Lunar Eclipse 2018 today 4 Zodiac Signs That Will Be Most Affected | आजचं खग्रास चंद्रग्रहण 'या' राशींसाठी अशुभ; गर्भवतींनीही घ्यावी काळजी
आजचं खग्रास चंद्रग्रहण 'या' राशींसाठी अशुभ; गर्भवतींनीही घ्यावी काळजी

मुंबईः तब्बल १५२ वर्षांपूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमून दर्शनाचा जसा योग जुळून आला होता, तसाच तो आजही जुळून आलाय. संध्याकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल आणि ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होऊन सुपर-ब्ल्यू-ब्लडमूनचे दर्शन होईल. ग्रहणमध्य सायंकाळी सात वाजता आहे. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल. 

ग्रहणकाळात अनेक घरांमध्ये काही पथ्यं आवर्जून पाळली जातात.स्नान, खानपान, देवपूजा याबाबत काही नियम पूर्वापार चालत आलेत, त्याचं काटेकोर पालन केलं जातं. अशा मंडळींसाठी ज्योतिषविद्येच्या जाणकारांनी काही सूचना केल्यात. 

आजचं हे ग्रहण काही राशींसाठी शुभ फल देणारं आहे, तर काही राशींसाठी ते अशुभ ठरेल, असं अभ्यासकांनी म्हटलंय. वृषभ, कन्या, तूळ आणि कुंभ या चार राशींसाठी ते शुभ असेल, तर मिथुन, वृश्चिक, मकर आणि मीन या राशींसाठी ते मिश्र फलदायी आहे. मेष, कर्क, सिंह व धनु या राशींसाठी हे ग्रहण अभुभ असून ते त्यांनी पाहू नये. तसंच, गर्भवतींनीही ग्रहण पाहू नये, असं जाणकारांनी नमूद केलंय. 

ग्रहणाचे वेध सकाळी 11.30 पासून लागणार आहेत. बालकांनी, वृद्धांनी, आजारी व्यक्तींनी आणि गर्भवतींनी वेधकाळात भोजन करू नये. स्नान करून जप, नित्यकर्म, पूजाअर्जा केल्यास त्यांना ग्रहणाचा कुठलाही त्रास होणार नाही, असं पंचांगकर्त्यांनी सुचवलंय. 

महाराष्ट्रात चंद्रोदयापासून ग्रस्तोदित चंद्र दिसणार असून संपूर्ण ग्रहण पाहता येणार आहे. 


Web Title: Lunar Eclipse 2018 today 4 Zodiac Signs That Will Be Most Affected
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.