31T08:36:24+5:30

‘ईश्वर’ या विश्वातील एक अदृश्य रुपी काल्पनिक भावना. या ईश्वराच्या शोधासाठी अनेक महापुरुषांनी तपश्चर्या केली.

The Power of Spirituality | अध्यात्मातून ईश्वराकडे

अध्यात्मातून ईश्वराकडे

googlenewsNext

- सचिन व्ही. काळे

‘ईश्वर’ या विश्वातील एक अदृश्य रुपी काल्पनिक भावना. या ईश्वराच्या शोधासाठी अनेक महापुरुषांनी तपश्चर्या केली. ईश्वर म्हणजे काय? तो कसा आहे? कसा दिसतो? त्याची भाषा कोणती? तो कुठे असतो? या सारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मनुष्याने प्रयत्न केला. आज ही मनुष्य ईश्वराला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तो मंदिर उभारत आहे. प्रार्थना करत आहे. ईश्वर प्रसन्न व्हावा. म्हणून वाटेल तो नवस करत आहे. त्याला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ, पूजा- पाठ, उपास - तापास, नामस्मरण, भजन, कीर्तन यासारख्या अनेक मार्गाने मनुष्य ईश्वराचा शोध घेत आहे.

एवढे असंख्य उपाय योजूनही अद्यापपर्यंत हा ईश्वररुपी आभास या विश्वात कुणालाच जाणवला नाही. दिवंगत विश्व विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या ‘ब्रीफ आॅनर्स टू द बिग कन्वेन्शन’ या पुस्तकात ‘देव हा प्रकार अस्तित्वात नाही आणि विश्वाची निर्मिती कोणीही केलेली नाही आणि कोणाचीही आपल्यावर सत्ता नाही’ असा दावा केला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास स्टीफन हॉकिन्स यांचे हे मत १०० टक्के खरे आहे.

२१ व्या शतकात ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ अशा प्रश्नांना तोंड द्यावे लागते. मग आपण ज्याची रोज पूजा, प्रार्थना करतो. तो खरंच अस्तित्वात नाही का? श्रीराम, श्री कृष्ण, बजरंगबली, देवींची अनेक रूपे यांसारखे १६ कोटी देव आले कोठून? ते कुठे असतात? कसे दिसतात? आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहचते का? आपली भाषा त्यांना समजते का? या सारख्या प्रश्नांची उत्तरे मनुष्यास सापडत नाहीत. अनेक चित्रांमधून, मूर्तींमधून घडणारे त्यांचे दर्शन. हेच का त्यांचे खरे रूप? या सारख्या प्रश्नाचे उत्तर मनुष्यास सापडत नाही.

या १६ कोटी देवी- देवतांची आपण आराधना करतो. त्यांना प्रसन्न करण्यासाठी वाटेल ते उपाय करतो. संकटाच्या काळात दुख:च्या भवसागरात आपण बुडालेलो असताना आपणास आधार असतो तो या अदृश्य, अमूर्त, आभासी, ईश्वराचा. या संकटातून तोच आपल्याला बाहेर काढू शकतो हा दुर्दम्य विश्वास या अमूर्त स्वरूपी ईश्वरावर आपण ठेवत असतो. मग या संकटातून बाहेर पडण्यासाठी सुरु होते ईश्वराची आराधना. केले जातात या ईश्वराला नवस. हे नवस काहीचे पूर्ण होतात. तर काहीचे अर्धवट राहतात. परंतू संकटाच्या दरम्यानच्या काळात निघून गेलेला असतो तो काळ. काळ लोटला की; प्रश्न सुटलेला असतो किंवा त्यामुळे झालेला त्रास कमी झालेला असतो. हे सर्व होत असताना नवस फेडून ही ईश्वर मात्र भेटलेला नसतो.

