‘मी नाही, तूच’ या भावनेतून आनंदाची अनुभूती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:18 PM2019-06-24T22:18:12+5:302019-06-24T22:18:16+5:30

‘आई गं टुई टुई काका रस्त्यावरून चाललेयत’ धाकटा श्लोक बाहेरून आत आला आईला सांगायला. कारण आईनंच त्याला सांगितलं होतं की ...

The experience of 'I am not, you' | ‘मी नाही, तूच’ या भावनेतून आनंदाची अनुभूती 

‘मी नाही, तूच’ या भावनेतून आनंदाची अनुभूती 

Next

‘आई गं टुई टुई काका रस्त्यावरून चाललेयत’ धाकटा श्लोक बाहेरून आत आला आईला सांगायला. कारण आईनंच त्याला सांगितलं होतं की तुझे ते टुई टुई काका आले ना की सांग मला. त्याप्रमाणो  श्लोकने धावत येऊन आईला सांगितलं. आई म्हणाली, ‘त्यांना बोलव जा लवकर. आपल्याला गाद्या करायच्यात ना?’


सांगण्याचा अवकाश श्लोक बाणासारखा धावत सुटला नि त्यानं टुई टुई काकांना घरात बोलवलं. घराच्या संस्कारानुसार त्यांना पाणी आणून दिलं. आईनं टेरेसवर कापूस पिंजून गाद्या करायला सांगितलं. उगीच घरभर कापूस नको व्हायला. श्लोक आता टुई टुई काकांच्या मागं मागं करत होता. ‘तुम्हाला काय म्हणतात? हे काय आहे? त्यानं काय करायचं?’ असा प्रश्नांचा धबधबा सुरू असताना टुई टुई काका शांतपणे म्हणाले, ‘मला म्हणतात पिंजारी. या माझ्याकडे असलेल्या कापूस पिंजायला मदत करणा-या वस्तूला म्हणतात पिंजण. पैंजण नाही पिंजण!’ बोलता बोलता त्यांनी आपलं काम सुरू केलं सुद्धा. गाद्या उशा यांच्या खोळी (पिशव्या) आधीच शिवून ठेवल्या होत्या श्लोकच्या आईनं. 


अजूनही श्लोकचे प्रश्न संपले नव्हते. ‘टुई टुई आवाज करते ती तार कशाची आहे? तुम्ही रस्त्यानं जाताना तिचा आवाज का काढता?’ ‘बाळा, ही तार नाहीये, ही कशाची नि कशी बनवलीय हे सांगितलं तर तुला आवडणार नाही.’ हे काकांचे उद्गार ऐकल्यावर तर श्लोकची उत्सुकता आणखी वाढली, ‘नाही, सांगा मला तुम्ही सगळं खरं खरं!’ 


ते म्हणाले, ‘अरे बक-यांना ज्यावेळी त्यांच्या मांसासाठी मारतात तेव्हा त्यांची आतडी काढून फेकून देतात. ती नंतर अगदी स्वच्छ करून धुवून वाळत घालतात. काही दिवसांनी ती आतडी पूर्ण सुकली की त्यांना पिळ घालून अशी तार तयार करतात जी आम्ही आमच्या पिंजणीला लावतो आणि कापूस पिंजायचं, गाद्या तयार करायचं काम करतो.’ 


