उपासनेला दृढ चालवावे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 09:35 AM2018-09-25T09:35:18+5:302018-09-25T09:35:56+5:30

सद्गुरूंची उपासना केल्याने प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नष्ट होऊन सर्वांप्रती समबुद्धी भाव विकसित होतो.

importance of worship | उपासनेला दृढ चालवावे

उपासनेला दृढ चालवावे

googlenewsNext

- धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

सर्व स्थिरचर सृष्टीचा मूळ स्त्रोत हा आत्मा आहे. मानवमात्राचा सर्वांगीण विकास आत्मोपासनेत दडलेला आहे. आत्मकेंद्रित झालेला माणूस नराचा नारायण होतो. आत्मदेवाचा परिचय पूजनीय सद्गुरू करून देतात. सद्गरूंना शरण जाऊन आत्मज्ञान प्राप्त करून आत्मोन्नती साधावी. सद्गुरूंची उपासना केल्याने प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नष्ट होऊन सर्वांप्रती समबुद्धी भाव विकसित होतो.

सर्वश्रेष्ठ उपासनेमुळे मनावर शुद्ध सात्त्विक संस्कार होतो. यामुळे आध्यात्मिक प्रगती, दीर्घायुष्य, आरोग्य व सर्व कामांत यश प्राप्त होऊन संसारात सद्गुरुकृपेचा आनंददायी अनुभव प्राप्त होतो. उपासना ही विद्वत्तेसोबत गेली पाहिजे. जेव्हा त्यासोबत चालता, तेव्हा माणसाचे सर्वत्र रक्षण होते. माणसाने मोठा विद्वान होणे जितके आवश्यक आहे, तितकेच ती विद्वत्ता टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. यातूनच समाज मोठा होतो, ज्ञानी होतो. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असे म्हटले जाते. खरं तर यात पाय धरणे महत्त्वाचे नसते तर तो त्याच्या विद्वत्तेला सलाम असतो. जो विद्वान असतो, त्या विद्वानांनी आपले आचरण चांगले राखले पाहिजे. हे आचरण विद्वत्तेला परिपूर्ण असले पाहिजे.

संसारामध्ये असलेल्या लोकांना भक्ती सांगितली आहे, तशी उपासनाही सांगितली आहे. हे करताना सद्गुरूंनी जो मार्ग दाखविला आहे तो सत्यधर्म म्हणून पाळला पाहिजे. या सत्यधर्माचे सोनेरी पात्र सत्याने भरलेले असून ते प्राशन करण्यासाठी सद्गुरू चरण सांगितले आहे. उलटे केलेले सत्याचे जे मुख आहे ते सुलटे करून प्राशन करण्याकरिता हा आमचा मानवी जन्म आहे. सत्य हे उलटे असते हे आपणास फार उशिरा कळते. सत्याचा शोध घेणारा मात्र त्याच्या मागे सातत्याने प्रयत्नशील राहतो आणि त्यालाच सत्याचे दर्शन घडते. सत्य म्हणजे आनंद. या आनंदामध्ये कमतरता येऊच शकत नाही. सत्य आनंदाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहाणारच नाही; कारण आनंदासाठी मानव भुकेलेला असतो. या आनंदाचे वाटप करण्यासाठी हा मानवी देह आपण धारण केला आहे. शेवटी आनंद कोणाला नको आहे? सर्वांना आनंद प्रिय आहे. किंबहुना माणसाचे जगणे आनंदापासून आहे. जो या नरदेहाच्या अपूर्वतेकडे पाहत गेला त्या सर्वांना पूर्ण सत्य प्राप्त झालेले आहे. माणसातील अपूर्वतेमुळेच महानता या मानवी देहाला प्राप्त होते. सण, उत्सव, देव, धर्म हे आनंदाने जगण्यासाठी आहेत. जर जन्म आनंदात गेला तर मरणही आनंदातच होईल. तुम्ही आम्ही सगळेजण आनंदाचे पुत्र आहोत. अमृत तुम्हा आम्हामध्ये वास करत आहे. त्या अमृताचे आम्ही वारसदार आहोत. ही मालमत्ता आम्हास ऋषीमुनींनी दिलेली आहे. उपासनेशिवाय ती प्राप्त होऊ शकत नाही. ती जपण्याचे काम आम्हास करण्याचे आहे.

भगवंत भक्तीसाठी उपासना फार महत्त्वाची मानलेली आहे. भगवंतावरील प्रेम हे अविनाशी असते. भगवंत नामाचे धन कोणी हिरावू शकत नाही. त्यासाठी आपल्या उपासनेत प्रेम, श्रद्धा भक्तिभाव पाहिजे. आपल्या मनातील चंचलता रोखण्यासाठी आत्मज्ञान जीवनात फार आवश्यक आहे. भगवंताच्या उपासनेने मन स्थिर होते. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवा. ज्या घरात भगवंताची उपासना होते, ते घर मंदिर आहे. भगवंताचा तेथे वास असतो. चारित्र्यसंपन्न, सुशिक्षित, सुसंस्कृत, बलशाली भारत घडविण्यासाठी दिव्य उपासनेचा सर्वांनी स्वीकार करावा.

(धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी हे श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमीचे पीठाधीश्वर आहेत)

 

 

 

 

Web Title: importance of worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.