- डॉ. रामचंद्र देखणे

आध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ जरी नवरात्राशी जोडले असले तरी प्राचीन काळापासून भारतात नांदणा-या कृषिप्रधान संस्कृतीतील तो एक कृषी लोकोत्सव आहे. घटस्थापनेच्या दिवशी एका परडीमध्ये आपल्या शिवारातील वावराची माती टाकून त्यात विविध प्रकारचे धान्य टाकले जाते. त्यावर घट ठेवून त्यात पाणी भरले जाते. नऊ दिवसांत धान्याचे अंकुर मोठे होतात. दसºयाच्या दिवशी दसºयाचा तुरा म्हणून ते देवाला वाहिले जातात आणि टोपीवर, पागोट्यावर अभिमानाने अडकविले जातात.
घट बसविण्याच्या या धार्मिक कृत्यामागील कृषिप्रक्रियेची घटना महत्त्चाची आहे. घटाच्या खाली ठेवलेली परडी हे एक शेत असते. मातीची परीक्षा घेण्यासाठी आपल्याच शिवारातील वावरी त्यात टाकली जाते.
नांगराच्या फाळाने जमीन नांगरल्यानंतर जसे फराट तयार होतात तसे त्या परडीतल्या मातीवर उभ्या आडव्या नऊ रेघा मारल्या जातात. प्रत्येक रेषेवर एक याप्रमाणे नऊ रेघांवर नऊ प्रकारचे धान्य टाकले जाते. या पेरलेल्या धान्याला घटातल्या पाण्याने ओलावा मिळतो. या कृत्रिम शेताभोवती हवा खेळती राहावी म्हणून सतत दिवा लावला जातो. त्या दिव्याच्या उष्णतेने तेथील हवा विरळ होऊन वर जाते आणि त्या हवेची जागा बाहेरील शुद्ध हवा घेते.
गोडेतेलाच्या दिव्याने आजूबाजूचे जंतूही मरून जातात. असे काळजीपूर्वक नऊ दिवस केल्यानंतर कोणते धान्य सकस रूपात उगवले आहे, हे पाहून पुढील वर्षी आपल्या शिवारात कोणते धान्य चांगले येऊ शकते, याचा अंदाज घेतला जात असे. म्हणजेच नवरात्रातील घटस्थापना ही शिवारातील माती, धान्याचे बी, येणारे पीकपाणी याचा अंदाज घेणारी एक छोटी कृषी प्रयोगशाळाच होती. आज नवरात्र उत्सवातील हा कृषिसंदर्भ आणि त्याचे स्वरुप लोप पावले आहे. एक धार्मिक क्रियाविधी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.
एकूणच शारदीय नवरात्र उत्सवाचे वेगवेगळे पदर आहेत. वेगवेगळे संदर्भ आहेत. विविधांगी रूप आणि रूपक त्यातून व्यक्त होत आहे. असुरांच्या विनाशाचा, सत् प्रवृत्तीच्या संवर्धनाचा हा उत्सव आहे. सांस्कृतिक जीवनात या उत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे.