Know the Importance of Proteinism | जाणून घ्या प्रदक्षिणाशास्त्राचे महत्त्व

- सनतकुमार सिद्धेश्वर-जैन

प्रदक्षिणाशास्त्र
ब्रह्मांडामध्ये प्रत्येक वस्तू कोणाभोवती तरी फिरत आहे. सूर्याभोवती ग्रह फिरत आहेत. ग्रहांभोवती उपग्रह फिरत आहेत. चाक आपल्या आसाभोवती फिरते; म्हणून गाडी धावत जाते. प्रत्येकाचा केंद्रबिंदूभोवती फिरण्याचा काहीतरी उद्देश आहे, हेतू आहे. या फिरण्यामुळे काही तरी प्रक्रिया होत असते. काही तरी नवीन घडत असते. चांगले वा वाईट! परंतु ते नियमांनी बद्ध असावे लागते. प्रमाणाने बद्ध असावे लागते. या प्रमाणात अधिकउणे झाले की, उद्देश साध्य होत नाही. हे भोवती फिरणे अनेक नियमांनी बद्ध आहे. मात्र, मानवाच्या लाभप्रद आहे. कोणत्याही मंदिरात आपण जातो, तेव्हा तेथील मूर्तीला प्रदक्षिणा घालतो. मूर्तीच्या, सिंहासनाच्या, गाभाऱ्याच्या, गर्भागृहाच्या किंवा थेट मंदिराच्याच बाहेरून या प्रदक्षिणा घातल्या जातात.

प्रदक्षिणांचे नियम
या प्रदक्षिणा घालण्याचे काही नियम आहेत. ते पाळले तरच त्याचा संपूर्ण लाभ आपणास होतो. ते नियम असे...
मूर्तीच्या समोर उभे असताना मूर्तीच्या उजव्या बाजूने (अर्थात आपल्या डाव्या बाजूने) सुरुवात करून वर्तुळाकार फिरून पुन्हा मूर्तीसमोर आपल्या पहिल्या जागी यावे. मात्र, ज्या जागेवरून सुरुवात केली; त्याच जागी परत येऊ, तेव्हाच एक प्रदक्षिणा पूर्ण होते. त्याअगोदरच थांबून ती सोडली, तर प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. तेथून पुन्हा त्याच मार्गाने दुसरी, तिसरी अशा प्रदक्षिणा घालाव्यात. 
प्रदक्षिणा घालताना शक्यतो विषम संख्येत घालाव्यात. 
उदा. १, ३, ५, ७, ९... अशी प्रदक्षिणांची संख्या प्रत्येकाच्या मनानुसार वा इष्टदेवतेनुसार कमीअधिक, वेगवेगळी असू शकते.
प्रदक्षिणा मध्येच अर्धवट सोडून देऊ नये. प्रदक्षिणा घालताना बहुधा बोलू नये. इष्टदेवतेचे नामस्मरण मनात सतत सुरू ठेवावे.
उलट्या बाजूने चुकूनही कधी प्रदक्षिणा घालू नये. प्रदक्षिणा घालताना शरीर आणि मनाचे पावित्र्य जपणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रदक्षिणा घालताना कोणताही अहंकार मनात नसावा. संपूर्णत समर्पित भावनेने त्या घालाव्यात. तरच, त्यांचा लाभ आपल्याला होऊ शकतो.

