आठवी माळ : दिव्यशक्ती म्हणजे आदिमाया जगदंबा दुर्गाभवानी देवी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 09:20 AM2018-10-17T09:20:51+5:302018-10-17T09:25:02+5:30

Navratri 2018 : आधुनिक संदर्भात सप्तशती या प्राचीन ग्रंथाचा विचार करता असे लक्षात येते की, प्राचीन काळात मनुष्याच्या ज्या वृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव दोष होते त्याचेच परिवर्तित स्वरूप आजच्या काळातही थोड्याफार वेगळ्या रूपाने दिसून येते.

navratri 2018 shardhiy navaratrotsav goddess worshiped eighth day | आठवी माळ : दिव्यशक्ती म्हणजे आदिमाया जगदंबा दुर्गाभवानी देवी

आठवी माळ : दिव्यशक्ती म्हणजे आदिमाया जगदंबा दुर्गाभवानी देवी

Next

- प्रा. अशोक झाल्टे शास्त्री, उंडणगावकर

ॐनम: चण्डिकायै

श्री दुर्गा सप्तशती आधुनिक संदर्भात

आधुनिक संदर्भात सप्तशती या प्राचीन ग्रंथाचा विचार करता असे लक्षात येते की, प्राचीन काळात मनुष्याच्या ज्या वृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव दोष होते त्याचेच परिवर्तित स्वरूप आजच्या काळातही थोड्याफार वेगळ्या रूपाने दिसून येते. देव-दानवांचा हा संग्राम सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा संग्राम होता. सप्तशतीत एकूण १३ अध्याय आहेत. या १३ अध्यायांमधून ज्या कथा आलेल्या आहेत त्या बहुतांशी उन्मत्त आणि क्रूर असे सत्ताधीश, जुलमी हुकूमशहा, साठेबाज आणि धनशोषक, विघातक, नास्तिक, अहंकारी प्रवृत्तींच्या राक्षसांच्या आहेत. या असुरी प्रवृत्तींच्या नाशासाठी समाजरूपी पुरुष म्हणजे विष्णूने निद्राधीनता सोडून जागे होणे आवश्यक आहे. जर समाजपुरुष जागा झाला, तर हा भ्रष्टाचार, सत्तांधता, जुलूम, अन्याय, अत्याचार, साठेबाजी, नफेखोरी, विघातकता यांना आळा बसू शकेल. म्हणून समूह शक्तीतून निर्माण झालेली दिव्यशक्तीच या असुरी प्रवृत्तींचा नायनाट करील. स्वर्गातील सर्व पराभूत देवांच्या आणि ब्रह्मा-विष्णू-महेशाच्या तेजातून क्रोधाने एक दिव्यशक्ती निर्माण होते. तीच दिव्यशक्ती म्हणजे आदिमाया जगदंबा दुर्गाभवानी देवी. आपण या देवीचा उद्भव आणि विकास पाहूया.

सप्तशतीच्या पहिल्या अध्यायात सुरथ राजा आणि वैश्यवाणी यांची कथा आहे. राजाच्या राज्यावर शत्रूने आक्रमण करून फितूर मंत्र्याच्या कारस्थानामुळे प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा दयाळू, शूर आणि युद्धकुशल राजा सुरथ हा कोल राजाच्या छोट्या सैन्यदलापुढे पराभूत होतो. त्यामुळे दुर्बल झालेल्या सुरथाला मंत्रीगणांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी राजधानीतून हुसकावून सत्ताभ्रष्ट केले. सुरथाचे सर्व मंत्री आणि अधिकारी शत्रूला आतून सामील झालेले असतील, त्याच्या परिणामी राजा सुरथ आपल्या राज्यातून जिवाच्या भीतीने जंगलात पळून गेला. जंगलात हा राजा सुमेधा ऋषींच्या आश्रमात जातो. आपला पूर्वीचा वैभवशाली काळ आठवून त्याचे चित्त व्याकूळ होते. त्याचवेळी त्या आश्रमात समाधी नावाचा एक वैश्य व्यापारीही अत्यंत दु:खी अवस्थेत येतो. समाधीच्या धनलोभी स्त्री-पुत्रांनी त्याचे सर्व धन हिरावून घेऊन त्याला हाकलून दिलेले असते. तरीही राजाप्रमाणेच त्याचे चित्त बायको-मुलांतच अडकलेले असते. दोघेही फसवले गेलेले असल्यामुळे समदु:खी असतात. या दोघांनी आपली व्यथा ऋषींना सांगितली. ते म्हणतात की, ज्यांनी आमची लुबाडणूक करून आम्हाला घराबाहेर काढले त्यांच्याचविषयीच्या प्रेमाने आम्ही व्यथित आहोत, याला काय म्हणावे? मनाची दुर्बलता की प्रेमाचा आंधळेपणा? आणि सुमेधा ऋषी त्यांच्या शंकांचे समाधान करताना त्यांना निसर्ग नियम आणि मनुष्य प्रवृत्तीचे निरूपण करतात. पशू-पक्षी आपल्या पिलांवर निसर्गत:च निरपेक्ष प्रेम करीत असतात; परंतु मनुष्य सर्व काही लोभाने, फायद्याच्या अपेक्षेने कुटुंबावर प्रेम करीत असतो, म्हणून तुमचे दु:ख अपेक्षाभंगाचे आहे. आसक्ती आणि मोहामुळे हे घडते आणि हे घडविणारी शक्ती म्हणजे महामाया. तिचा हा प्रभाव म्हणून या जगरहाटीचा खेद मानू नका. प्रत्यक्ष ईश्वरालासुद्धा ही माया योगनिद्रा आणते. चांगल्या आणि शहाण्या ज्ञानवंतांची बुद्धी फिरवणारी ही महामायाच आहे. यासंबंधीचा श्लोक असा ‘ज्ञानिनापि चेतांसि देवी भगवती हिसा। बलादप्त कृष्य मोहाय महामाया प्रयच्छति।’

