आनंदाचे डोही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:51 AM2018-11-21T02:51:07+5:302018-11-21T02:52:45+5:30

आपल्या मनरूपी डोहात ज्या ब्रह्मानंदाच्या लाटा उचंबळून येतात. त्यांचेच जलतीर्थ समाज जीवनास वाटत राहावे हा संतवाणीचा प्रमुख उद्देश आहे. संतांची वाणी ही कैवल्याची खाणी, सौंदर्याची लेणी, चैतन्याची गाणी, मोक्षसुखाची आनंदवाणी आहे.

 Happiness ... | आनंदाचे डोही...

आनंदाचे डोही...

Next

- प्रा. शिवाजीराव भुकेले

आपल्या मनरूपी डोहात ज्या ब्रह्मानंदाच्या लाटा उचंबळून येतात. त्यांचेच जलतीर्थ समाज जीवनास वाटत राहावे हा संतवाणीचा प्रमुख उद्देश आहे. संतांची वाणी ही कैवल्याची खाणी, सौंदर्याची लेणी, चैतन्याची गाणी, मोक्षसुखाची आनंदवाणी आहे. तशी ती दु:ख गिळून आनंदाचे गाणी गाणारी लोकउद्धारक वाणी आहे. आपल्या साक्षात्कारपूर्व व साक्षाकारोत्तर अवस्थेतसुद्धा संतांनी परमेश्वराकडे ‘जों जे वांछील तों ते लाहों प्राणीजात’, ‘आनंदेभरीन तिन्हीलोके’ एवढीच मागणी करून हेच सिद्ध केले की, जो दुसऱ्यासाठी जगतो व दुसºयासाठीच जातो तोच खरा संत आणि तोच खरा आध्यात्मिक महात्मा होय. सर्वच संतांच्या दृष्टीपुढे जे समाज जीवन होते ते उसासे, दु:खाचे कढ, आयुष्याची परवड, उपेक्षेची धुळवड यांनी ग्रासलेले होते. म्हणूनच संतांनी आपल्या वैयक्तिक साधनेबरोबर समष्टीच्या भावनेला महत्त्व दिले. ‘‘बुडती हे जन देखवेना डोळा। येतो कळवळा म्हणौनिया।।’’ हा व्यापक कारुण्यभाव संतांच्या मनीमानसी वसत होता. जेव्हा आपले वैयक्तिक आयुष्य कृतार्थतेच्या पैलतीरावर पोहोचले तेव्हा या अनिर्वचनीय आनंदालासुद्धा शब्दांच्या चिमटीत पकडून विश्वगुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणू लागले,
आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदीच अंग आनंदाचे।
काय सागों झाले काहीचिया बाही।
पुढे चाले नाही आवडीने।
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा।
जेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे।
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा।
अनुभवा सरीसा मुखा आला।।
हे प्रभो! तुझ्या नामरूप गुणकर्माचा आनंद घेता-घेता मीच आता आनंदाचा डोह झालो आहे. माझा सारा देहभाव तुझ्या अस्तित्वाने भरून गेल्यामुळे आता जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी तुझेच आनंदरूप पाहणे हाच खरा ईश्वरी साक्षात्कार होय. मुळात ईश्वरी साक्षात्कार ही प्रक्रियाच ‘‘गुंगे के गुड के समान’’ अशी आहे. गुळाची गोडी मुक्याला कळते; परंतु त्यावर तो शब्दांचे इमले रचून त्याचे रसभरीत शाब्दिक वर्णन करू शकत नाही. आपल्या पोटातील गर्भाची आवड हेच मातेचे डोहाळे असतात ना! तद्वतच पारमार्थिक आनंदाचे सुख शब्दावाचून अनुभवायचे असते. या ज्ञानोबा माउली तुकोबाराय, नामदेवराय यांच्या अनुभूतीच्या पातळीवर जर पोहोचायचे असेल तर आज स्वत:स ईश्वरी साक्षात्कारी समजणाºया मंडळींकडून साक्षात्काराचे उथळ वर्णन थांबले पाहिजे.

Web Title:  Happiness ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.