मग खरंच ईश्वर या विश्वात अस्तित्वात नाही का? असेल तर तो नवस फेडल्यानंतर दर्शन का देत नाही ? या कोड्याचे उत्तर मात्र सापडत नाही. काहीजण ईश्वराचे अस्तित्व मानतात. त्यांना आपण आस्तिक संबोधतो. जे मानत नाहीत ते नास्तिक. नास्तिक असणारे आस्तिकांना ईश्वर असण्याचा पुरावा मागतात. सुरु होतात मग वाद विवाद, चर्चा. यातून मांडला जोतो तो ईश्वराचा बाजार आणि होत असते अस्तिकांच्या श्रद्धेची हेळसांड. अस्तिकांना ईश्वर असण्याचा पुरावा सादर करता येत नाही. नास्तिकांचे यामुळे चांगलेच फोफावते. यात कुरघोडी करून जातात ते नास्तिक.

मग अनादी काळापासून ऐकत आलेले रामायण, महाभारत यासारखे अनेक ग्रंथ, पुराण यातील १६ कोटी ईश्वरांवर विश्वास ठेवायचा की नाही. ज्याची आपण नित्य नियमाने पूजा अर्चना करतो. तो जर अस्तित्वातच नसेल. तर हे सर्व करून काय फायदा? ज्या ईश्वराची आपण रोज प्रार्थना करतो. ज्याला आपण रोज काहीना काही मागतो. मनातल्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, आनंद दुख: सांगतो. तो खरंच आपले हे मनातील मूर्त- अमूर्त विचार जाणतो का? पोहचतात का आपल्या सर्व भावना त्यांच्यापर्यंत? यासारख्या प्रश्नांची उत्तरे सापडतात ती अध्यात्मात. काय आहे अध्यात्म? अध्यात्म म्हणजे व्यक्तीच्या अचेतन मनाचा शोध घेणे. व्यक्तीच्या दु:खाचे कारण शोधून त्यावर नियंत्रण मिळवणे. मनातील सर्व नकारात्मक उर्जा काढून टाकून. सकारात्मक उर्जा मिळवणे. ही सकारात्मक उर्जा प्राप्त करण्यासाठी भक्तीचा अवलंब करणे. प्रार्थनेतून चिरकाल दु:खापासून मुक्ती मिळवणे. सदैव आनंद्नुभूती प्राप्त करणे म्हणजे ईश्वराचा शोध घेणे. म्हणजेच व्यक्तीच्या अमूर्त मनापर्यंत पोहोचणे.

म्हणजेच जी व्यक्ती अमूर्त मनाजवळ पोहचते. त्या व्यक्तीला ईश्वर प्राप्ती होते. स्वत: च्या मनात असणाऱ्या ईश्वराच्या निर्विकार रूपाचे दर्शन होणे. आजच्या या भौतिक युगात या अमूर्त मनापर्यंत जायला वेळ तरी आहे का कुणाला ? अमूर्त रुपी स्वत:च्या मनात असणाऱ्या ईश्वराचा बोध होणे म्हणजे अध्यात्म. हे जाणून घेणे जमतंय का कुणाला? ईश्वराला हात जोडणे. त्याची प्रार्थना करणे. त्याच्यासाठी उपास-तापास, प्रार्थना अशा गोष्टी करणे म्हणजे मन शुद्ध करून स्वत:च्या अमूर्त मनापर्यंत पोहोचणे. त्यासाठी अध्यात्माच्या साह्याने हातून सकारात्मक गोष्टी घडाव्यात. या हातांनी कुठले ही काम चांगलेच करावे. म्हणून प्रार्थनेच्या वेळेस हात जोडलेले व हृदयाजवळ असतात. हृदय हातांना सत्कमार्ची आठवण प्रार्थनेच्या वेळी करून देत असतात. व्यक्तीच्या हाताने सत्कार्य झाले की, त्यास आत्मिक आनंद होत असतो. हा आत्मिक आनंद म्हणजे ईश्वर नाही का ? मानत असणाऱ्या वेगवेगळ्या भावना. मानतात असणारे दु:खाचे डोंगर. यावर सत्कायार्तून विजय मिळवणे. म्हणजे आनंदानुभूती प्राप्त करणे.