त्यानंतर सुरथ राजा या मायेचे तत्त्व काय आहे, ही कशी उत्पन्न झाली, हिचे सृष्टीतले काम काय, आदी प्रश्न ऋषीला विचारतात आणि ऋषी त्यांचे समाधान करू लागतात. विस्तारभ्रमास्तव हे सर्व निरूपण येथे करता येणे शक्य नसल्यामुळे संक्षेपाने हे कथन मी करीत आहे. जिज्ञासूने मुळात जाऊन ते जाणून घ्यावे.

परमेश्वराच्या इच्छेनुरूप सृष्टी निर्माण करून जी शक्ती ती चालविते तिला माया म्हणतात. ईश्वराने जग निर्माण केले; परंतु तो कुठे दिसत नाही. म्हणूनच तो झोपला आहे, असे म्हटले जाते. सप्तशतीतल्या कथा आधुनिक काळाशी साधर्म्य दाखविणाऱ्या वाटतात. कारण आज समाजपुरुष झोपलेलाच आहे. धनशोषण, साठेबाजी, भ्रष्टाचार, सत्तेतून येणारा अहंकार आणि मुजोरी, जाणीवपूर्वक समाजात पाडली जाणारी फूट, धर्माच्या नावाखाली चाललेला अतिरेकी धार्मिक उन्माद समाजाच्या स्थैर्याला घातक होत चाललाय. राक्षसी प्रवृत्तीचे पीक फोफावतेय. त्यामुळे सर्व नाशाची भीती निर्माण होत आहे. सप्तशतीमध्येही राक्षसी प्रवृत्ती मधू आणि कैटभ नावाच्या राक्षसामुळे निर्माण झाली आणि या राक्षसांनी हाहाकार माजवला. ते प्रबळ झाले तेव्हा विधात्याला त्यांची भीती वाटू लागली; परंतु भगवान विष्णू तर निद्रिस्त होते. समाजपुरुषच जर झोपी गेला, तर कसे व्हावे? म्हणून जगचालिका मायादेवीची ब्रह्मदेव प्रार्थना करतात. ही प्रार्थना सप्तशतीच्या पहिल्या अध्यायात असून, तिला रात्री सूक्तम, असे नाव आहे. या सूक्ताचा प्रारंभ बघा- ‘ॐ विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिति संहार कारिणीम। निद्रां भगवती विष्णोरतुलां तेजस: प्रभु: ब्रह्मोवाच-त्वंस्वाह: त्वं स्वधो त्वं हि वषट्कार: स्वरात्मिका। सुधा त्वमक्षरे नित्येत्रिधा मात्रात्मिका स्थिता। त्वैयत ध्दार्यते विश्वं त्वयैतत्सृजतेजगत त्वयैतत्पाल्यते देवि त्वमत्सयन्तेच सर्वदा।’

महामायेचे हे वर्णन आहे. अर्थ असा- हे देवी तू या विश्वाची अधिष्ठात्री देवता आहेस. या जगाला धारण करणारी, पालन-पोषण करणारी आणि संहारकर्ती आहेस. हे देवी तू स्वाहा, स्वधा असून, जीवनदायिनी सुधाही आहेस. ॐकार रूपात तू स्थिर आहेस. विश्वाची धारणकर्ती, सृजनकर्ती तूच आहेस. त्याचप्रमाणे जगाचे पालन-पोषणही तूच करतेस आणि कल्यांत समयीची संहारशक्तीही तूच आहेस. पंधरा श्लोकांचे हे रात्री सूक्त आहे. निद्रिस्त विष्णूला जागे करण्यासाठीची ब्रह्म देवांची प्रार्थना आहे.
 

Web Title: navratri 2018 shardhiy navaratrotsav goddess worshiped eighth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.