मना लागलीया छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:46 PM2019-02-14T12:46:36+5:302019-02-14T12:46:40+5:30

छंद म्हटले कि आपल्या डोळ्यापुढे एक वेगळीच प्रतिमा उभी राहते. ती म्हणजे असा कोणीतरी एक मनुष्य कि जो आपल्याच विचारामध्ये अथवा तंद्रीमध्ये असतो किंवा एखादा विषय त्याच्या जीवनामध्ये असा असतो कि त्या विषयापुढे त्याला कशाचीही पर्वा नसते, त्याच्याशिवाय त्याला काहीही आवडत नाही,

Forbidden verses | मना लागलीया छंद

मना लागलीया छंद

googlenewsNext

छंद म्हटले कि आपल्या डोळ्यापुढे एक वेगळीच प्रतिमा उभी राहते. ती म्हणजे असा कोणीतरी एक मनुष्य कि जो आपल्याच विचारामध्ये अथवा तंद्रीमध्ये असतो किंवा एखादा विषय त्याच्या जीवनामध्ये असा असतो कि त्या विषयापुढे त्याला कशाचीही पर्वा नसते, त्याच्याशिवाय त्याला काहीही आवडत नाही, त्याचा सर्वात जास्त आवडीचा विषय तोच असतो मग लोक त्याला वेडा, छंदिष्ट समजतात. अशा छंदिष्ट मनुष्याला जगाची पर्वा नसते. असा हा छंद नावाचा प्रकार वेगळाच आहे आणि महत्वाचा आहे. जीवन हे कसे छंदबद्ध असलेच पाहिजे. संस्कृतमध्ये छंद या शब्दाचा अर्थ लय असा होतो व लय दाखवण्यासाठी छंद हा शब्द योजिला आहे. छंदातील गुण अवगुण, रचना याच्या अभ्यास शास्त्रास छंदशास्त्र म्हणतात. आचार्य पिंगल यांनी छंद शास्त्राची रचना केली आहे व हि सर्वात प्राचीन समजली जाते. छंदाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत १) मांत्रिक छंद २) वर्णिक छंद ३)वर्णवृत्त छंद ४)मुक्त छंद छंदामुळे हृदयाला सौंदर्य बोध होतो, छंद मानवी भावांना प्रगट करीत असतो. छंद सुरस असल्यावर मनाला आल्हाद निर्माण होतो. असो हे झाले काव्यातील मर्म. पण मानवी जीवनात सुद्धा छंदाचे तेवढेच महत्व आहे. जेवढे काव्यात आहे. निरस जीवनात काहीही अर्थ नसतो किंवा विपरीत छंद मानवी जीवनात असेल तर तो अधोगतीला कारण ठरत असतो.
एकदा एक मित्र मला भेटले आणि म्हणाले ‘महाराज ! तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला परमार्थाचा चांगला नाद आहे.’ मी त्यांना म्हणालो ‘मला परमार्थाचा नाद नाही तर छंद आहे. नाद वेगळा आणि छंद वेगळा. दारू पिण्याचा, जुगार खेळण्याचा नाद असतो व अध्यात्माचा, काव्याचा, साहित्याचा छंद असतो. थोडक्यात नाद माणसाला अधोगतीला नेतो व छंद एक उत्तम गतीला नेतो. काही तरी चांगले कार्य छंदातून निर्माण होते. मोठ मोठे शास्त्रज्ञ त्यांनी त्यांच्या आवडीने संशोधन केले. त्याचा छंद घेतला आणि जगाला काही तरी चांगले दिले. न्यूटनने छंद घेतला आणि गुरुत्वाकर्षण शोधले. अर्थात हे काही नवीन नाही पण तुम्हाला आम्हाला माहित नसलेले माहिती झाले. मनुष्य अनेक प्रकारचे छंद जोपासतो ते आपल्या आवडीनुसार जपत असतो. कोणाची आवड उत्कृष्ट असते. कोणाची निकृष्ट असते. काहीना नाणे गोळा करण्याचा छंद असतो, कोणाला तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो. कोणाला पर्यटनाचा, कोणाला अध्यात्माचा. पण ! असे अनेक छंद जरी असले तरी एक असा छंद आहे कि जो छंद जर तुम्हाला असेल तर तुमच्या जीवांचे खरे कल्याण होईल, जीवन सर्वांगसुंदर होईल आणि तो छंद म्हणजे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात.
गोविंद गोविंद ‘मना लागलीया छंद’ ‘मग गोविंद ते काया’ ‘भेद नाही देवा तया’ ‘आनंदले मन’ ‘प्रेम पाझरती लोचन ’ ‘तुका म्हणे आळी’ ‘जेवी नुरेची वेगळी’