अमूर्त मनाचा आविष्कार व्यक्तीस प्राप्त होणे. म्हणजेच ईश्वर प्राप्ती होय. भगवान श्रीराम, श्री कृष्ण यांना आपण ईश्वर मानतो. मानवी रुपात त्यांनी व्यक्तीला सत्य- असत्य, निती- अनिती यांची ओळख करून दिली. सत्याच्या मार्गावर कसे चालावे. हे श्रीरामाने आपल्या कार्यातून मनुष्यास ज्ञान दिले. श्री कृष्णाने भगवत गीतेतून निती- अनिती याची ओळख करून दिली. व्यक्तीमध्ये असणाऱ्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे. हे आपणास श्री कृष्णाने भगवत गीतेत सांगितले. प्रत्येक व्यक्ती माझाच अंश आहे. हे सांगताना श्री कृष्णाचे आपणास हेच सांगणे आहे की, व्यक्तीने स्वत:मधील वाईट प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवून आपल्या हातून सत्कार्य करून आत्मिक आनंद प्राप्त करणे. हा आत्मिक आनंद म्हणजेच ईश्वर होय. हाच व्यक्तीचा अमूर्त आत्मा होय. या अमूर्त आत्म्यापर्यंत पोहोचणे म्हणजेच ईश्वर प्राप्ती होय.

त्यासाठी उपास- तापास, नवस करण्याची गरज नाही. हे जरी सत्य असले तरी व्यक्तीला विविध भावनांवर नियंत्रण ठेवणे सोपे नसते.
या सर्व भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. उपास - तापास, प्रार्थना, पूजाअर्चा, नवस या मार्गांनी या भावनांवर नियंत्रण व्यक्तीने ठेवावे. हा या मागचा उद्देश असतो. त्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात. ज्यावेळेस व्यक्ती या सर्व भावनांवर नियंत्रण ठेवेल. त्यावेळेस त्याला स्वत: मधील ईश्वराची प्राप्ती झालेली असेल. आत्मिक सुख, आनंद, समाधान. म्हणजेच ईश्वर प्राप्ती होय.

जो व्यक्ती मनातील सर्व भावनांवर नियंत्रण ठेवू शकेल. त्या व्यक्तीला ईश्वर प्राप्त होईल. ईश्वर दुसरे-तिसरे काही नसून व्यक्तीचे अचेतन मन होय. या अचेतन मनापर्यंत पोहचायचे असेल तर व्यक्तीस भौतिक सुखांचा त्याग करावा लागेल. हे सर्व भौतिक सुख व्यक्तीच्या दु:खाचे मूळ कारण आहे. हे भगवान श्रीकृष्ण आणि गौतम बुद्धांनी सांगितले. या सर्व गोष्टीचा त्याग केल्यावर व्यक्तीस स्वत:च्या अमूर्त मनापर्यंत जाता येते. या मनापर्यंत पोहोचणे म्हणजेच ईश्वर प्राप्ती होय.

या अमूर्त मनाला होणारे समाधान, आनंद म्हणजेच ईश्वर होय. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम या सारख्या संतांनी व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा, राग, लोभ , वासना यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भक्तीचा मार्ग समस्त मानव जातीस सांगितला. ईश्वर दुसरे तिसरे काही नसून आपले अमूर्त, अचेतन मन होय. या अमूर्त मनाची रूपे आपण ईश्वरात पाहत आहोत. व्यक्तीच्या अमूर्त मानत असणाºया १६ कोटी विचारांनी ईश्वराची १६ कोटी रूपे तयार केली आहेत. या ईश्वरापर्यंत व्यक्तीस पोहचायचे असल्यास व्यक्तीस सर्व भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. तेव्हाच त्याला अमूर्त रुपी मानत ईश्वर प्राप्ती होईल. या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र म्हणजे अध्यात्म होय. या तंत्राने स्वत:तील ईश्वराचा अविष्कार प्रत्येकास नक्कीच होईल.

 

Web Title: The Power of Spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.