निसर्गाचे रंग अन आत्मरंग... एक अतूट धागा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 11:15 AM2017-08-16T11:15:20+5:302017-08-16T11:48:41+5:30

सप्तरंगी इंद्रधनुष्यालाही स्वत:ला रंगवून घेण्याची भूल पडते! तशी माणसाला संसार सुखाची भूल पडते. त्यामुळे तो आनंद गमावतोे. त्याचा संबंध चेतनेशी जोडला जातो. स्वत:ची खरी ओळखच विसरतो. अर्थात, त्याला आत्मज्ञान झाल्याशिवाय ‘स्व’ला जाणून घेता येत नाही. हे सांगतं ते ‘अध्यात्म!’

Nature's color and self-colored ... an endless thread | निसर्गाचे रंग अन आत्मरंग... एक अतूट धागा

निसर्गाचे रंग अन आत्मरंग... एक अतूट धागा

Next
ठळक मुद्देवृक्षसंगोपनानं पर्यावरण संतुलन राखलं जात असेल तर डोळसपणानं या आरोग्यदायी परंपरांचं पालन सण, उत्सव, व्रतं-वैकल्यं करण्यातही एक आनंद आहे.देवानं कोणालाही भीतीचा आत्मा दिला नाही, तर ‘प्रीती’चा आत्मा दिला आहे! मुलांना पालकांनी ‘धाडस’ व ‘धोका’ यातील फरक नीट समाजावून सांगितला तर ती निर्भय बनतील.