छंद हा विषय मनाशी संबंधित असतो आणि विशेष म्हणजे अवघ्या उपचारा ‘एक मनची दातारा’ सर्व गोष्टीला कारण मनच असते. अगदी बंधन आणि मोक्ष सुद्धा मनाच्या अधीन आहे ‘मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो:’ या मनाला अनेक प्रकारचे छंद असतात पण त्या छंदाने आपले अंतिम कल्याण होत नसेल तर काय उपयोग ? म्हणून छंद असा असावा कि त्याने आपले आत्यंतिक कल्याण होऊन दु:खाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी म्हणून महाराज म्हणतात कि मनाला गोविंदाचा छंद लावा, गोविंद म्हणजे भगवान श्रीकृष्ण, गो म्हणजे इंद्रिये, इंद्रियाला वेधून घेतो व विषयातीत आनंद देतो तो गोविंद. त्याच गोविंदाचा छंद मनाला लागला तर शरीर सुद्धा गोविंद होईल हि अपूर्वता आहे व देवात आणि आपल्यात भेद राहणार नाही. जीव-जीवाचा भेद, जीव-ईश्वराचा भेद, ईश्वर-ईश्वराचा भेद, जीव-जडाचा भेद, जडा-जडाचा भेद, जड-ईश्वराचा भेद, स्वगत भेद , सजातीय भेद, विजातीय भेद, देश भेद , काल भेद, वस्तू भेद असे अनेक प्रकारचे भेद आहेत पण या मनाने जर गोविंदाचा छंद घेतला तर त्याचा सर्वात मोठा फायदा जर कोणता असेल तर तो म्हणजे देवात आणि जीवात भेद राहणार नाही. वेदांताचा अंतिम सिद्धांत हाच आहे कि ‘जीवो र्ब्हमैव नापर:’ जीव हा ब्रह्मरूप आहे किंबहुना जीव हा ईश्वराचे प्रतिबिंब आहे. व बिंब आणि प्रतिबिंब यांची एकरूपता असते याच न्यायाने जीवात आणि देवात भेद नाही. ‘तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ।।’ व्रजभूमीतील गोपींना गोविंदाचा छंद होता त्यांना त्याच्याशिवाय काहीही आवडत नव्हते ‘कृष्णोहम’ हि त्यांची प्रातिभ अनुभूती होती. नारदासारख्यांना सुद्धा म्हणावे लागले कि भक्ती म्हणजे काय ‘यथा व्रज गोपिकानाम’ भक्ती म्हणजे काय? तर जी गोपींनी भक्ती केली तिलाच भक्ती म्हणतात. गोपींना कृष्णाचा असा छंद होता कि त्या छंदात त्यांना जगतभान नसे जग त्यांना हसत असे पण त्यांचे म्हणणे असे होते कि ‘तुका म्हणे हासे जन’ ‘नाही कान ते ठायी’ ‘हा खरा छंद जो जगाला आदर्श होता. एका कवीने म्हटले आहे कि ‘असा धरी छंद’ ‘ जाय तुटोनिया भवबंध’ ‘छंद टिटवीने घेतला’ ‘तिने समुद्रही अटविला’ हे अगदी सार्थ आहे.
मनाला एखादी अपूर्व गोष्ट प्राप्त झाली तर त्याला आनंद होतो त्याचप्रमाणे या मनाला हेच समजले कि आपण ब्रह्मरूप आहोत आणि हाच व्यापकत्वाचा आनंद त्याला होतो. आनंद केव्हा होतो, जेव्हा अप्राप्त वस्तू प्राप्त होते किंवा अज्ञात ज्ञात होते तेव्हा आनंद होतो. किंवा दु:खाची निवृत्ती होते तेव्हा मनाला आनंद होतो. पण या मनाला आनंद झाला हे कशावरून तर प्रेमे पाझरती लोचन .... अष्टसात्त्विक भाव निर्माण होतात व आनंदातिरेकाने डोळ्याद्वारे अश्रू ओघळू लागतात. हा भाव अतिशय उच्च प्रतीचा असतो मनाला समाधान देणारा असतो ‘कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे’ ‘हृदयी प्रगटे राम रूप’ या भावावस्थेत जीव गेल्यावर त्याच्यात आणि परमात्म्यात काहीही फरक राहत नाही हे विशेष.
तुकाराम महाराज एक उदाहरण देतात. ज्याप्रमाणे भिंगुरटी नावाची एक कीटकी असते ती मातीचे एक घरटे बांधीत असते व त्या घरट्यामध्ये एक आळी आणून ठेवते व तिला सारखा चावा घेत असते आणि त्या आळीला तिचा ध्यास लागतो व ‘ध्यासे ध्यासे तद्रूपता’ या न्यायाने ती आळीच भिंगुरटी होते आणि उडून निघून जाते. तसे हा जीव गोविंदाच्या ध्यासाने गोविंदरूप होतो व त्याच्या दु:खाची आत्यंतिक निवृत्ती होते यात शंका नाही.

भागवाताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागावाताश्रम , चिचोंडी(पाटील) ता. नगर
ह.मु. मेलबर्न , आॅस्ट्रेलिया
मो . +६१ ४२२५६२९९१

 

Web Title: Forbidden verses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.