ज्ञानग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:21 AM2019-01-18T06:21:41+5:302019-01-18T06:21:46+5:30

- वामन देशपांडे शारीर भावनेने जगणारे जीव सहसा मोहग्रस्त आयुष्य जगत असतात आणि हीच मोहग्रस्त माणसे इंद्रियांच्या वासनांना, त्यांच्या ...

Gyan enclosure | ज्ञानग्रहण

ज्ञानग्रहण

Next


- वामन देशपांडे
शारीर भावनेने जगणारे जीव सहसा मोहग्रस्त आयुष्य जगत असतात आणि हीच मोहग्रस्त माणसे इंद्रियांच्या वासनांना, त्यांच्या पूर्तीसाठी शरण जातात. कारण एकच त्यांची बुद्धी आणि मन या वासनाग्रस्त इंद्रियांना त्यांची वासनातृप्ती व्हावी म्हणून मदत करतात. साधकाने प्रथम या चंचल मनाला आणि वासनातृप्ती व्हावी म्हणून सुसाट वेगाने धावणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ज्ञानसाधना करणे, तत्त्वज्ञानाची प्राप्ती करून घेणे, मुख्य म्हणजे अज्ञान भारल्या विचारांचा नाश करणे आवश्यकच आहे. त्यासाठी प्रथम तत्त्वज्ञानी महापुरुषाच्या सान्निध्यात अधिक काळ घालवून ते तत्त्व समजून घेत, त्यांना पूर्णांशाने शरण जायला हवे. तेव्हाच ते तत्त्वज्ञानी महापुरुष शुद्ध ज्ञानाचा अंत:करणपूर्वक उपदेश करतात. भगवंत अर्जुनाला निखळ सत्य सांगतात की,


न हि ज्ञानेन सद्दशं पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्ममि विन्दति।


पार्था, मानवी आयुष्यात ज्ञानग्रहणाइतके पवित्र साधन दुसरे कुठलेच नाही. शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून घेणे, हेच आपल्याकरिता असलेल्या साधनेचा प्रधान हेतू हवा. ज्याला निष्काम कर्मयोग साध्य झाला आहे, त्याला ज्ञानयोग अवश्य प्राप्त होतो. जो ज्ञानी असतो, तोच कर्मयोगी असतो... परमात्मा परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांड व्यापूून आणि तोच परमात्मा सूक्ष्म आत्मस्वरूपात प्रत्येक जीवात नांदतो आहे. या परम तत्त्वाचे ज्ञान होणे, ही प्रत्यक्ष अनुभूती होणे, हे आपण करीत असलेल्या साधनेचे अत्युत्तम फळ आहे. परब्रह्म निर्गुणनिराकार आहे, तसेच परमात्मा हा सगुण साकार आहे याची प्रचिती यावी लागते. त्यासाठी मनाची निर्द्वंद्व अवस्था प्रथम यावी लागते. राग, द्वेष, अहंकार तसेच शरीरात ठाण मांडून बसलेले ‘मी’पण जर पूर्णपणे संपुष्टात आणायचे असेल तर त्यासाठी प्रथम निर्द्वंद्व अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. तेव्हाच परमात्म्याच्या नामात चित्ताला गुंतवता येते. तेव्हाच संसारबंधन तटातटा तुटते. प्रपंच बंधनकारक होत नाही. एकदा का भगवंताविषयी अपार प्रेम जर निर्माण झाले की भोवतीच्या सर्व जीवांविषयी आत्मीयता वाटू लागते. भगवंत प्रत्येक जीवात नांदतो आहे याचे भान येते. भगवंत म्हणतात,


त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।
निर्द्वंद्वोे नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान ।।


पार्था, वेद तर सत्त्व-रज-तम या तीन गुणांचे त्यांच्या स्वभावानुसार मानवी आयुष्य कार्यान्वित होते, त्याचेच प्रामुख्याने वर्णन करतात. माणूस मूलत: त्रिगुणाधिष्ठितच आहे. पार्था तू त्रिगुणातीत हो. निर्द्वंद्व अवस्था प्राप्त करून घे. षडरिपूंपासून मुक्त हो. तू परमात्म्यात विलीन हो. योगक्षेमाची काळजी करू नकोस...
कर्म करीत असतानाच, करीत असलेल्या विहित कर्मापासून आणि कर्मफलापासून अलिप्त होणे ही निर्लिप्त कर्म करण्याची वृत्ती साधकाला ज्ञानमार्गावर अलगदपणे आणून सोडते. साधकाने हे लक्षात ठेवायला हवे की, कामनाग्रस्त कर्मे, पापकर्मे म्हणजे निषिद्ध कर्मे होतात. ही पापकर्मेच तर संचित पुण्याचा ºहास
करतात. यासाठी निष्काम कर्मयोग जर साधकांनी आचरणात आणला तरच मोक्षप्राप्तीच्या दिशेने साधकाला वेग येतो.


भगवंतांनी मोठ्या प्रेमाने महत्वाचा विचार दिला की, गहना कर्मणो गति: ।।गीता।। ४ :१७ ।।
पार्था, तुला मी एकच निखळ सत्य सांगतो की, आपण जेव्हा कर्म करीत असतो तेव्हा करीत असलेल्या कर्मापासून मनाने अलिप्त होत, कर्म पूर्ण करणे हाच खरा, कर्माचे तत्व जाणून घेत कर्म करीत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर निर्लेप मनाने कर्म करणे म्हणजे अकर्माला जाणून घेणे आहे. त्यात ‘मी’पण संपुष्टात आलेले असते.

Web Title: Gyan enclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.