निवृत्तीसाठी सोपान हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:23 AM2018-07-10T00:23:06+5:302018-07-10T00:28:20+5:30

. Need to step for retirement. - Dindi walking | निवृत्तीसाठी सोपान हवाच

निवृत्तीसाठी सोपान हवाच

Next

- इंद्रजित देशमुख
कालचा दिवे घाटाचा अवघड टप्पा पार केल्यानंतर माउली आज दिवसभर सोपानकाकांच्या सासवड नगरीत विसावणार आहेत. तर तुकोबाराय आज लोणीकाळभोरहून निघून ऊरळीकांचनमार्गे यवत मुक्कामी विसावणार आहेत.
आज सासवड नगरीत माउली आणि सोबतचे वैष्णव सोपानकाकांशी जणू भक्तीप्रेमाचं सुख आणि त्याची अनुभूती याबाबत हितगुज करणार आहेत. मी ऐकलेली एक लाघवी गोष्ट अशी आहे की, या चारही लहान भावंडांना आणि त्यांच्या आई-वडिलांना समाज खूप त्रास देत होता. अगदी हीन दर्जाची वागणूक या सहा दिव्य जिवांना मिळत होती. आळंदीत सिद्धबेटावरील चंद्रमौळी झोपडीत हे सर्वजण सहन करीत रहात होते. या सगळ्यातून थोडातरी विसावा मिळावा म्हणून विठ्ठलपंतांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायचे ठरविले आणि अनवाणी पायाने जगाच्या पायाखाली फुलांचे अंथरून पसरू पाहणारी ही मंडळी प्रवास करऊ लागली. आग ओकणारा सूर्य डोक्यावर घेत पोटात दीर्घ भुकेच्या अस्तित्वाला धारण करत या साऱ्या दु:खाला ओठाच्या आत लपवत तो खडतर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा प्रवास सुरू होता. या प्रवासात सोपानकाकांचे पाय उन्हाने पोळू लागले. पाय खूपच पोळत होते तरी कसलीच तक्रार न करणाºया सोपानकाकांची ही वेदना निवृत्तीनाथदादांना जाणवली. सोपानकाकांना स्वत:च्या पाठीवर घेऊन ते चालू लागले. या प्रसंगातील लक्षार्थ आम्हाला असं सूचवितो की, निवृत्तीसाठी सोपान असावाच लागतो. तरच आम्हाला हा भवसागरविषयक फेरा निर्वेधपणे पार पाडता येतो. आणि निवृत्त होता येतं. या दोघांचा समन्वय नसेल तर आम्हाला प्रवृत्ती आणि आवृत्ती यातच अडकावं लागतं. इथं निवृत्त होणं याचा अर्थ ‘सकळ सांडुनि वना गेला’ असं नाही, तर वारकरी परंपरेनुसार ‘मी’ आणि ‘माझी’ ऐसी आठवण अंत:करणातून काढून टाकून
‘मने वाचा देहे । जैसा जो व्यापारू होये ।।
तो मी करितु आहे । ऐसे न म्हणा ।।
अशा भूमिकेत राहणे होय. पण हे कधी जमू शकते; सोपान सोबत असतील तरच. सोपानदेव म्हणजे सोपेपणाने परमार्थ कसा साधावा, याचा निरंतर वस्तुपाठ. साधेपणाच्या साधनेबद्दल सोपानकाका सांगतात -
‘आणिक ऐके गा दुता।
जेथे रामनाम कथा।
तेथे करद्वय जोडोनि हनुमंता ।
सदा सन्मुख असिजे ।।
रामनामी चाले घोषु ।
तो धन्य देशु धन्य दिवसु ।।
प्रेमकला महाउल्हासु ।
जगलीवासु विनवितुसे ।।
दिंड्या पताका टाळ घोळ नामे सुरंग ।
तेथे आपण पांडुरंग भक्तासंगे नाचत ।।
तया भक्ता तिष्ठती मुक्ती ।
पुरुषार्थ तरी नामे किर्ती ।।
रामनामी तया तृप्ती।
ऐसे त्रिजगती यमु सांगतु।।
जिथं रामनामकथा घोष सुरू असतो. तिथे भक्त शिरोमणी हनुमंतराय हात जोडून उभे असतात. ज्या देशात, ज्या दिवशी हा घोष सुरू असतो तो देश आणि तो दिवस प्रेमाने भारलेला असतो. आनंदाचा उत्सव साजरा करतो. हा परमार्थ साधा आहे. कारण इथे दिंड्या पताका, टाळ, मृदंग आणि नामाच्या समवेत स्वत: देव नाचत असतो. इतर साधनेत नाना खटपटी असतात आणि मुक्तीसाठी तिष्ठत उभं रहावे लागते. वारकरी संप्रदाय हा मुक्तीला कधीच परमप्रयोजन म्हणून स्वीकारत नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, ‘न लगे मुक्ती’ पुरुषार्थ, किर्ती आणि तृप्ती यासाठी सामान्यांना खूप धडपडावं लागतं. तरीही त्याच्या प्राप्तीची खात्री नसते. इथं मात्र ही दिसायला सामान्य असणारी मात्र अनुभूतीने परमोच्च असणारी ही साधना करणाºया वारकºयांसाठी पुरुषार्थ, किर्ती आणि तृप्ती तिष्ठत असतात.
मुळातच ‘सकलांसी येथे आहे अधिकार’ अशा सर्व उपयोगी असणाºया सुखसाधनेचा अंगीकार केल्यानंतर
ज्या नामे शंकर निवाला ।
गणिका अजामेळ पद पावला ।
अहिल्याचा शाप दग्धजाला ।
तोचि पान्हा दिधला पांडुरंगे ।।
ज्या साधनाने भगवान शंकर शांत झाले. गणिका आजा मेळे यांना उत्तम परमार्थिक पदाची प्राप्ती झाली. शापामुळे अहिल्येच्या जीवनात आलेली व्यथा संपली आणि ती दिव्य झाली.
हे सर्व पटवून सांगताना ‘हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा’ या माउली ज्ञानेश्वरांच्या वचनानेच समर्थन करतात. सासवडनगरी सोडताना धाकल्याचा निरोप घेऊन पुढील वाट चालताना पाऊले जड होऊनच पुढे सरकतील, हे मात्र निश्चित !
‘तुका म्हणे हे तो आहे तया ठावे ।
जिही एक्या भावे जाणितले ।।

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

 

Web Title: . Need to step for retirement. - Dindi walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.