Guru Purnima : जाणून घ्या काय आहे गुरूपौर्णिमेचं महत्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 09:39 AM2019-07-16T09:39:46+5:302019-07-16T09:45:25+5:30

आषाढी पौर्णिमेला गुरू पौर्णिमा म्हणतात. आपल्या हिंदू संस्कृतीत गुरूचे फार मोठे स्थान आहे. गुरू हा परमेश्वर, परब्रम्ह आहे असे म्हटले आहे.

Guru Purnima : You should know the importance of guru purnima | Guru Purnima : जाणून घ्या काय आहे गुरूपौर्णिमेचं महत्व!

Guru Purnima : जाणून घ्या काय आहे गुरूपौर्णिमेचं महत्व!

Next

आज देशभरात गुरूपौर्णिमा साजरी केली जात आहे. शाळा, कॉलेजेसमध्येही गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आज आपल्या गुरूंना वंदन केलं जातं. पण अनेकांना गुरूपौर्णिमेचं महत्व माहीत नसतं. त्यामुळे आज गुरूपौर्णिमेचं महत्व जाणून घेऊ.

आषाढी पौर्णिमेला गुरू पौर्णिमा म्हणतात. आपल्या हिंदू संस्कृतीत गुरूचे फार मोठे स्थान आहे. गुरू हा परमेश्वर, परब्रम्ह आहे असे म्हटले आहे. आपल्याला जो विद्यादान देतो, ज्याच्या भरवशावर आपण आपल्या कुटुंबाचा, समाजाचा व राष्ट्राचा उध्दार करतो अशा गुरूचा आदर करणे, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. 

सर्व ज्ञानाचा उगम व्यासमुनी पासून होतो अशी धारणा असल्यामुळे गुरू परंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. हा सण महर्षी व्यासांच्या काळापासून सुरू झाला म्हणून याला व्यासपौर्णिमाही म्हणतात. आद्य शंकराचार्य हे व्यास मुनींचे अवतार आहेत. या श्रध्देने संन्यासी मंडळी शंकराचार्यांचाही या दिवशी पूजा करतात. याच दिवशी दिक्षागुरू, माता, पित्याचीही पूजा करण्याची पध्दत आहे. 

या दिवशी गुरूकडे जाऊन त्यांना वंदन करावे. त्यांची पूजा करावी व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांचे सव्दिचार श्रवण करावे व आपल्या जीवनामध्ये मदत कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी. ज्याप्रमाणे मुलगा अथवा मुलगी कर्तबगार निघाल्यावर आईबाबांना आनंद होतो. त्याप्रमाणे आपल्या शिष्याचे कर्तृत्व ऐकून गुरूला परमानंद होतो. 

ज्यांचे गुरू हयात नाहीत त्यांनी गुरूच्या फोटोला हार घालून त्यांचे स्मरण करावे. गुरू आपल्याला ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो व ज्ञानाशी एकरूप करून टाकतो असे पूज्य साने गुरूजी म्हणतात. गुरू म्हणजे ज्ञानी. गुरू म्हणजे दयेचा सागर. प्रेमाची, वात्सल्याची मूर्ती अशा या गुरूचे पूजन म्हणजे सत्याचे, ज्ञानाचे पूजन होय.

गुरूपौर्णिमेचे शुभेच्छा मेसेजेस

१) होता गुरूचरणाचे दर्शन मिळे आनंदाचे अंदन...

२) गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: जय गुरुदेव …।

३) सर तुमची कमी मला आज भासत आहे कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे  गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा.

४) गुरूविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट 

५) गुरु हा संतकुळीचा राजा। गुरु हा प्राणविसावा माझा।

६) आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर,  मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे,  कोणी दुःखी असु नये,  गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

७) आदी गुरुसी वंदावे |  मग साधनं साधावे||१|| गुरु म्हणजे माय बापं |  नाम घेता हरतील पाप||२|| गुरु म्हणजे आहे काशी |  साती तिर्थ तया पाशी||३|| तुका म्हणे ऐंसे गुरु |  चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||

Web Title: Guru Purnima : You should know the importance of guru purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.