गीता संदेश – १

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 30, 2017 4:57pm

“गीता संदेश” ह्या श्रीमद् भगवद्गीतेसंबंधीत लेखमालेचा प्रारंभ आपण आज गीता जयंतीच्या शुभ मुहूर्तावर करीत आहोत. प्रत्येक कृतीच्या यशात मानवी प्रयत्नासह ईश्वराच्या कृपेचा वाटा अधिक प्रमाणात असतो. म्हणून ‘गीता संदेश’ च्या यश प्राप्तीसाठी आपण वरील नमनाच्या श्लोकांद्वारे प्रार्थना करीत आहोत. 

- स्वामीनी निश्चलानंदा सरस्वती (आचार्य चिन्मय मिशन)

ॐ    प्रारंभी विनती करू गणपति विद्या दयासागरा ।       अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा ।।     चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी ।     हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहू तोषवी ।।१।। ॐ    चिन्मयं व्यापियत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।      तत्पदं दर्शितम् येन तस्मै श्रीगुरवे नम: ।।२।। ॐ    नारायणं नमस्कृत्त्यं नरं चैव नरोत्तमम् ।     देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ।।३।। ॐ    वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।      देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ।।४।। ॐ    मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।     यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।५।।  ॐ    मी प्रार्थिते कृष्ण परमेश्वरासी ।     मज बोधवावे गीताज्ञानामृतासी ।।६।। ॐ    गीता माऊली तू तुझ्या अमृतासी ।  स्नेहे पाजवी ह्या दीन पामरासी ।।७।।     “गीता संदेश” ह्या श्रीमद् भगवद्गीतेसंबंधीत लेखमालेचा प्रारंभ आपण आज गीता जयंतीच्या शुभ मुहूर्तावर करीत आहोत. प्रत्येक कृतीच्या यशात मानवी प्रयत्नासह ईश्वराच्या कृपेचा वाटा अधिक प्रमाणात असतो. म्हणून ‘गीता संदेश’ च्या यश प्राप्तीसाठी आपण वरील नमनाच्या श्लोकांद्वारे प्रार्थना करीत आहोत.      ‘गीता संदेश’ चे लेखन व आकलन निर्विघ्नपणे व्हावे ह्यासाठी बुद्धिदाता गणपती, देवी सरस्वती, भगवान नारायण, महाभारत ग्रंथाचे रचनाकार – महर्षि वेदव्यास मुनि, ‘कर्तुम्, अकर्तुम् वा अन्यथा कर्तुम्’ जगद्गुरु  कृपाळू श्रीकृष्ण भगवंत, नरश्रेष्ठ अर्जुन व आपली गीतामाऊली ह्या सर्वांना आपण वंदन करून त्यांच्या कृपादृष्टीच्या छायेमध्ये ‘गीता संदेश’ ह्या लेखमालिकेचा आरंभ करुया.      काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे . एका विस्तृत मैदानावर श्रीमद् भगवद्गीतेवर प्रवचने चालू होती . श्रोतेगण अगदी तल्लीन झाले होते. अशावेळी जवळच्याच रस्त्याने एक अवधूत साधू महाराज जात होते. त्या मैदानाकड़े दृष्टीक्षेप करीत त्यांनी किंचितसे स्मित केले. बरोबरच्या चाणाक्ष शिष्याने ते हेरले व प्रश्न केला – ‘महाराज, आपण स्मित का केलेत ?’ साधू महाराज म्हणाले ‘इथे श्रीमद् भगवद्गीतेवर प्रवचने होत आहेत’. शिष्य म्हणाला ‘मग ?’ साधू महाराज म्हणाले ‘अरे, गीता हा काय प्रवचनाचा विषय आहे ? तो तर दोन मित्रांचा संवाद आहे'.       एकीकडे जिच्यावर प्रवचने होत आहेत तर दुसरीकडे जिला मित्रांचा संवाद म्हणत आहेत अशी भगवद्गीता आहे तरी काय? हे संक्षिप्त रूपात बघूया.      श्रीमद् भगवद्गीता ही मानव उद्धारासाठी प्रसिद्ध प्रस्थानत्रयीमधील एक प्रस्थान आहे. एक अलौकिक, गहन व दिव्य ग्रंथ आहे.      श्री मधुसूदन सरस्वती रचित ‘गीता ध्यान’ श्लोकांमध्ये गीतेचे महात्म्य वर्णन केले आहे.  ते म्हणतात ‘अम्ब त्वाम् अनुसंदधामि’ अर्थात हे माते भगवद्गीते, मी तुझे सतत ध्यान करतो. तू ‘अद्वैतामृतवर्षिणीम्’ म्हणजे अद्वैत (तत्वज्ञान) रूपी अमृताचा वर्षाव करणारी आहेस. तसेच ‘भवद्वेषिणीम्’, जन्ममृत्यूरूपी संसाराचा नाश करून मोक्ष देणारी आहे. ते पुढे म्हणतात –                  सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:                 पार्थो वत्स: सुधिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।।      हे एक गोदोहनाचे रूपक आहे. सर्व उपनिषदे ह्या गायी आहेत तर गीतारूपी अमृत हे दूध आहे. म्हणजेच सर्व उपनिषदांचे सार गीतेच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध केलेले आहे. नन्दगोपाळाचा पुत्र श्रीकृष्ण हा गायीचे दोहन करणारा आहे. ‘गो’ चा एक अर्थ इंद्रिय असा पण होतो, त्यामुळ॓ इंद्रियांचे पालक जे अंत:करण, त्याला आनंद देणारा अंतर्यामी श्रीकृष्ण गोदोहक आहे. गायींचा पान्हा द्रवित करणारे वासरु अर्जुन आहे. दुग्धपानाबरोबर दुधाची पाचन क्षमता असेल तरच दूध अंगी लागते म्हणून ह्या गीतामृत दुधाचे रसपान करणाऱ्या  व्यक्ति ह्या सूक्ष्मबुद्धियुक्त आहेत.                                                                                                                          उपनिषद गायी, अर्जुन वत्स, गीतारूपी दूध, गोदोहक स्वयं भगवान श्रीकृष्ण व मोक्षार्थी भोक्ता अशा ह्या अलौकिक भगवद्गीतेला साधू महाराजांनी दोन मित्रांचा संवाद संबोधून अतिशय सोपे आणि सुकर केले आहे.      ‘गीता संदेश’ ह्या भगवद्गीतेवरील लेखमालिकेत हे सोपेपण जपून श्रीमद् भगवद्गीता सर्वांसाठी सुकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.      आता हे मित्रद्वय आणि त्यांची मैत्री आपल्यासारखीच आहे का ?  हे पुढील लेखामध्ये पाहू...

संबंधित

आनंदाचे डोही...
अखंड आनंदाचं रहस्य... विसरून जाल दुःख 
सुखकर प्राणायाम
मनाला सत्कार्यात व सद्विचारात प्रवृत्त करणारा...संतांचा विवेक
ईश्वराचा अनुभव

आध्यात्मिक कडून आणखी

स्वप्नीचिया घाया विव्हळे जो साचे
त्यागावाचून वैराग्य?
जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा
आकाशीय साधने
जगू आनंदे -या जन्मावर - या जगण्यावर शतदा प्रेम करावे..

आणखी वाचा