निष्ठावंत भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 04:25 AM2019-04-22T04:25:43+5:302019-04-22T04:26:25+5:30

निष्ठा नावाच्या जीवनमूल्यातूनच त्यांना साध्यरूपी भगवंत प्राप्त होतो, परंतु तोपर्यंत अत्यंत संयमाने वाटचाल करीत साधक डळमळीत होत नाहीत.

loyal devotee never lost his faith | निष्ठावंत भाव

निष्ठावंत भाव

googlenewsNext

- प्रा. शिवाजीराव भुकेले

वरी हे आकाश पडों पाहें । ब्रह्म घोळ भंगा जाय ॥
या वचनाप्रमाणे डोईवर आपत्तीचे आभाळ कोसळू लागले. आधार देणारी धरतीच दुभंगून निराधार करू लागली. मनी-मानसी पाहिलेल्या स्वप्नांची लक्तरे झाली. महत्त्वाकांक्षेचे कोळसे झाले, तरीही ज्यांची जीवनावरची, तत्त्वावरची आणि सुपर नॅचरल पॉवरवरची निष्ठा डळमळीत होत नाही, तेच खरे निष्ठावंत साधक असतात. ज्यांचा भाव निष्ठावंत असतो, देह निष्ठावंत असतो. या निष्ठा नावाच्या जीवनमूल्यातूनच त्यांना साध्यरूपी भगवंत प्राप्त होतो, परंतु तोपर्यंत अत्यंत संयमाने वाटचाल करीत साधक डळमळीत होत नाहीत. कारण त्यांना माहीत असते, ज्यांची पावले वाळवंट तुडवितात तेच हिरवळीचा शोध घेतात. संत नामदेव यांच्या बाल्यावस्थेतील एक घटना निष्ठा नावाच्या जीवनमूल्याचे मूर्तिमंत प्रतीक मानली जाते. दामाशेटीच्या गैरहजेरीत नामदेवाने एकदा विठ्ठलासमोर नैवेद्याचे ताट ठेवले, पण देव मात्र हालेना, चालेना, डुलेना काहीच करेना व नैवेद्यसुद्धा खाईना, तेव्हा बालभक्त नामदेवांनी विठ्ठलास निक्षून सांगितले, एथोनिया नुठवु माथा । मरणा वाचोनी सर्वथा । पुढे आयुष्यभर याच निष्ठाभावाचे नामदेवांनी जतन केले, म्हणूनच ते भागवत धर्माचे विस्तारक झाले. ही घटना हाच भाव व्यक्त करते की, भक्ताकडे काहीच साधने नसली, तरी तो अनन्य निष्ठाभावावर जगावा; कारण निष्ठा हे भक्तियोगातील असे पोषणमूल्य आहे की, जिच्यापुढे अमृतही फिके पडते. अलंकारांनी मढवलेल्या मढ्यावर पुन्हा-पुन्हा कितीही साजश्रृंगार केला, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. याउलट काळ्या-कुळकुळीत देहयष्टीचे पोरं जर आईच्या दुधावर पोसले गेले, तर आपल्या आतली तेजस्विता प्रकट केल्याशिवाय राहात नाही.

Web Title: loyal devotee never lost his faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.