- डॉ. गोविंद काळे

नाटकाला सूत्रधार असावा लागतो़ संस्कृत नाटकांमध्ये नांदी झाली की सूत्रधार प्रवेश करतो़ ‘नान्द्यन्ते प्रविशति सूत्रधार:! नाटकाची सगळी सूत्रे म्हणे या सूत्रधाराच्या हातात असतात़ सूत्रधार नाटकालाच असतो असे नाही तर विश्वाची सूत्रे धारण करणारा कोणी एक असतो़ आपल्या हातात काय असते? सूत्रधार नाचवील तसे आपण नाचायचे़ तो खेळवील तसे खेळायचे आणि तो ठेवील तसे राहायचे़ बाप रे बाप! असे जर आहे तर हे मी केले ही भाषा व्यर्थच म्हणावी लागेल़ आजची पिढी तर हीच गर्वाची भाषा बोलते. त्याला स्वाभिमान असेही म्हणतात़ ५० वर्षांपूर्वी ज्येष्ठ मंडळींची भाषा वेगळी होती़ ‘करता करविता तो - वरती बसलाय़’
सत्ता या शब्दाने आताच्या घडीला माणसाच्या डोक्यात जी राख घातली आहे ती वेड लावणारीच आहे़ एकवेळ दारूची नशा परवडली, थोड्या वेळाने उतरते तरी़ सत्तेचे तसे नाही़ देवालयात हरिदासीबुवा सत्ता या विषयावरच बोलत होते़ ‘मयि सर्वमिदं प्रोक्तं सूत्रे मणिगता इव’ भगवद्गीतेच्या श्लोकावर बुवा भरभरून बोलले़ सर्वांना एका सूत्रात गोवणारा पुढ्यातच उभा होता़ सारे त्याचेच दर्शन घेत होते़ रंगलेले कीर्तन संपले़ एवढ्यात एक तरुण बुवांच्या चरणावर डोके ठेवता झाला़ ‘बेताल नाचवी सूत्रधार हा कोण. मातीतच अंती त्याचेही निर्वाण’ म्हणजे हा सूत्रधार पण एक दिवस मातीतच जाणार?’ कवितेचा अर्थ समजावून सांगा ना, बुवा! शांतपणे बुवा म्हणाले, हा आहे कवितेचा समारोप, मूळ कविता मोठी आहे़ कवितेचे नाव आहे़ ‘मातीची दर्पोक्ती’़ माती माणसाच्या रूपाला, कर्तृत्वाला, बुद्धीला, पराक्रमाला आव्हान आहे़ तुमचे सौंदर्य, बुद्धी पराक्रम मग ते सिकंदर, वाल्मिकी, मनु सारेच मातीला मिळाले़
मातीचा थर मात्र उत्तरोत्तर वाढतो आहे़ मातीच्या बोलण्यात सुद्धा अहंकाराचा दर्प आहे़ त्या अहंकारापोटीच तर ती आव्हान देते आहे़ माणसाच्या कर्तृत्वाला मर्यादा आहेत़ तो तर अजन्मा आहे़ त्याला मर्यादा नाही़ तू महाविद्यालयात शिकणारा तरुण आहेस़ तुझ्या जीवनात दर्पोक्ती येणार नाही़ तुला अहंकाराचा वारा स्पर्श करू शकणार नाही एवढे पाहा़ सूत्रधाराची काळजी तुला नको़ तू केवळ दोन ओळी वाचून तर्क केलास़ कोणतीही गोष्ट मुळापासून अभ्यासावी म्हणजेच यथार्थ आकलन होते़