Due to the arrest of Buddha | बुद्धाच्या मुर्तीला अटक

ठळक मुद्देसगळं प्रकरण ऐकल्यावर ओ-ओका म्हणाले की बुद्धाच्या मुर्तीनेच कापडाचे गठ्ठे चोरले असावेतलोकांचं रक्षण करणं, त्यांची काळजी घेणं बुद्धाचं काम आहेआपलं कार्य करण्यास बुद्ध अपयशी ठरलेला दिसतोय, तर त्याला अटक करा आणि घेऊन या कोर्टात!

एक व्यापारी कापसाचे 50 गठ्ठे खांद्यावरून विकण्यासाठी वाहून नेत होता. खूप ऊन आणि उकाडा असल्यामुळे त्रासलेल्या त्या व्यापाऱ्यानं थोडी विश्रांती घेण्याचं ठरवलं. त्याला दिसलं की बुद्धाची एक खूप मोठी मूर्ती समोर आहे आणि तिच्या पायाशी चांगली सावली आहे. त्यानं त्या मूर्तीच्या पायाशी डेरा टाकला आणि मस्त झोपी गेला. ज्यावेळी त्याला जाग आली त्यावेळी आढळलं की त्याचे कापडाचे गठ्ठे गायब झाले आहेत.

अत्यंत वैतागलेल्या मनस्थितीत तो पोलीस चौकीत गेला आणि त्यानं चोरीची तक्रार केली. प्रकरण न्यायालयात गेलं. ओ-ओका नावाचे न्यायाधीश होते त्यांनी सुनावणी सुरू केली. सगळं प्रकरण ऐकल्यावर ओ-ओका म्हणाले की बुद्धाच्या मुर्तीनेच कापडाचे गठ्ठे चोरले असावेत. लोकांचं रक्षण करणं, त्यांची काळजी घेणं बुद्धाचं काम आहे. आपलं कार्य करण्यास बुद्ध अपयशी ठरलेला दिसतोय, तर त्याला अटक करा आणि घेऊन या कोर्टात!
पोलिसांनी बुद्धाच्या मूर्तीला अटक केली आणि कोर्टात आणलं. हे सगळं बघत असलेला व प्रचंड आरडाओरड करत असलेला जमावही पोलिसांच्या मागोमाग कोर्टात आला. बुद्धाच्या मूर्तीला काय शिक्षा ठोठावणार अशीच उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर होती.

हसत्या खिदळत्या जमावाला बघून भडकलेल्या न्यायाधीश ओ-ओकांनी न्यायालयामध्ये असा गोंधळ घालायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला अशी विचारणा केली. तुम्ही न्यायालयाच अवमान केला आहे आणि तुम्हाला दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असा सज्जड दमही दिला.
लोकांनी दिलगिरी व्यक्त करण्यास दिरंगाई केल्याचं बघून न्यायाधीशांनी लोकांना दंड करत असल्याचं सांगितलं. परंतु, जर तुमच्यापैकी प्रत्येकानं कापसाचा प्रत्येकी एक गठ्ठा तीन दिवसांत आणून दिला तर तुमचा दंड माफ करीन असंही सांगितलं. जे कुणी कापसाचा एक गठ्ठा आणणार नाहीत, त्यांना अटक करण्यात येईल असा आदेशही ओ-ओकांनी दिला.

ज्यावेळी कापसाचे गठ्ठे जमा व्हायला लागले, त्यावेळी त्या व्यापाऱ्याने एक गठ्ठा आपला असल्याचे ओळखले आणि चोर पकडला गेला. उरलेल्या लोकांना त्यांचे गठ्ठे परत देण्यात आले.