गीता संदेश – २

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 10:35 AM2017-12-03T10:35:02+5:302017-12-03T10:35:02+5:30

श्रीमद् भगवद्गीतेमध्ये दोन संवाद आहेत. एक धृतराष्ट्र - संजयाचा तर दुसरा श्रीकृष्ण - अर्जुनाचा. धृतराष्ट्र – संजयाचा संवाद हा दोन मित्रांचा संवाद म्हणता येणार नाही कारण संजय हे महाराज धृतराष्ट्र यांचे मंत्री होते. दुसरा कृष्णार्जुन संवाद हा आपल्याला अभिप्रेत असलेला दोन मित्रांचा संवाद आहे.

Gita message - 2 | गीता संदेश – २

गीता संदेश – २

Next

- स्वामीनी निश्चलानंदा सरस्वती
(आचार्य चिन्मय मिशन)

श्रीमद् भगवद्गीतेमध्ये दोन संवाद आहेत. एक धृतराष्ट्र - संजयाचा तर दुसरा श्रीकृष्ण - अर्जुनाचा. धृतराष्ट्र – संजयाचा संवाद हा दोन मित्रांचा संवाद म्हणता येणार नाही कारण संजय हे महाराज धृतराष्ट्र यांचे मंत्री होते. दुसरा कृष्णार्जुन संवाद हा आपल्याला अभिप्रेत असलेला दोन मित्रांचा संवाद आहे.

मैत्रीसंबंधी सुभाषितकार म्हणतात - 'समानशीले व्यसनेषु सख्यम्'. दोन सुशील व्यक्ती मध्ये किंवा समान व्यसन वा समान छंद असणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये सख्य (मैत्री) होऊ शकते. आपली मैत्री अशीच दोन जीवांमधील मैत्री असते. पण कृष्णार्जुनाची मैत्री आगळीच आहे. हे दोन सुहृद आहेत. जो वेळप्रसंगी आपल्या मैत्रीला पणाला लावून वा स्वत:चे अहित करूनसुद्धा मित्राचे हित करतो त्याला सुहृद म्हणतात. कृष्णार्जुन हे सुहृद आहेत.

कृष्णार्जुनाच्या सख्याचे आणखीन एक आगळेपण आहे. ह्यातील एक ईश्वर (भगवान श्रीकृष्ण) व दुसरा जीव (अर्जुन) आहे. ही जीवेश्वर मैत्री आहे. दोघे मूलत: एक चेतनतत्वच आहेत. पण एक ईश्वर म्हणजेच सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी चेतन आहे तर दुसरा जीव म्हणजेच अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, अल्पव्यापी चेतन आहे.

जीवाने कितीही ज्ञान संपादन केले तरी तो सर्वज्ञ होऊ शकत नाही कारण जसजसे तो एका विशिष्ट ज्ञानामध्ये (specialisation) खोल उतरु लागतो तसतसे अन्य अर्जित ज्ञानाचे त्याला विस्मरण होऊ लागते. ही जीवाच्या बुद्धिची त्रुटि आहे. आपण नेहमी म्हणतोच ‘पुढचे पाठ मागचे सपाट’.

जीवाची अल्पशक्तिमानता पण आपल्या परिचयाची आहे. जसे शारीरिक स्तरावर एखादा आडदांड माणूस रात्रीच्या वेळी येताना दिसला तर आपण गर्भगळीत होतो. आपली अगदी घाबरगुंडी उडते. आपली मानसिक शक्ती विचलित करण्यासाठी एखादे झुरळ वा पाल पण पुरेशी असते.

जीवाच्या शरीराचे जेवढे आकारमान असते तेवढीच त्याची व्यापकता असते. तो कितीही जाड झाला तरी सर्वव्यापी होऊ शकत नाही. पण ‘मी आहे’ हे भान जीवाला असते. हे अस्तित्वाचे भान चेतनतत्वाचे द्योतक आहे. हे भान जीव व ईश्वरामध्ये समान असते.