प्रदक्षिणांचा लाभ
कोणत्याही देवतांच्या मंदिरांत मूर्तीस्थापनेपासून दररोज नित्यनेमाने पूर्जाअर्चा, आरती, उत्सव आदी कार्यक्रम सुरू असतात. ही अर्चना वर्षानुवर्षे सुरू असते. त्यामुळे मंदिर नि परिसरातील वातावरण, त्यातील अणुरेणू तेथील पावित्र्यामुळे सकारात्मक झालेले असतात. त्यामुळे इष्टदेवतेला प्रदक्षिणा घातल्याने आपले मन प्रसन्न होऊन जाते. 
देवतेचे दर्शन घेऊन ठरावीक प्रदक्षिणाही आपण घातल्या. आता आपला दिवस चांगला जाणार, कुठलीही संकटे येणार नाही, हा सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आपल्याही नकळत दृढ होतो. नित्य दर्शनाने देवतेचा आपणास आशीर्वाद मिळाला आहे, ही भावना जागरूक होते. थोडक्यात आपली वृत्ती सकारात्मक विचारांकडे हळूहळू प्रवाहित होत जाते. या क्रियेला नास्तिक लोक, विज्ञानमार्गी लोक अंधश्रद्धा समजून त्यावर टीका करतील. थोतांड म्हणतील. परंतु हा एक तर मनुष्याच्या श्रद्धेचा भाग आहे. आपण सकारात्मकता मनी बाळगून कुठलीही गोष्ट केली; तर त्याला हमखास यश येते. ही त्यामागची धारणा आहे. अमुक देवतेला आपण अमुक संख्येने प्रदक्षिणा घातल्या की, आपल्या सांसारिक अडचणी नाहीशा होणार, हा हेतू समजून त्या घातल्या जातात. या सकारात्मक विचारांचे फलित म्हणूनच शुभपरिणाम दिसू लागतात. म्हणूनच यामागे अंधश्रद्धा नसून सकारात्मकता वाढवणे, हे मूळ कारण आहे.