श्रावण आला की, भुवनवेल खुलते. हिरव्याकंच रंगानं बहरते. श्रावणधारा सृष्टीचं रूपच बदलून टाकतात. निसर्ग सर्वांगानं साद घालतो. अवघं विश्व व्यापून टाकतो. रसिक मनांना आनंदविभोर करतो. आनंद झुल्यावर हिंदोळणारं मन मग नाचू लागतं, बागडू लागतं. कधी बालकवींची कविताही गाऊ लागतं.
‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते शिर शिर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे’
श्रावणाचं असं हे अमोल आनंददान लाभूनही माणूस अखंड आनंदी का नाही? खरं तर आनंद कोणाला नको आहे? सप्तरंगी इंद्रधनुष्यालाही स्वत:ला रंगवून घेण्याची भूल पडते! तशी माणसाला संसार सुखाची भूल पडते. त्यामुळे तो आनंद गमावतोे. त्याचा संबंध चेतनेशी जोडला जातो. स्वत:ची खरी ओळखच विसरतो. अर्थात, त्याला आत्मज्ञान झाल्याशिवाय ‘स्व’ला जाणून घेता येत नाही. हे सांगतं ते ‘अध्यात्म!’ अध्यात्म अंतर्मुख करतं. जगण्यातला आनंद वाढवतं. संयम ठेवायला लावतं. डोळ्यांनी पाहणारे, कानांनी ऐकणारे, वाणीनं बोलणारे नि रसनेनं रसास्वाद घेणारे हे सर्व मुख्य ‘धन’ म्हणजे ‘आत्मतत्त्व!’ नि या आत्मतत्त्वाचा अभ्यास म्हणजे अध्यात्म!! या आत्मतत्त्वालाच वेदांती ‘ब्रह्म’ म्हणतात नि त्या अनंत शक्तीला ‘परब्रह्म’ नि भक्त त्याला ‘भगवंत’ म्हणतात नि आत्मस्वरूपाला भगवंताचा अंश मानतात.
‘भगवंताचं दुसरं नाव आहे आनंद!’
‘आत्मा’ हाच देहात बसणारा भगवंत आहे.
देतो देव!
मागतो तो माणूस!
‘मी भगवंताचा अंश आहे!’ याची जाणीव होणं हेच आत्मतत्त्व सर्वत्र भूतमात्रात आहे! हे समजून घेण्यासाठी अध्यात्म साहाय्य करतं. आध्यात्मिक विकास म्हणजे आत्मिक विकास- त्यात बौद्धिक, मानसिक विकास अनुस्युत आहे. भागवत तथा वारकरी संप्रदायासारख्या संप्रदायाची स्थापना आध्यात्मिक विकासासाठी झाली आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य या सहांच्या समुच्चयास ‘भग’ म्हणतात. नि या षड्गुण ऐश्वर्यसंपन्न असणाºयास ‘भगवंत’ म्हणतात. त्याचं औदार्य असं की, ‘देव आहे’ म्हणणाºयांचा श्वास तो चालवतो. नि देव नाही म्हणणाºयांचाही श्वास चालवतो! थोर शास्त्रज्ञ ‘न्यूटन’ बालपणापासून देववेडा होता. त्याला लहानपणी एकदा शिक्षक म्हणाले, ‘न्यूटन! तुझा देव कुठे आहे ते मला दाखव!’ मी तुला एक चॉकलेट देतो. त्यावर न्यूटन झटकन म्हणतो, ‘सर, देव कुठं नाही ते दाखवा!’ मी तुम्हला दोन चॉकलेट देतो!’
अध्यात्म आणि विज्ञान एकाच माणसाच्या दोन बाजू होत. विज्ञानाविना अध्यात्म आंधळ असतं! नि अध्यात्माविना विज्ञान पांगुळतं! म्हणून तर अमेरिकेतील ‘नासा’सारखी केंद्रे आधुनिक विज्ञानतीर्थ झाली! प्राजक्ताची फुलं माळताना दोराही गंधित होतो! तसं अध्यात्म- विचारांनी मन चैतन्यमय होतं. विचार ही पण एक ऊर्जा आहे. जीव आपल्याला ‘अस्तित्व’ देतो. शरीर ‘व्यक्तिमत्त्व’ नि आत्मा ‘देवत्व’ देतो! देवानं कोणालाही भीतीचा आत्मा दिला नाही, तर ‘प्रीती’चा आत्मा दिला आहे! मुलांना पालकांनी ‘धाडस’ व ‘धोका’ यातील फरक नीट समाजावून सांगितला तर ती निर्भय बनतील. माणसानं सुखासाठी विज्ञानमार्गानं नवनवीन शोध लावले. नवीन यंत्रं निर्माण केली. तरीही माणूस सुखी का नाही? कारण विज्ञानानं अणुबॉम्बसारखी भयंकर स्फोटकंही तयार केली. ज्यानं हिरोशिमा नि नागासकी येथील निष्पाप प्रजा बेचिराख झाली.
‘जग वन्ही झालं तर आपण व्हावं पाणी!’
असं संत मुक्ताबाई जेव्हा आपल्या ‘ताटी’च्या अभंगातून साक्षात ज्ञानेदवमाऊली यांना सांगतात तेव्हा त्यातील मर्म जाणून घेण्यातील अध्यात्म खूप काही सांगून जातं. श्रावण मास म्हणजे सण-उत्सवांची धमाल! मात्र, ‘उत्सव’ उपासनेकरिता नाहीत तर सामाजिक धर्मबुद्धी जागृत करण्यासाठी आहेत! प्रेम, समता, सौहार्द, एकात्मभाव, परस्पर सहकार्य, माणुसकी, नम्रता, ऋजुता आदी सद्गुण-संस्कार घडवणारे हे उत्सव! हे मनावर बिंबविण्यासही अध्यात्मच कामी येतं! नाही का?
तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा घालण्यानं ‘ओझोन’सारख्या प्राणवायूची प्राप्ती होत असेल, वृक्षसंगोपनानं पर्यावरण संतुलन राखलं जात असेल तर डोळसपणानं या आरोग्यदायी परंपरांचं पालन सण, उत्सव, व्रतं-वैकल्यं करण्यातही एक आनंद आहे. मातीच्या पार्थिव पूजेची प्राचीन परंपराही आपलं मातीशी असलेलं नातंच सांगणारी आहे.
एकदा संत कबीरांच्या पायाला झालेली जखम एक कुत्रं चाटत असल्याचं पाहून त्यांच्याशी अध्यात्माची चर्चा करायला आलेल्या माणसानं म्हटलं, ‘कबीरजी! तुमच्या पायाला कुत्रं चाटत आहे! त्यावर कबीरजी उत्तरले, ‘वो तो चामडी जाने! और कुत्ता जाने! मेरा उससे क्या संबंध?’
आपल्या सुख, दु:खाकडं प्रापंचिक समस्यांकडं असं अलिप्तपणे पाहायला शिकवतं ते अध्यात्म जाणून घेतल्यास आपल्या कोणत्याही वेदनेचा मोगरा का नाही होणार? ‘एलिट सोसायटी फॉर सायकिक रिसर्च’ या समितीच्या अध्यक्षा पॉलिन ओहकर यांनी ट्रेड सिरियनच्या ‘तादात्म्य’ शक्तीचं सर्वस्पर्शी संशोधन केलं! या शक्ती-सामर्थ्याबद्दल वस्तुस्थितीचा स्वीकार केला! अध्यात्मदेखील याहून वेगळं काय सांगतं?
एकदा का अध्यात्म नीट समजून घेतलं की, मग आपल्या मनातच श्रावण आनंदाची रिमझिम सुरू करतो. हिरवाईतून गीत बहरून येतं. मंदिरातील घंटारव, आरतीचे आर्त सूर, जात्यावरील सुरेल ओेवीसारखे गुंजारत राहतात. अंत:करण आनंदानं ओलंचिंब-चिंब होतं, नि हृदयातून गीतोत्सव फुलून येतो की, ‘अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता!’ अंतर्मन ग्वाही देतं,
‘आनंदाचे डोही आनंद तरंग!
आनंदाचे अंग आनंदची!’
-डॉ. कुमुद गोसावी

Web Title: Nature's color and self-colored ... an endless thread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.