कुछ तो लोग कहेंगे..!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 09:05 PM2019-01-05T21:05:37+5:302019-01-05T21:08:05+5:30

आपण शीलपालन-नैतिकता जपत आपली सर्व कर्तव्ये-मनुष्यधर्म व्यवस्थित पार पाडत आहोत ना, हे अंर्तमनाने जाणा व समाज काय म्हणेल, म्हणून स्वत:ला मानसिक त्रास करून घेऊ नका. वर्तमानात सत्कर्म करून भविष्य उज्ज्वल करणे हे मात्र आपल्या हातात असते.

people will always criticize you | कुछ तो लोग कहेंगे..!

कुछ तो लोग कहेंगे..!

Next

डॉ. दत्ता कोहिनकर
अशोक व मुक्ता कर्तव्यदक्ष, प्रेमळ, नीतिमान दाम्पत्य. मुक्ता अशोकला विनवणी करून ध्यान केंद्रात घेऊन आली होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अशोकला आलेले नैराश्य व त्याची कारणे लक्षात आली. अशोक सरकारी अधिकारी, कामात अत्यंत चोख व नीतिमान असल्याने महाराष्ट्र शासनातर्फे त्याचा गौरव झाला होता. घर, पैसा, आरोग्य, सुबत्ता, सामाजिक प्रतिष्ठा सर्व काही सुरळीत चालले होते. मुलामुलींना चांगल्या शाळेत टाकून उत्तम संस्कार केले जात होते. पण, दहावीनंतर मुलाने अचानक गाड्या चोरणे, मारामाऱ्या करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे चालू केले. बऱ्याचदा चोरीच्या प्रकरणात वर्तमानपत्रात त्याच्या ठळक बातम्या, चौकीवरचे बोलावणे, कोर्टकचेरी यांमुळे अशोक खूपच खचला होता. समाजात सगळीकडे अवहेलना व नातेवाईक काय म्हणत असतील? या विचाराने त्याला नैराश्य आले. त्यातच एकुलत्या एका मुलीच्या प्रेमप्रकरणाची वार्ता त्याच्या कानी आली. समाजात कसं तोंड दाखवू? लोक काय म्हणतील? या नकारात्मक भावनांशी पुन:पुन्हा समरस होत तो नकारात्मक तरंगांशी कनेक्ट होऊन उदासी, बेचैनी व नैराश्यात जायचा. खरोखर मित्रांनो, म्हणतात ना ‘सबसे बडा रोग - क्या कहेंगे लोग।’ माणूस समाजाला खूपच भीत असतो. अशोकशी झालेल्या चर्चेनंतर त्याने मुलगा व मुलगी यांच्याप्रति वडील या नात्याने असलेली कर्तव्ये पूर्णत: व्यवस्थित पार पाडली होती. त्यात तसूभरही कमी केले नव्हते. चांगल्या संस्कारांची पेरणी त्या दोहोंनी मुलांवर भरपूर केली होती; पण बी दगडावर पडल्याने त्याला अंकुर फुटत नव्हता. काही वेळा आपण सर्व काही प्रयत्न करूनही अपेक्षित गोष्टी घडत नाहीत व सहजपणे अनपेक्षित गोष्टी घडतात. येथे कर्मफल सिद्धांताचे समीकरण जुळते. 

अशोकच्या कर्मफल सिद्धांतानुसार पालक म्हणून सर्व कर्तव्ये पूर्ण करीत असतानादेखील अशा प्रकारे मुलाने वर्तणूक करून बदनामी केली, या कृतीला आपल्याच कर्माचे फळ म्हणून सहजपणे स्वीकारण्याचे व स्वत:ची हानी न करून घेण्याचे मर्म चर्चेतून अशोकला उमगले आणि मनाची सबलता व निर्मलता वाढविण्यासाठी तो शिबिरास बसायला तयार झाला. प्रारब्धानुसार स्त्री-पुत्र-नातलग एकच येतात. सुख-दु:खे देतात, ॠणानुबंध संपले की विभक्त होतात. काही वर्षांपूर्वी कोकणात अतिवृष्टी झाली, तेव्हा करोडपती सरकारी भोजनाच्या रांगेत उभे होते. संजय गांधी, प्रमोद महाजन यांचा किती अचानक अंत झाला. या जगात सर्व काही आपल्या कर्मानेच घडते. अंबाने श्रीखंडीचा जन्म घेतला तो भीष्मांना मारण्यासाठीच. आई-वडिलांमुळे रामाला वनवासात जावे लागले. अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकला, की लक्षात येते, आपण आपली कर्तव्ये मनापासून- नीतीने पार पाडायची. बाकी सर्व कर्माच्या गतीवर अवलंबून असते. त्यामुळे हे माझ्याच गतकर्माचे फळ-त्याचा विपाक आनंदाने स्वीकारून मनाची समता ठेवायची व दुष्कर्म व स्वत:ची हानी टाळायची. 
लोक काय म्हणतील, यावर जास्त विचारमंथन न करता आनंदी राहायचे. गौतम बुद्ध म्हणाले, ‘ज्याची निंदा व अवहेलना होत नाही असा कोणीही सापडणे शक्य नाही.’ म्हणून निंदेला- अवहेलनेला घाबरू नका, आपण शीलपालन-नैतिकता जपत आपली सर्व कर्तव्ये-मनुष्यधर्म व्यवस्थित पार पाडत आहोत ना, हे अंर्तमनाने जाणा व समाज काय म्हणेल, म्हणून स्वत:ला मानसिक त्रास करून घेऊ नका. वर्तमानात सत्कर्म करून भविष्य उज्ज्वल करणे हे मात्र आपल्या हातात असते. भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वर्तमानकाळात शील-समाधी-प्रज्ञा (यम-नियम)चा अभ्यास करा. शेवटी निंदा करणे हा एक मनुष्यस्वभावच असतो.

‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार कि बाते- कही बीत न जाये रैना।’                

   (लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत.)

Web Title: people will always criticize you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.