प्रदक्षिणेमागचे सूक्ष्म विज्ञान
आपण प्रदक्षिणा घालताना नेमके काय घडते, यामागेही एक सूक्ष्म विज्ञान आहे. जेव्हा आपण देवतेला प्रदक्षिणा घालतो; तेव्हा तिच्याभोवती वर्तुळाकार फिरतो. १, ३, ५, ७, ९... या संख्येने आपण प्रदक्षिणा घालतो. 
खरेतर, मानवी मन हे अनेकानेक नकारात्मक विचारांनी भरलेले असते. त्यामुळे नकारात्मक विचारांच्या वाढीने त्याचे स्वास्थ्य, विचार, आत्मविश्वास सारेच डळमळीत होऊन जाते. त्याच्या शरीरातून नकारात्मक विचारांचे तरंग बाहेर पडत असतात आणि ते पृथ्वीच्या दिशेने अर्थात अधोगामी वाहत असतात.
कोणत्याही देवतेचे नवीन मंदिर बांधल्यानंतर तिथे नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. हा विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडला जातो. त्या मूर्तीमध्ये प्राण ओतला जातो; म्हणजे प्रस्तुत देवतेचे विशिष्ट तत्त्व त्यात प्रतिष्ठापित होते. तेव्हाच, प्रस्तुत मूर्तीत संबंधित देवतेचे विशिष्ट तत्त्व वास करू लागते. चैतन्य सळसळू लागते. ऊर्जा वाहू लागते. यालाच आपण जागृत देवस्थान म्हणतो. तिथे नित्य पूजाअर्चा, आरती, धार्मिक कार्यक्रम होत राहतात. मंत्र, जपजाप्य, साधना होत राहते. त्यामुळे ते ठिकाण दैवी चैतन्याने भरून जाते.
साक्षात देवतेची मूर्ती म्हणजे चैतन्य, सकारात्मकता, ऊर्जेचा महास्रोत, महानदीच असते.
त्यामुळे त्या मूर्तीतून चोहोबाजूने सकारात्मक सूक्ष्म तरंग सतत बाहेर असतात. हजारोंच्या संख्येने ते नित्य प्रवाहत असतात. ते धन प्रभारित असतात. म्हणजे, सकारात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण-प्रसारणच अविरत होत असते. त्यांची दिशा ही ऊर्ध्वगामी म्हणजे आकाशाच्या दिशेने असते.
ज्या वेळी नकारात्मक ऊर्जा-तरंग शरीरातून पृथ्वीच्या दिशेने अधोगामी वाहत असणारी व्यक्ती त्या देवतेला प्रदक्षिणा घालू लागते; तेव्हा देवतेमधून वाहणारी सकारात्मक ऊर्जा नि व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा यांचे घर्षण, टक्कर होऊ लागते. मानवी तरंग हे दुबळे, अशक्त असतात; तर दैवी तरंग प्रबळ, शक्तिशाली असतात. त्यामुळे दोन्हींच्या घर्षणातून मानवी ऊर्जा निस्तेज होऊ लागते आणि दैवी ऊर्जेच्या संपर्काने सतेज व्हायला लागते. 
त्यामुळे प्रदक्षिणा घालताना कितीही नास्तिक असला, नकारात्मक विचारांचा माणूस असला तरी तो सकारात्मक होऊन जातो. आनंदी होऊन जातो. त्याचे मन प्रसन्न होऊन जाते. आपण म्हणतो, मला देव प्रसन्न झाला. खरेतर, तेव्हा आपलेच मन सकारात्मक ऊर्जेच्या महास्रोताच्या संपर्काने प्रसन्न झालेले असते. कारण, प्रदक्षिणा घालताना मनुष्याच्या शरीरातून वहन होणाऱ्या अधोगामी नकारात्मक तरंगांना, वलयांना मूर्तीतून चोहोबाजूने नि ऊर्ध्वगामी वहन होणारे सकारात्मक तरंग ऊर्ध्व दिशेला दाबण्याचा प्रयत्न करत असतात. ढकलण्याचा प्रयत्न करत असतात. वळवण्याचा प्रयत्न करत असतात. जेवढ्या जास्त प्रदक्षिणा तेवढ्या जास्त वेळा ते ऊर्ध्वगामी वळवण्याचा प्रयत्न होतो. असे सातत्याने, अनेक दिवस केले तर एका टप्प्यावर मनुष्याची अधोगामी वहन होणारी ऊर्जा नष्ट होऊन ती कायमस्वरूपी ऊर्ध्वगामी वाहत राहते. तेव्हा तो पूर्ण सकारात्मक झालेला असतो. ही स्थिती खूप दुर्मीळ असून साधुसंत, कठोर साधना करणारे साधक, देवऋषी यांनाच हे साध्य होते.
आपला असा अनुभव असतो की, आपण मूर्तीच्या सान्निध्यातून दूर मंदिराबाहेर आलो की, आत अनुभवलेली प्रसन्नता हळूहळू लोप पावू लागते. जसजसे मंदिरापासून दूर जाऊ तसतसे संसारतापाचे चटके पुन्हा आपल्या मनाला बसू लागतात. चारदोन तासांनी तर आपण पूर्वस्थितीला आलेलो असतो. पुन्हा नकारात्मक विचार, दैनंदिन समस्या, अडचणी... त्यामुळे आपले मन पुन्हा नैराश्येने ग्रासले जाते. नकारात्मक विचारांनी भरून जाते. म्हणून, आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे की, दररोज सकाळी अंघोळीनंतर कोणत्याही मंदिरात, आपल्या आवडणाऱ्या देवतेच्या मंदिरात, इष्टदेवतेच्या मंदिरात कोठेही एका ठिकाणी जाऊन दर्शन करावे. मूर्तीला विशिष्ट संख्येने प्रदक्षिणा घालाव्या नि नित्यकर्माला लागावे. तसेच तिन्हीसांजेलाही मंदिरात जाऊन दर्शन, प्रदक्षिणांसह आरती करावी.
हे मंदिरातील मूर्तीचे नित्यदर्शन म्हणजे जणू स्वत जाऊन त्या सकारात्मक ऊर्जास्रोतात स्रान करण्यासारखेच आहे. त्यात न्हाऊन निघण्यासारखेच आहे. त्यातील काही अंश ऊर्जा शरीरात भरून घेऊन येण्यासारखेच आहे. त्या महाऊर्जेच्या सान्निध्यात काही वेळ थांबून स्वतला सकारात्मक बनवण्यासारखेच आहे. त्यासाठी माणसाने दररोज सकाळी मंदिरात जाऊन दर्शन-प्रदक्षिणा करून आपले मन, आपले शरीर, आपले जीवन प्रसन्न, पुनतरतरीत (रि-चार्ज) करून घ्यावे. जीवन सकारात्मक बनून, सुविचारांची वृद्धी होऊन अधिकाधिक सुखीसमाधानी करून घ्यावे.
 


Web Title: Know the Importance of Proteinism
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.