कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 11:24 AM2017-08-21T11:24:55+5:302017-08-21T11:38:16+5:30

माणसानं कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते. हेही आपली डोळस उपासना आपल्याला सांगते! दया, प्रेम हीच पूजा-उपासना अंश शिकवते. आज चौकोनी कुटुंब आपापल्या बेटावर स्वत:चं साम्राज्य उभारू पाहत आहे. ज्येष्ठांच्या-आई, वडिलांच्या नात्यातील दुरावा वृद्धाश्रमाची त्यांना वाट दाखवू लागला आहे. नात्यातील विश्वासार्हता टिकविण्यासाठीही आज दृढ उपासना उपयुक्तच ठरणार आहे.

Due to a permanent grief 'subtraction'! That means 'sum' of happiness! | कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते!

कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते!

Next
ठळक मुद्दे व्रत-वैकल्ये त्यासाठी करायची उपासना ही ‘विशेष’ धर्म होत! आज संगणक युगातही मंत्रशक्तीचा, तिच्यातील तादात्म्याचा पाश्चात्त्य शास्त्रज्ञांकडूनही शोध घेतला जात आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यानुसार उपासनेला दृढ चालवणं सोयीचं ठरतं! मंत्र ही एक स्वयंभू शक्ती आहे! सिद्धमंत्र, वरदमंत्र यासह ती सिद्धीप्रत नेणारी आहे.ज्या शक्तीनं अनुभवता येतं त्या शक्तीच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे ‘अध्यात्म’ होय. म्हणून तर ‘उपासना’ करताना कोणत्याही काल्पनिक देवदेवतांमध्ये अडकता कामा नये! उपासना ‘डोळस’च हवी!



