आनंद तरंग - दु:खाचा स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 06:19 AM2019-06-14T06:19:05+5:302019-06-14T06:20:59+5:30

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे.

GLAD WATER - Acceptance of grief | आनंद तरंग - दु:खाचा स्वीकार

आनंद तरंग - दु:खाचा स्वीकार

Next

विजयराज बोधनकर

सुखदु:खाचा खरा मेळ म्हणजेच खरं जीवन. दु:खाला डावलून आयुष्य पूर्णत्वाकडे जाऊच शकत नाही. फक्त सुखाचीच इच्छा मानवी मनात असेल तर ते अर्धसत्य असेल. रात्र काळी व दिवस प्रकाशमान हे जसे परिमाण आहे़ तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुखाचे गणित ठरलेले असते. जो नोकरीत खडतर कष्ट घेतो, सुखाच्या क्षणांचा त्याग करतो त्याच्या जीवनप्रवासात पुढे सुखाचा प्रकाश दिसतो. विद्यार्थी अवस्थेत जो सर्व सुखांचा त्याग करून फक्त अभ्यास आणि चिंतनात मनबुद्धी रमवितो त्याचे फळ त्याला परीक्षेतल्या उत्तम मार्कात किंवा यशात परावर्तीत झालेले आपण पाहतो. म्हणजेच त्याच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश येत राहतो.

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे. दोन प्रकारचे विचार माणूस सतत करीत राहतो. एखादा विद्यार्थी मनातल्या मनात म्हणतो की मला निसर्गाने बुद्धीचे वरदान दिले आहे, त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर परीक्षेत यश मिळविणारच. या निश्चयाने तो अभ्यासाच्या प्रक्रियेला लागतो आणि खरोखरच यश प्राप्त करून दाखवितो. परंतु एखादा विद्यार्थी निराशाजनक विचार करून मनातल्या मनात विचार करतो आणि स्वत:लाच सांगतो की हा अभ्यास माझ्या आवाक्याबाहेर असल्याने मला यश मिळविणे शक्य होणार नाही; आणि त्याचे पडसाद असे उमटतात की त्याच्या नकारार्थी विचारसरणीमुळे त्याच्या पदरी अपयशच पडते. म्हणजेच जसा संकल्प असतो तसेच फळ पदरी पडते. प्रथम त्यागाची भूमिका स्वीकारली की भोगाची सर्व लक्षणे गळून पडतात; आणि त्यानंतर सत्शील कृतीचे मार्ग आपल्यासाठी सहजरीत्या खुले होतात. म्हणजेच सुखदु:खाचा मेळ असल्याशिवाय किंवा स्वीकारल्याशिवाय खऱ्या जीवनाला प्रारंभच होऊ शकत नाही. तात्पर्य काय तर प्रथम दु:खाचा स्वीकार म्हणजेच सुखाला आकार प्राप्त करून घेणे होय़
 

Web Title: GLAD WATER - Acceptance of grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.