भय हेच संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:46 AM2019-01-22T04:46:59+5:302019-01-22T04:47:04+5:30

देव आणि अध्यात्म यामधलं नातं मोठं गहन आहे. ज्याला देव मानसशास्त्राच्या उंचीवरून कळला त्यांच्याचसाठी तो गहन आहे.

Fear is the crisis | भय हेच संकट

भय हेच संकट

Next

- विजयराज बोधनकर
देव आणि अध्यात्म यामधलं नातं मोठं गहन आहे. ज्याला देव मानसशास्त्राच्या उंचीवरून कळला त्यांच्याचसाठी तो गहन आहे. अन्यथा तो चिंतेचा विषय आहे. ‘कारे भुललाशी वरलीया रंगा’ ही म्हण देव-धर्मासाठीसुद्धा लागू पडते. कारण ज्या मानसशास्त्राच्या आधाराने देव या संकल्पनेची रचना केली गेली ती संकल्पनाच लुप्त होत जाऊन त्या जागी कर्मकांड आले. नाशिक किंवा ओंकारेश्वर किंवा इतर धार्मिक ठिकाणी नदीच्या काठावर जी धार्मिक कर्मकांडे चाललेली असतात त्यामागे श्रद्धेपेक्षा एक पारंपरिक भय जास्त लपलेले दिसते. ही काही आताचीच परंपरा नसून हजारो वर्षांपासून या प्रथा चालूच राहिल्या आणि आजही सुरूच आहेत. साधारण बाराव्या शतकातल्या प्रथा जरी बघितल्या तरी आपल्या लक्षात येईल की यातली आजही कुठली कर्मकांडे सुरू आहेत. यज्ञयाग, होमहवन, प्राणिबळी, सतीप्रथा, व्रतवैकल्ये, नवस, उपासतापास, उद्यापने, जपतप, अन्नसत्रे, तीर्थयात्रा, मावंदे, प्रायश्चित्त विधी, अशा विविध प्रथा होत्या. या सर्व फलप्राप्तीसाठी केल्या जात होत्या. त्यातल्या आजही अनेक प्रथा या विज्ञानयुगात सुरूच आहेत. इष्टकामनापूर्तीसाठी मोठ्या श्रद्धेने जरी या प्रथा निर्माण झाल्या होत्या तरी यामागे भयतत्त्व लपले गेले होते. या सर्व प्रथा परंपरांना चोख उत्तर मिळतं ते पातंजल योगशास्त्रात. मनाचे शेकडो विकार मानवस्वभावाच्या विकृत वागणुकीतून जन्माला आलेले असतात. मानवी मन हे जितकं हळवं, नाजूक तितकंच पशुवत हिंस्र आहे. मानव जातीनेच मानवाचं कल्याणही केलं आहे आणि मानवाचा विध्वंसही त्यानेच घडवून आणला आहे. परंतु काही अनिष्ट घडलं तरी ते ईश्वराच्या कोपाने घडलं आणि चांगलं घडलं तरी ईश्वराच्या कृपाप्रसादे घडलं असा मोठा भास निर्माण करण्यात बराच मोठा काळ यशस्वी होत आल्यामुळे त्याची पाळेमुळे खोलवर रूजून, समाजाला या परंपरांनी सतत भयापोटी कार्यरत ठेवल्याचं अनेकदा लक्षात येत राहतं. चमत्कार आणि साक्षात्कार यावर पुराणांची हजारो पाने खर्ची पडतात. साधाभोळा समाज या पुराणकथांच्या पूर्णपणे स्वाधीन होत राहिल्यामुळे भयाच्या स्वामित्वाचे हक्क आजही समाज राखून आहे. परंतु आजची नवी पिढी मात्र विज्ञानाच्या निकषावरून याकडे पाहू लागल्यामुळे हळूहळू का होईना भयमुक्त होत चाललेली आहे. माणसाच्या बेशुद्ध अवस्थेतल्या जगण्यावागण्यामुळेच संकटे निर्माण होत राहतात. भोळ्या भाबड्या परिवाराच्या अवतीभवती अनेक संकटे दबा धरून बसलेली असतात. परंतु बुद्धिमान, जागृत, शक्तिमान परिवाराच्या अवतीभवती मात्र एक विश्वासू शक्तीची आभा, वलय तयार झाल्यामुळे संकटे तिकडे फिरकण्याची शक्यता कमीच असते. धन आणि बुद्धी जिथे वास्तव्याला नसते तिथे अडचणींचा डोंगर प्रत्येकाच्या डोक्यावर जाऊन बसलेला असतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी भयग्रस्त समाजाला धार्मिक कर्मकांडाशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. त्यासाठी भयमुक्त होत गेल्यानेच या काल्पनिक कर्मकांडातून सुटका होऊ शकते. म्हणून भयाबद्दल द्वैत-अद्वैत यामागची विचारधारा समाजाने अभ्यासणे गरजेचे आहे आणि किमान सुखी होण्यासाठी संतांचे श्लोक, अभंग, फुले अक्षता न वाहता अभ्यासून मनाला, बुद्धीला सामर्थ्यवान बनविणे आजची गरज आहे. अन्यथा आपलेच भय आपल्याला संपविण्यास कारणीभूत ठरू शकेल.

Web Title: Fear is the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.