आनंदाच्या अनेक मार्गापैकी एक कृतज्ञतेतून जातो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 07:24 PM2019-02-16T19:24:26+5:302019-02-16T19:24:37+5:30

एक अजिंक्य, अभेद्य असा किल्ला. त्याच्या सर्व बाजूंनी खोल खणलेला, पाण्यानं भरलेला नि मगर सुसरींचा सुळसुळाट असलेला चर (खड्डा).

One of the many ways of happiness is through gratitude | आनंदाच्या अनेक मार्गापैकी एक कृतज्ञतेतून जातो

आनंदाच्या अनेक मार्गापैकी एक कृतज्ञतेतून जातो

Next

- रमेश सप्रे

एक अजिंक्य, अभेद्य असा किल्ला. त्याच्या सर्व बाजूंनी खोल खणलेला, पाण्यानं भरलेला नि मगर सुसरींचा सुळसुळाट असलेला चर (खड्डा). वरती सर्व दिशांनी संपूर्ण किल्ल्याला घेरणारी भरभक्कम तटबंदी. जागोजागी बुरूज. टेहळणी करण्यासाठी, शत्रू सैन्यावर वरून आक्रमण करण्यासाठी तोफा असलेली विवरं. एकूण हा किल्ला जिंकणं जवळ जवळ अशक्यच होतं. आत प्रवेश करण्यासाठी जे द्वार होतं ते जाड लाकडाचं अन् बाहेरच्या बाजूला लांबसरळ टोकदार खिळे बसवलेलं. 

शेजारच्या राज्याचा जो राजा होता त्याला आव्हानं स्वीकारण्याची जबरदस्त ओढ होती. हा किल्ला आपण जिंकायचाच असा निर्धार करून तो तयारीला लागला. प्रधानमंत्री, राजपुरोहित, सेनापती सा-यांशी सल्लामसलत करून एक पक्की योजना तयार केली. ती अशी होती- एक अत्यंत मजबूत, रुंद, जाड नि किल्ल्याभोवतीच्या चरावर पुलासारखी बसेल एवढी फळी तयार करायची. सर्वप्रथम राज्यातील युद्धपटू हत्तीला वेगानं धावत येऊन त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला धडका देऊन ते मोडून पाडायचं नंतर सगळ्या सैन्यानं आत जाऊन लढाईत पराक्रम गाजवून विजय संपादन करायचा. तशी योजना सरळ सोपी वाटत होती. कारण या राजाकडे खूप सैनिक, घोडदळ, गजदळ, उंटदळ यांच्या जोडीला शूर सैनिकांचं मोठं पायदळही होतं. 

योजनेनुसार ती अजस्र फळी टाकून किल्ल्यापर्यंत पोचण्यासाठी पूल तयार करण्यात आला. आधीच तयार केलेल्या नि धडक मारून भरभक्कम दरवाजे तोडण्याचा अनुभव असलेला हत्ती दौडत आला; पण दारावरचे लांब, अणकुचीदार खिळे पाहून बिचकला. घाबरला, थबकला नि मागे वळला. असं चार पाच वेळा झाल्यावर एकाला एक युक्ती सुचली. त्यानुसार असं ठरलं की एका उंटाला त्या खिळ्यावर बांधायचं नि हत्तीनं त्या उंटाला जोरात धडक देऊन तो बुलंद दरवाजा पाडायचा. एका मोठय़ा उंटाला त्या खिळ्यांना बांधलं नि हत्तीला दौडत आणला आता हत्ती बिचकला नाही कारण खिळ्याऐवजी त्याला उंट दिसत होता. दोन चार धडका दिल्यावर ते प्रवेशद्वार कोसळलं. तिथंच पडलं.

प्रवेशद्वारातून सारं सैन्य आत घुसलं, किल्ल्यावरच्या सैनिकांनीही कडवा प्रतिकार केला; पण अखेर विजय या राजाचाच झाला. त्या राजासह, सेनापती, अनेक सरदार सर्वाना लढाईत ठार मारलं गेलं. राजानं या नव्यानं जिंकलेल्या किल्ल्यावर तीन दिवस विजयोत्सव साजरा करण्याचं फर्मान काढलं. सगळी विजयवाद्य वाजत होती. नव्यानं जिंकलेल्या किल्ल्यावर रोषणाई केली गेली. मदिरेचा अखंड प्रवाह वाहत होता. सारे कसे मुक्त होऊन इकडून तिकडे आपल्यामुळेच विजय मिळाला या थाटात वावरत होते. 

इतक्यात वा-याच्या झोताबरोबर प्रचंड दुर्गंधी सगळीकडे पसरू लागली. इतकी की तिच्यापुढे अत्तर, फुलं याचा सुगंध फिका पडला. कोठून येतो हा दुर्गंध म्हणून शोध घेऊ लागल्यावर किल्ल्याच्या पडलेल्या दारावर बांधलेला जो उंट हत्तीच्या धडकांमुळे खिळ्यात घुसून मेला होता त्याचा मृतदेह कुजल्यामुळे तो घाण वास हवेत भरून राहिला होता. सर्वजण एका सुरात म्हणाले, ‘या उंटाला आता नि इथंच मरायला काय झालं होतं?’ दुर्दैवानं या उंटामुळेच विजय शक्य झाला होता. तो खिळ्यावर बांधलेला होता म्हणून तर हत्ती ते प्रवेशद्वार पाडू शकला होता आणि त्यामुळेच सैन्याचा प्रवेश किल्ल्याच्या आत शक्य झाला होता नि विजय प्राप्त झाला होता. उंटाचं आत्मबलिदान सर्वच विसरले होते. 

राजाच्या कानावर ज्यावेळी ही वार्ता पोचली तेव्हा त्याचीही पहिली प्रतिक्रिया अशीच होती. एक मोठ्ठा खड्डा खणून त्यात त्या उंटाला पुरून टाका. सुगंधी द्रव्याच्या फवा-यानं सारा परिसर सुगंधीत करा. विजयोत्सवाच्या सुखाचा उंटानं रसभंग केला. याचं राजाला खूप वाईट वाटलं; पण आता सारं सुरळीत पार पडेल याचा त्याला विश्वास होता. इतक्यात त्याचे सद्गुरू तिथं आले. आपल्या शिष्याचं अभिनंदन करण्यसाठी ते किल्ल्यावर पोचले होते. राजानं यथोचित स्वागत, आदर सत्कार केला. नंतर त्या उंटाचा विषय निघालाच.

गुरुदेव संतापले, शिष्यराजाला उद्देशून म्हणाले, ‘राजन, या विजयाचा खरा शिल्पकार तो उंटच आहे. आपले प्राण देऊन त्यानं विजयाचा मार्ग मोकळा केला. तेव्हा त्याचं प्रेत मोकळ्या मैदानावर प्रवेशद्वाराशेजारी जाळा. त्याचा मंत्रपूर्वक अग्निसंस्कार करा. त्या दहनभूमीवर चौथरा उभारून त्याच्यावर पंचधातूची त्या उंटाची मूर्ती तयार करा. त्या स्मारकाला सर्वानी मानवंदना द्यायला हवी. त्या उंटाच्या समाधीवर लिहा. ‘विजयाच्या आनंदाचा खरा शिल्पकार.’  असं केल्यावर सर्वाना खूप आनंद झाला. कारण उंटाच्या त्यागाबद्दल सर्वानी कृतज्ञता व्यक्त केली होती. आनंदाच्या असंख्य मार्गापैकी एक मार्ग कृतज्ञतेतून जातो हे मात्र खरं!

Web Title: One of the many ways of happiness is through gratitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.