देहभान विस्मरणातून आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 05:27 PM2019-03-19T17:27:24+5:302019-03-19T17:28:15+5:30

मनगटावरील घडय़ाळात तिनं वेळ पाहिली. घरातून निघायला खूप उशीर झाला होता. मनातली हुरहूर अन् छातीतली धडधड लक्षात येण्याएवढी वाढली होती.

happiness from the disorganization of consciousness | देहभान विस्मरणातून आनंद

देहभान विस्मरणातून आनंद

Next

- रमेश सप्रे

मनगटावरील घडय़ाळात तिनं वेळ पाहिली. घरातून निघायला खूप उशीर झाला होता. मनातली हुरहूर अन् छातीतली धडधड लक्षात येण्याएवढी वाढली होती. तिला एक दृश्य स्पष्ट दिसत होतं. बागेतल्या त्या ठरलेल्या बाकावर तो तिची वाट पाहत बसलाय. तोही परत परत घडय़ाळात पाहतोय. जाणा-या प्रत्येक सेकंदाबरोबर त्याच्या मनातला राग आणि अधीरता दोन्हीही वाढताहेत. 

झपझप पावलं टाकत ती चाललीय. समोरचं, आजूबाजूचं काहीही दिसत नाहीये तिला. मनात फक्त एकच ध्यास आहे त्याला भेटण्याचा आणि एकच ध्यास आहे त्यानंतरच्या मीलनानंतर मिळणा-या आनंदाचा. बाकी तिच्या दृष्टीनं सा-या विश्वात काहीही अस्तित्वात नाहीये. एकच ध्यास, एकच ध्यान प्रत्यक्ष भेटीच्या क्षणाचं. नंतरचा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असणार होता. त्यात निर्भेळ आनंद असणार होता. 

आपला पाय दगडावर पडतोय का मातीवर, गवतावर पडतोय की छोटय़ा झुडपावर याची तिला जाणीवही नव्हती. तशी फिकीरही नव्हती. एका देहभावनाशून्य अवस्थेत ती बाणासारखी निघाली होती, त्याच्याकडे. तिच्या प्रियकराकडे, तिच्या प्रेमाकडे. 

सायंकाळच्या वेळच्या नमाजासाठी वाटेवरच्या छोटय़ाशा मशिदीतला मौलवी मशिदीसमोरच्या छोटय़ाशा मैदानात, रस्त्याच्या बाजूलाच नमाज पडत होता. तो नम्रतापूर्वक खाली वाकून डोकं जमिनीला टेकवून प्रार्थना करत असतानाच त्याच्या पाठीवर धपकन काही तरी पडलं. काहीशा रागानं त्यानं वर पाहिलं तर त्या प्रेमाच्या भावात आकंठ बुडालेल्या, मीलनाच्या कल्पनेनं देहभान विसरलेल्या त्या तरुणीचा पाय त्याच्या पाठीवर पडला होता. तिच्या लक्षात सुद्धा ही गोष्ट आली नाही. रागानं काही तरी बोलणार तोपर्यंत ती काहीशी दूर पोचली होती. तसा तो मौलवी तिला नेहमी पाहायचा. त्यानं विचार केला घरी याच वाटेनं परतेल तेव्हा तिला जाब विचारू या. काही काळ अशाच अस्वस्थतेत गेला. तिचा उशीर झाला म्हणून तर मौलवीचा तिनं पाठीवर पाय दिला म्हणून अन् तोही ज्यावेळी तो प्रार्थना करत होता. 

काही वेळानंतर ती परत येताना त्याला दिसली. समोर आल्यावर त्यानं तिला वरच्या स्वरात विचारलं, ‘आंधळी आहेस का तू? चक्क माझ्या पाठीवर पाय देऊन गेलीस. त्यावेळी मी नमाज पढत होतो हेही तुझ्या लक्षात आलं नाही’ त्याच्या या शब्दावर तिचा विश्वासच बसेना. कोण असं दुस-याच्या पाठीवर पाय देऊन जाईल अन् तेही प्रार्थना करताना नतमस्तक झालेला असताना? तिला आश्चर्य वाटलं. तरी सावधपणे ती म्हणाली, ‘मी खरंच तुम्ही म्हणता त्या प्रमाणे तुमच्या पाठीवर पाय देऊन गेले असेन तर कृपया मला क्षमा करा. मी आपल्याकडे हात जोडते; पण माझ्याकडून असं का घडलं याचा विचार करताना एक प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो, ‘मी जर माझ्या माणूस असलेल्या प्रियकाराच्या ध्यानात भान हरपून, आपण चालताना आपली पावलं कशावर पडताहेत याचीही जाणीव मला नव्हती; पण आपण तर परमेश्वराच्या ध्यानात मग्न  होता ना? त्याची प्रार्थना करताना त्याच्याशी एकजीव एकात्म होताना देहाच्या पातळीवर घडणा-या अनुभवांची तुम्हाला कशी जाणीव झाली? खरं तर तुमचं पूर्ण देहभान हरपायला हवं होतं. सारी देहभानता लयाला जायला हवी होती. खरं ना?

तिच्या या शब्दांनी त्याचा सारा राग वितळून गेला. तो विचार करू लागला. कारण त्या तरुणीनं जे विचारलं ते खरोखर विचार करायला लावणारच होतं. त्याला उपासनेबद्दल नवी दृष्टी मिळाली होती. ‘मुली तू आज माङो डोळे उघडलेस. माझा अहंकार नष्ट केलास. मी तुला धन्यवाद देतो. शुक्रिया!’

प्रसंग वरवर साधा वाटला तरी अनुभवाच्या पातळीवर खूप अर्थपूर्ण आहे. ध्यानातून आनंद मिळतो. त्याला बाहेरचं कारण किंवा निमित्त असलंच पाहिजे असं नाही; पण देहभावनेचा विसर मात्र पडायला हवा. 

भक्तीचे आचार्य देवर्षी नारद आपल्या ‘भक्तीसूत्रात’ भक्तीचे अनेक पैलू सांगतात. आदर्श भक्तीची लक्षणंही सांगतात. खूप सांगून झाल्यावर ते म्हणतात ‘भक्ती कशी असते हे पाहायचं असेल तर गोकुळातल्या गोपींकडे पाहा.’ अडाणी, गरीब गवळणी भक्तीच्या बाबतीत खूप श्रीमंत होत्या. फार विचार न करता आपलं सर्वस्व त्यांनी कृष्णाला अर्पण केलं होतं. यात ‘सर्व’ म्हणजे सारा संसार याला महत्त्व नव्हतं. तर आपला ‘स्व’, आपला ‘अहं’ त्यांनी कृष्णभक्तीत विलीन करून टाकला होता. आता त्या पूर्णरित्या, मोकळ्याही झाल्या होत्या आणि कृष्णासारख्या विश्वनाथ विश्वात्म्याला आपल्या आत गच्च भरून ठेवल्यानं भक्तीच्या आनंदानं पूर्ण भरून राहिल्या होत्या. आनंदाचं मूर्त रूपच बनल्या होत्या गोपी. 

सतत कृष्णभान, कृष्णध्यान, कृष्णार्पण असल्यामुळे त्या बनल्या होत्या भक्तीच्या यमुनेतील आनंदाचा डोह. आनंदाचं अंग नि आनंदाचा तरंग!

Web Title: happiness from the disorganization of consciousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.