Governor's invitation invitation letter | गव्हर्नरच्या भेटीची निमंत्रण पत्रिका

ठळक मुद्देनिमंत्रकाचं नाव सगळ्यात शेवटी लिहिलं होतं: कितागाकी, क्योतो प्रांताचे गव्हर्नरकेईचूनी ती निमंत्रण पत्रिका बघितली आणि उत्तर दिलं की अशा कुणाही व्यक्तिशी माझा काहीही संबंध नाहीये

जपानमध्ये मेईजी कालखंडात केईचू नावाचे एक झेन गुरू होते. क्योते मधल्या तोफुकू या आश्रमाचे ते प्रमुख होते. एकदा क्योतो प्रांताच्या गव्हर्नरना केईचूना भेटण्याची इच्छा झाली. ती त्यांची पहिलीच भेट असणार होती.

गव्हर्नरचा संदेश घेऊन त्यांचा सहकारी केईचू यांच्या आश्रमात आला. त्यानं गव्हर्नरनी पाठवलेलं निमंत्रणाचं पत्र केईचू यांना दिलं. त्या निमंत्रण पत्रिकेवर निमंत्रकाचं नाव सगळ्यात शेवटी लिहिलं होतं: कितागाकी, क्योतो प्रांताचे गव्हर्नर.

केईचूनी ती निमंत्रण पत्रिका बघितली आणि उत्तर दिलं की अशा कुणाही व्यक्तिशी माझा काहीही संबंध नाहीये. ताबडतोब इथून चालता हो, मला नाही अशा माणसाला भेटायची इच्छा!

गव्हर्नरच्या तो सहकारी निमंत्रण पत्रिका परत घेऊन गेला व दिलगिरी व्यक्त करत त्यानं घडला प्रकार गव्हर्नरना सांगितला. निमंत्रण पत्रिकेवर एक नजर टाकल्यावर गव्हर्नर म्हणाले, अरे चूक माझीच आहे. त्यांनी एक पेन्सिल घेतली आणि क्योतो प्रांताचे गव्हर्नर हे शब्द खोडून टाकले. त्यांनी पुन्हा ते निमंत्रण केईचू यांना धाडलं.

यावेळी निमंत्रण पत्रिका हातात पडताच केईचू म्हणाले, अरे कितागाकीनं बोलावलंय का?   मला भेटायला आवडेल की त्याला!