मनःशांती- शांती व क्रांतीचा मध्य साधता आला तरच जीवन खऱ्या अर्थाने सुखी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 08:43 PM2019-02-09T20:43:17+5:302019-02-09T20:47:45+5:30

स्वामी विवेकानंद म्हणतात, नीती ही सुखाचा पाया आहे. सत्य व नीती आकाशातून जमिनीवर फेकले तरी क्षणात उभे राहण्याची त्यांच्यात ताकद असते. 

Mana shanti - Life is truly happy when peace is restored ... | मनःशांती- शांती व क्रांतीचा मध्य साधता आला तरच जीवन खऱ्या अर्थाने सुखी...

मनःशांती- शांती व क्रांतीचा मध्य साधता आला तरच जीवन खऱ्या अर्थाने सुखी...

googlenewsNext

-डॉ. दत्ता कोहिनकर- 
प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना एकदा पोलिस आयुक्तांनी विचारलं, सर.. स्नेहसंमेलनाला पोलीस बंदोबस्त न मागवता तुमच्या विद्यापीठाचं स्नेहसंमेलन शांततेत कसं काय पार पडलं ? यापूर्वीच्या कुलगुरूंनी पोलीस बंदोबस्त घेऊन देखील भांडणे व हाणामाऱ्या व्हायच्याच. शेवटी जास्त पोलीस फाटा पाठवावा लागायचा. तुमच्यात काय दैवी शक्ती वगैरे आहे का ? हसत-हसत शिवाजीराव भोसले म्हणाले, साहेब बरीचशी टारगट गुन्हेगारी प्रवृत्तीची मुले आमच्या विद्यापीठात आहेत. काही जण तर टोळीनेच कॉलेजमध्ये फिरत असतात. दुमडलेल्या बाह्या खाली घेऊन, वाकून मला आदराने नमस्कार करतात. स्नेहसंमेलनाला मी फक्त कोट घालून एका कोपऱ्यात स्टेजजवळ उभा होतो. अडीच ते तीन हजार विद्यार्थी शांतपणे बसून होते,प्राचार्य-भोसले सर समोरच उभेत आहेत, एवढाच विचार मुलांच्या मनात घर करायचा. 2500 ते 3000 विद्यार्थी शांतपणे बसून गॅदरिंग शांततेत पार पडले, याचा अर्थ कमिशनर साहेब सज्जनला या जगात मान आहे. सद्गुणांची केवढी ही परिणामकता. 
जसजसे आपण नीतिमत्तेचे सद्गुणांचे आचरण करतो, तेव्हा निसर्गाची सारी शक्ती आपणांस पूर्णत: साहाय्य करत असते. 
 नीतिमान शब्दात एक प्रकारची ताकद असते, स्वामी विवेकानंद म्हणतात, नीती ही सुखाचा पाया आहे. सत्य व नीती आकाशातून जमिनीवर फेकले तरी क्षणात उभे राहण्याची त्यांच्यात ताकद असते. 
एकदा यंग्स मठ व चर्चिल विमानाने चालले होते. यंग्स मठ चर्चिलला म्हणाले, तुम्हाला गांधी माहित आहेत का ? त्यांना तुम्हाला भेटायचे का ? चर्चिल यंग्स मठला म्हणाले - मला गांधीजी माहिती आहेत पण मी त्यांना भेटू  इच्छित नाही. कारण जर मी त्यांना भेटलो तर ते माझे विचार व माझा दृष्टीकोन बदलून टाकतील. सद्गुणांची केवढी ही ताकद, सदगुणी माणसाच्या विचारात समोरच्या व्यक्तीला पूर्णत: बदलण्याची ताकद असते. 
नारदमुनींच्या सहवासात वाल्या कोळी - संत वाल्मीकी होतो तर अनेकांच्या हत्या करणारा अंगुलीमाल भगवान बुध्दांच्या संपर्कात येऊन भिक्षू होऊन निर्वाणाचा अधिकारी होतो. म्हणून समर्थ रामदास म्हणतात..  
मना तूचि रे एक क्रिया करावी । 
सदा संगती सज्जनांची धरावी ॥ 
परंतु आधुनिक युगात कधी-कधी सज्जनाला दुर्जन त्रास देऊ पाहतात. त्यावेळी मात्र सद्गुणी माणसाने पूर्ण शक्तीनिशी त्यांचा बिमोड करावयास हवा. बुध्दाचा मध्यम मार्ग धारण करावयास हवा बुध्द म्हणतात, शरीर व वाणीने कठोर कर्म करताना फक्त मनात पूर्णत: करूणा व मैत्री असू द्या. कटूता येऊ देऊ नका. स्टीफन कोव्हे देखील म्हणतात क्रिया करा - प्रतिक्रिया नको
कुंभार मडके बनवताना खाली मैत्रीचा हात ठेवून वरून मडके बउवतो ते मजबूत करण्यासाठी - तोडण्यासाठी नव्हे, म्हणून मनात मैत्री - करूणा ठेवून अन्यायाचा प्रतिकार करा.
गीतेत भगवान श्रीकृष्ण अजुर्नास म्हणतात, अर्जुना, समोर तुझे बांधव - गुरू-चुलते असतील तरी तू शस्त्र उचल व त्यांना मार. कारण अधर्माचा नाश करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे.फक्त अधर्माविरूध्द लढताना आपण धर्माची पायरी म्हणजे सद्गुण व नीतिमत्ता सोडू नये. मनात मैत्री व करूणा असू द्यावी. शेवटी शांती व क्रांतीचा मध्य साधता आला तरच जीवन खऱ्या अर्थाने सुखी होईल. 
(लेखक व्याख्याते असून त्यांच्या"मनाची मशागत "या पुस्तकाला बेस्ट सेलर चा दर्जा मिळाला आहे. संपर्क 9822632630)

Web Title: Mana shanti - Life is truly happy when peace is restored ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.