पहाटेची निरामय शांतता जगण्याला ऊर्जा देते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 09:14 AM2019-04-22T09:14:59+5:302019-04-22T09:15:08+5:30

विचार करायच्या सवयीने दिवस उजाडतो ही खरी पहाट आहे. पहाटेचे ताजेपण आनंद देते.

The energy of the morning gives energy to life | पहाटेची निरामय शांतता जगण्याला ऊर्जा देते

पहाटेची निरामय शांतता जगण्याला ऊर्जा देते

Next

विचार करायच्या सवयीने दिवस उजाडतो ही खरी पहाट आहे. पहाटेचे ताजेपण आनंद देते. पहाटेची सुरुवात अनुभवणे ही एक आत्मस्फूर्ती ऊर्जा असते. ती शब्दात मांडता येत नाही. पक्ष्यांची किलबिल मनाला प्रसन्न करते. मनाचा ताजेतवाणा अनुभवणे ही एक आत्मानंदाची पर्वणीच होय. त्यावेळेस आपला अनुभव आकाशाशी एकरूप होतो. आपणच आपल्या अनुभवांना साद घालतो. स्वात्मसुखाच्या वाटा शोधतो. त्या उजळून निघाल्यासारख्या वाटतात. अरुणोदयाने कर्तृत्वाच्या प्रकाशवाटा उजाडतात. पहाटेच्या वातावरणात अखंड चैतन्याच्या लहरी असतात.


त्या सर्वांना आनंद देतात. पहाटेच्या चिंतनातून आपल्या जगण्याला बळ मिळते. मनातले संकल्प, विकल्प पारखता येतात, योग्य कार्याची निवड करता येते. त्यामुळे क्रियात्मक शक्तीला वजन लाभते. मनात निरपेक्ष आनंदाची पहाट निर्माण होते. मनात सत्यनिष्ठा वाढते. विवेकातली सत्कृती जागृत होते. म्हणून संतांनी पहाटेच्या काकड आरतीला विशेष महत्त्व दिले. पहाटेच्या मांगल्याप्रसंगी आत्मरंग पालटून जाते. क्षणभरासाठी का होईना दु:ख विसरून जातो. त्यावेळेस मनाला अलभ्य लाभ होतो. मनाचा ताजेपणा पहाटेच्या सुरात असतो. अमृतानुभव मांडता येतो. मनाला सौंदर्याची मोहर घालता येते. मन प्रफुल्लित होते. स्वात्मसाधनेला बळकटी येते. मनाचा हिरवेगारपणा त्यातून दिसतो. प्रसन्नतेची पहाट उजाडली जाते.


त्या पहाटेच्या अमृतवलयात आपण न्हाऊन निघतो. मनाला लाभत असलेली निरामय शांतता आपल्या जगण्याला ऊर्जा देते. पहाटेच्या कुशीत दु:ख रात्रींनी वेढलेल्या मनात सुखाचा मोहर फुटतो. त्यात आपण बागडतो. निसर्गाशी एकरूप होतो. अखंड चैतन्याचा अनुभव घेतो. मग सत्वर उच्चार अंगी येतो, जगणे अर्थपूर्ण होते. त्या अनुभवांशी आपली मैत्री घट होते. तो अनुभव कधी मिटत नाही, शिळा होत नाही. अखंड शब्दांच्या चैतन्यात तो स्फुरण पावतो, त्यातून त्याच्या अंगी आत्मचिंतनाचे बळ येते. अभ्यासाची पहाट उजाडते. सत्कर्माचे द्वार खुले होते. मन ताळ्यावर येते. मनातले दुर्गुण नाहीसे होतात. अंत:करणात बदल घडतो. सत्कर्म घडू लागते. त्यामुळे आपल्या जाणिवांची खोली लक्षात येते. वृत्ती विश्वात्मक बनू लागते. मनाला सत्कर्माचा पोत समजतो. पहाटेची आनंदमयी ऊर्जा सकारात्मकता वाढवते. खरंच विचारांची पहाट अनुभवास येते.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: The energy of the morning gives energy to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.