श्रद्धा ठेवून भगवंतांना जाणून घेण्यासाठी नामसाधना महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:22 PM2018-12-07T23:22:13+5:302018-12-07T23:22:43+5:30

भगवंताची कृपा झाली, तरच भगवंतांचे समग्र देखणे रूप आणि ब्रह्मांडव्यापी स्वरूप जाणिवेच्या ज्ञानपातळीवर प्रत्यक्ष अनुभवता येते.

Namasdhana is important to know about God by having faith | श्रद्धा ठेवून भगवंतांना जाणून घेण्यासाठी नामसाधना महत्त्वाची

श्रद्धा ठेवून भगवंतांना जाणून घेण्यासाठी नामसाधना महत्त्वाची

Next

- वामन देशपांडे
भगवंताची कृपा झाली, तरच भगवंतांचे समग्र देखणे रूप आणि ब्रह्मांडव्यापी स्वरूप जाणिवेच्या ज्ञानपातळीवर प्रत्यक्ष अनुभवता येते. या विश्वात एक भगवंत अस्तित्व सत्य आहे आणि यावर श्रद्धा ठेवून भगवंतांना जाणून घेणे, ही खरी साधना आहे. त्यासाठी नामसाधना अत्यंत महत्त्वाची... मुखात भगवंतांचे नाम जर अष्टौप्रहर झंकारत असेल, तर भगवंत अस्तित्वाशी आपली नाळ जोडली जाते. भगवंतांशी आपले सख्य जुळून येते. भगवंत म्हणतात...
मच्चित्ता मदगतप्राणा बोधयन्त: परस्परम्।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च स्मन्ति च ।।
गीता :१0:९।
पार्था, हे संपूर्ण विश्व माझ्यापासून निर्माण झालेले आहे, हे विश्व मीच निर्माण केलेले आहे, माझ्या इच्छेनेच या विश्वातले सर्व व्यवहार चालतात, म्हणजे या प्रगट विश्वाच्या मुळाशी मी आहे, हे पूर्णपणे ज्ञानपातळीवर जाणून, जे परमभक्त आपले चित्त आणि आपला प्राण मलाच अर्पण करतात, हे सर्व परमभक्त आपापसात माझ्या या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची जाणीव एकमेकांना प्रेमाने कथन करीत, सदैव माझ्याच अस्तित्वाशी एकरूप होत, पूर्ण समाधानी, तृप्त आयुष्य जगत राहतात, माझ्यातच रमतात, त्यांना या मर्त्य विश्वातल्या मर्त्य गोष्टींची जाणून घेण्याची इच्छाच होत नाही. अविचल भक्तीच्या साहाय्यानेच भगवंतांची प्राप्ती होते. परमभक्तांचे अवघे अस्तित्व भगवंतमय झाले की, त्यांचे चित्त भगवंत चरणांशी स्थिर होते.
भगवंत अर्जुनाला म्हणतात की,
तेषां सततयुक्तानां भजनां प्रीतिपूर्वकम्।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते।।गीता १0 :१0।।
पार्था, माझ्या नामसाधनेत निरंतर मग्न असणाऱ्या, माझ्या परमभक्तांचे चित्त आणि मन मी सांभाळतो. मानवी जीवनातील शरीरभाव उत्पन्न करणारी द्वंद्वात्मक जीत मी नष्ट करून, त्यांच्या चित्तात समभाव निर्माण करणारी बुद्धी मी त्यांना अर्पण करतो. त्याचा सोपा अर्थ असा की, जे जे काही घडले, ते ते भगवंतांनीच दिलेला हा प्रसाद आहे, ही तीव्र जाणीव प्रत्येक क्षणी त्यांच्या भक्तिभरल्या अंत:करणात स्फुरण पावत राहते. त्यामुळे समत्व पावलेले मन, आनंदी अंत:करण त्या माझ्या परमभक्ताना माझी प्राप्ती करून देते. सर्व काही वासुदेवच आहे, हा सदभाव जागृतावस्थेत सळसळत राहणे, हीच खरी साधकाची भक्तिभारली साधना आहे.

Web Title: Namasdhana is important to know about God by having faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.