ईश्वर हा सर्वज्ञ आहे कारण ज्ञान हे त्याचे स्वरूप आहे व त्या ज्ञानाला देश, काळ, बुद्धी मर्यादित करू शकत नाहीत. तो सर्वशक्तिमान आहे म्हणून त्याचे वर्णन ‘कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्’ असे केले जाते. तसाच तो सर्वव्यापी आहे कारण संपूर्ण विश्व हाच त्याचा देह आहे. तो सर्वत्र आहे. त्याला देशकाळाच्या मर्यादा नसतात.

ईश्वर-जीवाच्या ह्या मैत्रीमध्ये जसजसा जीवाला (अर्जुनाला) श्रीकृष्णामधील ईश्वराचा परिचय गीतोपदेशामध्ये होऊ लागला तसतशी ही मैत्री ईश्वर-भक्त, गुरु-शिष्य ह्या नात्यांमध्ये परिवर्तित होत गेली व १८ व्या अध्यायामध्ये अर्जुन ‘करिष्ये वचनं तव’ म्हणत शरणागत झाला. अर्जुनामध्ये हे परिवर्तन गीतोपदेशामुळे झाले. प्रारंभी कर्तव्यभ्रम झालेला अर्जुन गीतेच्या शेवटी कर्तव्यभ्रमाचा निरास होऊन कर्तव्य (युद्ध) करण्यासाठी सज्ज झाला. कर्तव्याभिमुख झाला. कर्तव्यदक्ष होऊन त्याने अधर्माचा बीमोड केला.

आपण जेव्हा एखाद्या गोष्टीशी निगडित होतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट आपली (interesting) वाटू लागते. जसे रस्त्यावरुन लग्नाची वरात चालली असेल तर आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. पण वरातीत आपला मित्र किंवा नातेवाईक सामील झालेला दिसला तर लगेच आपण त्या वरातीची चौकशी करायला सुरुवात करतो. म्हणून गीता समजून घेण्यासाठी गीतेशी मनापासून जोडले जाणे क्रमप्राप्त आहे. भगवान श्रीकृष्णापेक्षा अर्जुन हा आपल्याला अधिक जवळचा वाटतो कारण रोजच्या जीवनामध्ये आपण ही कर्तव्यभ्रमाच्या भोवऱ्यात अनेकदा अडकत असतो. हे करावे की ते करावे असा भ्रम आपल्याला नेहमीच होत असतो. कित्येकदा आपण योग्य निर्णयही घेऊ शकत नाही. ह्या आपल्या समस्येवर उपाय म्हणून आपण अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्ण भगवंताशी मैत्री केली तर आपणही भवसागर लीलया (सहज) पार करू शकतो.

जी गाईली जाते तिला गीता म्हणतात. ह्या गीतेचे गान भगवान श्रीकृष्णांनी स्वत: केले म्हणून ह्या गीतेला भगवद्गीता म्हटले आहे. अर्जुनाच्या व्यक्तिमत्वात झालेली प्रासंगिक विकृति (distortion) भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून दूर केली. त्यामुळे अर्जुन हा एक सुसंघटित व्यक्तिमत्वाचा योद्धा म्हणून उभा राहिला व त्याने अपेक्षित यश आपल्याकडे खेचून आणले. ह्या सर्व गोष्टींमधून भगवद्गीता ही जीवन कसे जगावे (Art of Living) हयाची शिकवण देते असे निदर्शनास येते. ह्यातून एका यशस्वी, तृप्त, आनंददायक, उज्ज्वल जीवनाचा उदय होतो.

आपल्यालाही अशाच जीवनाची प्रतीक्षा असते म्हणून आपणही गीताध्ययनाने आपले व्यक्तिमत्व सुसंघटित करून, कर्तव्यदक्ष होऊन आपल्या जीवनाचे सोने करुया.

Web Title: Gita message - 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.