डॉ. कुमुद गोसावी

सृष्टीतील चैतन्य पानापानांतून ओसंडत असताना एखाद्या उपासनेत मन जर स्थिर होत नसेल, तर आधी त्या निसर्गदेवतेशी मनमुराद संवाद साधणं हीदेखील एक उपासनाच होय! पावसाची लडिवाळ सर, डोंगरमाथ्यावरून ओघळणारा दुधाळ धबधबा! त्याचे सुखावणारे असंख्य तुषार! हे सारं सारं आस्वादताना साधलेली आंतरिक भावलय यातूनही ‘तादात्म्य’ अनुभवता येतं!
माणसाला जे जे काही अनुभवयाला येतं त्याच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे ‘विज्ञान!’ नि ज्या शक्तीनं अनुभवता येतं त्या शक्तीच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे ‘अध्यात्म’ होय. म्हणून तर ‘उपासना’ करताना कोणत्याही काल्पनिक देवदेवतांमध्ये अडकता कामा नये! उपासना ‘डोळस’च हवी! नसता-
‘माला बनाई काष्ट की। बीच में ड़ाला सुत।
माला बेचारी क्या करे। जपनेवाला कुपुत! ।।
मुरत बनाई पत्थर की। सुंदर सजाई बहुत ।
मुरत बेचारी क्या करे। पुजनेवाला कुपुत!।।’
संत कबीरांचा हा दोहा उपासनेसंबंधी खूप काही सांगून जातो. दिशा दाखवतो. आपल्या आराध्य दैवताशी संपूर्ण एकतानतेनं साधायचं अनुसंधान म्हणजे ‘उपासना!’ नित्य एक साधनामार्ग स्वीकारून करायची वाटचाल. त्यात मंत्र, जप-जाप्य, ध्यान-धारणा, पूजा-अर्चना आदी साधनांचा उपयोग केला जातो. अशा साधनांचीही सजगतेनं निवड केल्यास समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यानुसार उपासनेला दृढ चालवणं सोयीचं ठरतं!
मंत्र ही एक स्वयंभू शक्ती आहे! सिद्धमंत्र, वरदमंत्र यासह ती सिद्धीप्रत नेणारी आहे. एकदा एका परधर्मीय प्रचारकानं हिंदू धर्माची चालवलेली निंदा सहन न होऊन एका अस्पृश्य समाजातील सामान्य माणसानं जवळच्याच एका दगडावर मंत्रोच्चारपूर्वक विंचवाचं एक चित्र काढलं! नि त्या निंदकाला त्या चित्राला हात लावण्यास सांगितले. त्यानं अत्यंत कुचेष्टेने त्या चित्रावर बोट ठेवताच प्रचंड वेदना होऊन तो जमिनीवर लोळायला लागला!
जोवर अनुभव-प्रतीती येत नाही तोवर शास्त्र हे संशोधन अवस्थेत असतं. धार्मिक विधिनिषेधांचा पाया ‘योगशास्त्र’ हा आहे. हे सिद्ध असताना वेगळी सिद्धता कशाला? व्रत-वैकल्ये त्यासाठी करायची उपासना ही ‘विशेष’ धर्म होत! आज संगणक युगातही मंत्रशक्तीचा, तिच्यातील तादात्म्याचा पाश्चात्त्य शास्त्रज्ञांकडूनही शोध घेतला जात आहे. उपासकाला उपाधीरहित उपासनेतील ध्यानस्थितीत दिव्य श्रुती-रामरक्षा-मंत्रांसारख्या ऐकू येतात! त्यात कार्यशक्ती असते. या अवस्थेत ईश्वर साधकाशी बोलतो! ते शब्द खरे असतात. त्यातील एकही अक्षर वाया जात नाही! असं साक्षात्कार शास्त्र सांगतं. (साक्षात्कार शास्त्र- अंडरहिल पृ. क्र . ३०४)
उपासनेतील तादात्म्यभाव उपासकाला ‘स्व’ विसरायला लावतो! अशी उपासना म्हणजे ‘ज्ञानोत्तर भक्ती!’ जिची महती ‘श्रुती’नं गायिली आहे. तिच्यातून उत्पन्न होणारी त्रिज्या तोच खरा ‘उपासना धर्म’ होय! तो समजून घेतल्यास ‘हरी ओम’ असो, वा अन्य जप असो, तो नितळ मनानं चालू ठेवता येतो.
‘जे माझ्यात आहे ते सारं काही भगवंतांचंच आहे. हा मनाचा दृढभाव योेग्य उपासनेतून येतो. एकदा राधेनं मुरलीला विचारलं,
‘तू कृष्णाला इतकी प्रिय का आहेस?’
मुरली म्हणाली, ‘राधे, माझ्यात ही पोकळी आहे. माझ्यातलं असं दुसरं काही नाही!
त्यामुळे माझ्यातून सर्व आवाज कृष्णाचाच येतो!
तुमच्यात तर सारं तुमचंच भरलं आहे!
तिथं कृष्णाला जागाच कुठं आहे?
राधिके, म्हणून तर तो तुमच्यापासून दूर राहतो. नि मला मात्र ओठांना लावतो बरं का!!’
उपासनेचंही अगदी असंच आहे. ‘अहं’धूप जळल्याशिवाय खरी उपासना येत नाही! मग ती देवाची असो वा एखाद्या कलेची!
कला आणि साहित्य तर समाजाच्या आतल्या आवाजाचं कुलूप असतं. ज्यांचा संबंध मनाशी, मन:स्वास्थ्याशी असल्यानं उपासनेतही अहंतारहित असणं मोलाचं असतं. निर्मळ मनानं, विनम्र भावानं, प्रसन्न चित्तानं दृढ उपासना चालू ठेवल्यास उपासकाचे हातही चंदनी होतात! दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी ते सदैव सज्ज असतात! त्यातून समाजाचं उन्नयन होतं. विचारांतून ‘प्रगल्भता’ आचारातून ‘सहजता’ नि उच्चारातून ‘विनम्रता’ साधण्यास हवी असलेली मनाची ‘शुद्धता’ उपासनेतून मिळते.
‘संसारातील त्सुनामी लाटा! भ्रमिष्ट करिती अज्ञ जीवा!
आधाराची उपासना ही! अतर्क्य घडवी सारी किमया!!’
माणसानं कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते. हेही आपली डोळस उपासना आपल्याला सांगते! दया, प्रेम हीच पूजा-उपासना अंश शिकवते. आज चौकोनी कुटुंब आपापल्या बेटावर स्वत:चं साम्राज्य उभारू पाहत आहे. ज्येष्ठांच्या-आई, वडिलांच्या नात्यातील दुरावा वृद्धाश्रमाची त्यांना वाट दाखवू लागला आहे. नात्यातील विश्वासार्हता टिकविण्यासाठीही आज दृढ उपासना उपयुक्तच ठरणार आहे.
‘निर्वैर व्हावे भुतांसवे,
साधन बरवे हेचि एक।’
जगद्गुरू तुकोबांनी सांगितलेलं उपासनेचं असं ‘निर्वैर’ साधन स्वीकारल्यास साधकाला आत्मसुखाचा लाभ का नाही होणार?

Web Title: Due to a permanent grief 'subtraction'! That means 'sum' of happiness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.