यावेळी आजोबा तिथं आले नि म्हणाले, ‘पाहिलंस श्लोक, बक-या जिवंतपणी तर आपल्या उपयोगी पडतातच पण मेल्यानंतरही त्यांचा आपल्याला उपयोग होतो.’ श्लोक पिंजारी काकांना म्हणाला, ‘पण याचा टुई टुई आवाज का होतो?’ यावर पिंजारी काकांकडे उत्तर नव्हतं. ‘आजोबांनाच माहीत असेल.’ असं त्यांनी म्हटल्यावर आजोबा आनंदानं खुर्ची ओढून बसते नि म्हणाले,  'श्लोक या संबंधात दादू पिंजारी नावाच्या सत्पुरुषानं एक छान गोष्ट सांगितलीय.’ गोष्ट म्हटल्यावर श्लोकचे कान टवकारले गेले. पिंजारी काकाही कान देऊन ऐकू लागले. हातांनी त्यांचं काम चालूच होतं. 
आजोबा म्हणाले! अरे, या पिंजारी काकांसारखा एक दादू पिंजारी म्हणून साधू होऊन गेला. तोही गोष्ट सांगायचा. म्हणजे राजा-राणी किंवा चिमणी-कावळ्यासारखी गोष्ट नाही. शिकवण देणारी गोष्ट आहे ही. तू बकरी, बोकड, मेंढी यांचा आवाज ऐकलास ना?’ ‘हा आजोबा, मेंùमेंù मेùù ’ या श्लोकच्या आवाजावर काका-आजोबा दोघंही हसू लागले. ‘आयुष्यभर मेंù मेंù मेंùच करत राहतात. इतकंच काय पण मारलं जातानाही शेवटच्या श्वासापर्यंत में मेंच करत मरतात. यावर दादू पिंजारी काय म्हणतो माहितै?’ या आजोबांच्या प्रश्नावर पिंजारी काका नि  श्लोक दोघं एकदमच उद्गारले, ‘काय म्हणतो?’
आजोबा संथपणो सांगू लागले में मे म्हणजेच मैं मैं म्हणजेच मी मी दुसरं कोणी नाहीच. फक्त मीच. याला अहंकार किंवा गर्व म्हणतात. दादू पिंजारी हे बकरीचं उदाहरण देऊन माणसाच्या स्वभावाबद्दल सांगतोय. प्रत्येकाच्या अहंकाराचा फुगा कायम फुगलेला असतो. जरा काही झालं की आपला अपमान होतो. आपल्याला राग येतो. आपण सूड घेण्याचा विचार करतो. सर्व जगात मीच श्रेष्ठ असं प्रत्येक जण मानत असतो. त्यामुळेच त्यांच्या जीवनात ताणतणाव, चिंता, दु:ख निर्माण होतात. 
दादू सांगतो की त्या बोकडालासुद्धा शेवटपर्यंत कळत नाही. मरतो तेही में में करतच. त्याला मी म्हणजे सर्वात शक्तिमान, महान नाही हे कळत नसलं तरी माणसाला कळतं ना? मेल्यानंतर त्या बोकडाच्या आतडय़ाची तार बनवून पिंजणीला लावतात असं पिंजारी काकांनी सांगितलं ना? म्हणजे मरून आतडय़ाची तार पिंजणीवर चढवल्यावरच त्यातून टुई टुई म्हणजे तूही तूही.. मै नही तू तू तूही तूही. मी नाही, तूच! असा, परमेश्वराबद्दलचा कृतज्ञतेचा भाव तूही तूही मधून व्यक्त होतो.’
पिंजारी काका एकदम उद्गारले, ‘वाह, क्या बात है?’
श्लोकला आजोबांनी सांगितलेलं सगळं समजलं नाही; पण टुई टुई आवाजाचं रहस्य मात्र कळलं. त्यानं विचारलं, ‘या गोष्टीतून आपण काय शिकायचं?’ आजोबा आनंदानं म्हणाले, ‘अरे अहंकार- म्हणजे सर्व बाबतीत मी मी करणं वाईट आहे. कुठलाही माणूस कितीही मोठा झाला तरी इतरांमुळेच तो मोठा झालेला असतो. हे लक्षात घेऊन नेहमी दुस-याचा मोठेपणा मान्य करायचा असतो. इतरांना मान द्यायचा असतो. प्रत्येक चांगल्या बाबतीत ‘मी नाही तूच’ असं म्हणणं योग्यही असतं नि आवश्यकही असतं. 
खरंच आहे, आपण सर्वानी असा विचार केला तर देव शोधायला मंदिर किंवा मशिदीत किंवा चर्च, गुरुद्वारात जायला नको. मोठे मोठे ग्रंथ वाचून एखादा माणूस ज्ञानी बनेल पण खरा विद्वान तोच जो ‘प्रेम’ शब्दातही अडीच अक्षरं समजून आपल्या जीवनात आणतो. अशी व्यक्तीच सर्वावर प्रेम करत अखंड आनंदाच्या सागरावर मजेत तरंगत, हेलकावत राहते. प्रयोग करून प्रत्यक्ष अनुभव घ्यायला काय हरकत आहे? 

रमेश सप्रे

Web Title: The experience of 'I am not, you'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.