वेडी झालो वेडी झालो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:26 PM2018-07-17T23:26:40+5:302018-07-19T13:24:40+5:30

. 'I became crazy mad. - Dindi walking | वेडी झालो वेडी झालो !

वेडी झालो वेडी झालो !

Next

-इंद्रजित देशमुख
 

होतो जयजयकार गर्जत अंबर।
मातले हे वैष्णव वीर रे।।
तुका म्हणे सोपी केली पायवाट।
उतरावया भवसागर रे।।
अशा सात्त्विक आवेशात हा वैष्णवांचा मेळा आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत नातेपुतेहून निघून पुरंदवडे येथील पहिला गोल रिंगण सोहळा अनुभवून माळशिरस येथे विसावणार आहे, तर आमचे जगद्गुरू तुकोबाराय आज सराटीतून निघून माने विद्यालयाजवळील गोल रिंगण सोहळा पार पाडून अकलूजमध्ये विसावणार आहेत.
‘ध्यास हा जिवाला पंढरीसी जाऊ।
रखुमाई देवीवरा डोळे भरून पाहू।’
हा ध्यास मनी धरून आम्ही पंढरीची वाट चालत आहोत. आमच्यासोबत चालणारे काही नवीन वारीला आलेले वारकरी तर हा अनुपम सोहळा पाहून अगदी वेडावून गेलेत आणि खरंच आहे परमार्थात वेडचं व्हावं लागतं. म्हणून तर आमच्या मुक्ताबाई एके ठिकाणी म्हणतात,
‘वेडी झालो वेडी झालो।
वेडीयांच्या गावा आलो।।
आम्हा पुसू नका काही।
आम्ही माणसांत नाही।।
मुक्ताबाई झाली वेडी।
पदर प्रपंचाचा फाडी।।’
मुक्ताईच सांगणंच खूप विलक्षण आहे. तिच्या सांगण्यातील विलक्षण भावामुळेच ताटीचं दार लावून बसलेल्या आमच्या ज्ञानदादांच्या डोळ्यातील पाणी शांत झालं आणि दादांनी ताटीचं लावलेलं दार उघडलं. हळव्या ज्ञानदादांना त्यावेळी लहानग्या मुक्ताईनं समजावलं नसतं, तर ज्ञानदादांनी लावलेलं ते ताटीचं दार या समाजासाठी कधीच उघडलं नसतं. केवढा मोठा उपकार या लहानग्या चिमुरडीचा जिला लहान वयात मुक्ताबाई म्हणजेच बाई म्हणून संबोधलं जातं आणि अविवाहित असताना मुक्ताई म्हणजेच आई म्हणून संबोधलं जातं.
वारकरी संप्रदाय सर्वांना सामावून घेतो. यातील स्त्री संतांचे योगदान सर्वश्रूत आहे. संत शब्दाची निर्मिती मुक्तार्इंनी केली आहे. ताटीच्या अभंगात जग वन्ही असेल तर संतांनी पाणी व्हायचा उपदेश मुक्ताई करतात. ‘विठू माझा लेकुरवाळा’ या सुप्रसिद्ध अभंगात विठ्ठल नामदेवादि भक्तांना संगे घेऊन जात असल्याचे वर्णन आहे. हे भक्त विठ्ठलाच्या खांद्यावर, कडेवर हात धरून वा बोट धरून वा त्याला लगटून चालले आहेत. ज्ञानदेव आणि मुक्ताई माय ‘पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर’ विठ्ठलापासून काही अंतरावरून चालली आहे. ज्ञानदेव पुढे का, तर विठ्ठलाला मार्ग दाखविण्या-करिता आणि मुक्ताई मागे का? तर या मंडळींपैकी कुणी आडवाटेला लागला, रेंगाळला वा थकून बसला तर त्याला सांभाळण्याकरिता. कारण मुक्ताईचा तो अधिकारच आहे.संत बहेणि पंढरीला का जायचे याबद्दल पंढरीचा महिमा सांगताना म्हणतात, पंढरीसारखा क्षेत्रमहिमा कोठेही नाही. कारण पंढरीसारखी चंद्रभागा, भीमातीर, वाळवंटातील हरिकथा कोठे आहेत. तसेच
‘ऐसे हरिदास ऐसे प्रेमसुख ।
ऐसा नामघोष सांगा कोठे ।।
बहेणि म्हणे आम्हा अनाथाकारण ।
पंढरी निर्माण केली देवे ।।
आमच्यासारख्या अनाथांना जे प्रेमापासून वंचित आहेत यांना प्रेमसुखाचा आनंद लुटायचा असेल तर हरिदासांच्या संगतीशिवाय निरपेक्ष प्रेमाचा अनुभव कुठे मिळणार? म्हणूनच देवाने पंढरीची निर्मिती करून आमच्यावर उपकारच केले आहेत. पंढरीच्या वारीत
‘पायी वारी घडो। देह संताघरी पडो।’
या हेतूने वाट चालणाऱ्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. यातील अनेकजणी निरक्षर आहेत. पण, यांच्या चेहºयावरचा भक्तिभाव एवढा दिव्य असतो की, त्यांच्या मुखातून बाहेर पडणाºया ओव्या, अभंग वारीचा व जीवनाचा रस वाढवत चालतात.
‘पंढरीच्या वाटे तुळशी बुक्क्याचा येतो वास।
कसे गं सांगू तुला विठ्ठलाचा गं मला ध्यास।।
पंढरीच्या वाटे दिंड्यांची झाली दाटी।
काय गं सांगू तुला भावाबहिणींच्या होती भेटी।।
ज्यांच्या घरातच पंढरीची वारी आहे, अशातील बहीण-भाऊ वेगवेगळ्या गावांतून आपापल्या दिंडीतून निघतात. एका दिंडीत भाऊ, तर दुसºया दिंडीत बहीण अशांच्या जिवाभावाच्या भेटी या वारीच्या वाटेवरच होत असतात. किंवा अनेक आयाबहिणींना भाऊ नाहीत अशांना जमलेले सर्व वारकरी स्त्री-पुरुष भावाबहिणींचे नाते जपत वाटचाल करतात. या अठरा दिवसांच्या वाटचालीत कुठेही स्त्रीची मानहानी होत नाही, अवहेलना होत नाही.वारीच्या या उत्तरार्धात विठ्ठलाचा रंग सर्वांच्या अंगावर चढतो आहे. विठ्ठलाशी तनामनाने सर्व स्त्री-पुरुष वारकरी एकरूप होतात आणि विसाव्याच्या ठिकाणी या आया-बहिणी कडाकडा बाटे मोडून विठोबाची दृष्ट काढतात.
‘लिंबलोण उतरुनी आता ओवाळीन काया ।
कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया ।।
जना-सखू काढी दृष्ट भक्तीचे ते मोहºया मीठ
प्रपंचाचा आला वीट लागते पाया ।।
कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया।
असा हा निरागस लोभस भाव पाहून मन हरखून जाते.
 

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title: . 'I became crazy mad. - Dindi walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.