।हेची घडो मज जन्म जन्मांतरी ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:33 AM2018-07-24T00:33:14+5:302018-07-24T00:38:21+5:30

‘तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे। संसारी जन्मीजे याची लागी।।’ असे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात.

 This is my birthday. | ।हेची घडो मज जन्म जन्मांतरी ।

।हेची घडो मज जन्म जन्मांतरी ।

googlenewsNext

इंद्रजित देशमुख
‘तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे।
संसारी जन्मीजे याची लागी।।’
असे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात. त्या म्हणण्यापाठीमागील कारण काय असावं, याची थोडीबहुत प्रचिती आम्हाला या पंढरीच्या वारीने दिली. खरंच, दिसायला सामान्य; पण अनुभूतीने अद्वितीय असणारी ही वारी आम्हाला खूप काही शिकवून गेली. संसाराच्या दैनंदिन कटकटीत आमचा दिवस उगवतो आणि मावळतो; पण पदरी मात्र पारलौकिक समाधानासाठी आवश्यक असं काहीच उरत नाही. अगदीच सांगायचं झालं तर तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे -
‘करता भरोवरी दुरावशी दुरी।
भवाचिये पुरी वहावशी।।’
अशी आमची अवस्था असते. ज्या अतीव स्नेहाने आम्ही संसार करतो तेवढाच अतीव अपेक्षाभंग आमच्या पदरी येतो. जीवनात अशा दु:खाची मालिका अनुभवायला मिळावी आणि नामदेव महाराजांनी म्हटल्याप्रमाणे,
‘तुझा माझा देवा कारे वैराकार।
दु:खाचे डोंगर दाखविशी।।’
असं संपूर्ण जीवन वेदनांनी भरून जावं. या सगळ्यांमुळे मन खचून जातं, व्यथित होतं, विषण्ण होतं, मुक्तपणे श्वास घेण्यास जगातील कोणताच मार्ग मोकळा नाही असं वाटतं आणि त्या वेळेला आम्हाला एकच वाट दिसते ती पंढरीची.
या वारीमुळे आम्हाला दोन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. एक म्हणजे या संपूर्ण वातावरणात आम्ही ते सगळं दु:ख विसरलो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे सगळं दु:ख अनुभवत असताना ते कसं स्वीकारायचं किंवा कसं पचवायचं हे आम्हाला या वारीमुळे उमगलं. या वारीत काय मिळतं, हे शब्दांत सांगताच येणार नाही. त्याबद्दल एक प्रसंग सांगावासा वाटतो. या वारीत एक पंच्याऐंशी वर्षांचे आजोबा अगदी विळ्यासारखं वाकलेलं आपलं शरीर घेऊन अंगावर सुरकुत्या, हातपाय थरथरणारे, चेहऱ्यावर वार्धक्य अगदी ओसंडून वाहत होतं; पण त्यातही निष्ठावंत वारकरी म्हणून जे तेज असतयं ते तेज उत्कर्षाने विलसत होतं, असे ते आजोबा काल पांडुरंगाच दर्शन घेताना धाय मोकलून रडत होते. एकाने विचारले, ‘आजोबा का रडताय?’ त्यावर आजोबा म्हणाले, ‘बाळांनो गेली पन्नास वर्षे झाली मी वारी करतोय, कधीच खंड पडला नाही. या वारीनं मला खूप काही दिलं; पण हे शरीर थकलंय त्यामुळे घरातील जाऊ नका म्हणत होते, तरीपण मी घरच्यांना विनंती केली. घरचे म्हणाले, ‘आता तुम्हाला जमत नाही. तुमची वारी आम्ही चालवितो. फक्त यंदाच वर्ष चला. आम्ही तुमच्या सोबत असू.’ मी माझ्या नातवंडासोबत वारीला आलोय. आता यापुढे ही वारी या देहाने अनुभवता येणार नाही. म्हणून मी जो तो मुक्काम सोडताना तिथल्या मातीचं दर्शन घेत होतो आणि परत मला पुढच्या जन्मी याच वारीतून याचं वाटेनं चालायला मिळावं, अशी याचना करीत होतो. मी माझ्या पांडुरंगालादेखील वटा पसरून हेच मागणं मागितलयं. असं बोलताना आजोबांचा आवाज कापरा झालेला. डोळे डबडबलेले. आजोबांच बोलणं ऐकून क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. सगळ्यांच्या माना आपोआपच आजोबांच्या चरणावर झुकल्या आणि वारीपाठीमागचं एक भोळ सात्त्विक सत्य आम्हाला अनुभवायला मिळालं.
आज द्वादशी. काल पांडुरंगाचं डोळे भरून दर्शन झालं. अजूनही त्या गाभाºयात असलेल्या जाणिवेचा भास हृदयात तसाच आहे. तो तसाच घेऊन आता क्षिरापतीची वाट पाहतोय. वारकरी संप्रदायात द्वादशीच्या क्षिरापतीला खूप महत्त्व आहे. या क्षिरापतीची सामुग्री,
‘झाले ज्ञानदेव वाणी।आले सामुग्री घेऊनि।।
पर्वकाळ द्वादशी। दिली सामुग्री आम्हांसी।।’
या वचनाप्रमाणे आमचे माउली ज्ञानोबाराय घेऊन येतात आणि आम्हाला तृप्त करतात. आम्ही मात्र,
‘पाहे प्रसादाची वाट। द्यावे धुवोनिया ताट।।’
या याच्यवृत्तीने तो क्षिरापतीचा प्रसाद घ्यावा आणि
‘हेची घडो मज जन्म जन्मांतरी।
मागणे श्रीहरी नाही दुजे।।’
असं म्हणत घराची वाट धरावी आणि ती ही अगदी जड अंत:करणाने कारण गेले अठरा-वीस दिवस या संतांच्या मेळ्यात खूप आनंदात सगळ्यांची सेवा घडत होती. आता त्यात खंड पडणार; पण काय करणार? कर्मयोगाला पर्यायही नाही. त्यासाठी तो खंड स्वीकारावाच लागेल म्हणून तो स्वीकारतो. दैनिक ‘लोकमत’च्या माध्यमातून मी गेले काही दिवस आपल्याशी हे वारीबद्दलचं जे काही हितगुज आपल्याशी केलं त्यातील माझं असं काहीच नव्हतं, जे होतं ते सगळं,
‘करवली तैशी केली कटकट।
वाकडी का नीट देव जाणे।।’
या न्यायाने त्या परमसत्ताधीश पांडुरंगाचं होतं. त्याच्या आणि तुमच्या पायावर डोकं ठेवतो आणि जाता जाता इतकंच म्हणतो,
‘करा क्षमा अपराध।महाराज तुम्ही सिद्ध।।’
(समाप्त)
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title:  This is my birthday.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.