भगवंत भक्तीचा भुकेला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:20 AM2018-11-02T09:20:16+5:302018-11-02T09:20:24+5:30

भगवंत श्रेष्ठ आहे. तो सहस्त्र हातांनी आम्हाला कवटाळून घेतो. तो अजानबाहू आहे व मनानेही मोठा आहे.

devotion of God by devotees | भगवंत भक्तीचा भुकेला

भगवंत भक्तीचा भुकेला

Next

- धर्मभूषण प. पू. ब्रह्मेशानंद स्वामी

भगवंत श्रेष्ठ आहे. तो सहस्त्र हातांनी आम्हाला कवटाळून घेतो. तो अजानबाहू आहे व मनानेही मोठा आहे. आम्ही कितीही पापी असू देत. झालं गेलं विसरून तो आम्हाला जवळ घेऊन म्हणेल, तुम्ही आता माझे झाला आहात ना ? बस्स ! हे भगवंताशिवाय कोणाला शक्य आहे का ? असे संत शिरोमणी तुकोबाराय सांगून गेले.

भक्तांना भगवंताच्या चरणी आपल्या सगळ्या व्यथा व कथा मांडता आल्या पाहिजेत. कारण तो भगवंत आपला आहे. आपला बाप आणि आई त्यालाच माना. तोच सुख दु:खात आपल्याला दोन्ही हातांनी जवळ घेईल. आपल्याला जवळ करील, कारण स्वच्छतेमुळे आपल्या मनमंदिरात राहायला त्याला आवडते. त्याला येथे राहण्यासाठी आपले घर म्हणजे मन स्वच्छ नको का करायला? भगवंताला त्याचं घाटीचं वसतिस्थान हवं असतं .म्हणून त्याची प्रार्थना करताना भक्त त्याच्याकडे बघतो.

असा हा भगवंत सर्वांमध्ये वास करतोय. त्याची भक्ती करा.
आपण सद्गुरु करतो. म्हणजे नेमके काय करतो ? सद्गुरु केल्याच्या भ्रमात राहतो. सद्गुरु तसा प्राप्त होत नसतो. साधुसंतांनी सुध्दा यासाठी अपार कष्ट, यातना सोसल्या. आपले दोष निवारण करण्याकरिता त्यांनी अपार खडतर प्रयत्नही केले. त्यांनी भगवंताच्या चरणांकडे अश्रू ढाळलेले आहेत. त्याचासाठी आपली अंतःकरणे स्वच्छ करून ठेवलेली आहेत. आपण मात्र हजारो पापे करतो आणि भगवंतांकडे आपण चुकलो मला क्षमा करा म्हणून झटकन मोकळे होतो. आम्ही वाट्टेल ते करावं आणि भगवंताकडे पटकन क्षमा मागून मोकळे होणं हे योग्य नव्हे. भगवंत म्हणजे कोण हे अनेकांना अजूनही ठाऊक नाही. तो जाणून घेतला पाहिजे.

भगवंत हा श्रेष्ठच आहे. हजारो लोकांमध्ये तो राहतो, हजारो लोकांना तो वाचवतो, हजारो लोकांना जन्माला घालतो, संपूर्ण विश्वाची घडी व्यवस्थित बसवतो. अशा या जगन्नियंत्या भगवंताला फसवतो. प्रथम आम्ही चूक करतो आणि नंतर सरळ चुकलं म्हणून सांगतो. तरीही हा भगवंत सामान्यातल्या सामान्य भक्तांना त्यांची चूक असूनही त्यांना जवळ करतो. तो त्यांच्या वेड्या भक्तीच्या पोटी वेडाही होतो. आम्ही जर भगवंताचे भक्त बनलोत तर त्याला जवळ करून त्याचे सान्निध्य गाठणे कठीण काम नाही. देवाला जवळ करणे म्हणजे आपले अंत:करण स्वच्छ होण्यासाठी आपल्या हृदय मंदिरात विराजमान करून घेणे. तेव्हा आपल्या हृदयात तो असल्याचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येईल. त्याचा वास हृदयामध्ये नसल्यास आम्हाला त्याची आठवणही येणार नाही.

नको म्हणण्याच्या गोष्टी किंवा अधिकार आपल्याला नाही. तो भगवंताला आहे. आम्हाला जगायचं आहे. म्हणून देवाप्रती श्रध्दा असली पाहिजे. देव पाहिजे असल्यास त्याच्या प्रती भावही असला पाहिजे. भावाशिवाय भगवंत मिळूच शकत नाही. आपला स्वभाव हा भगवंताच्या अगदी जवळचा आहे. आम्ही काही तरी वाईट करायला गेलो तरी खटकल्यासारखे वाटतं. "याविरुध्द चांगलं केले तर आनंद होतो. हा आनंद भगवंतांच्या अगदी जवळचा आहे. तोच मूळ स्वभाव आहे. म्हणून काही वाईट केल्यानंतर, पाप केल्यानंतर ते आपल्या स्वभावाला मान्य नाही. याचा अर्थ भगवंतालाही ते मान्य नाही. असा हा देव आपल्या हृदयात वास करतो. हे आम्हाला ठाऊकही नसतं .
संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगांत सांगून गेले की, मला काही देऊ नका पण देव घ्या. सांगायचं तात्पर्य आज जगामध्ये आज भक्ती भाव निर्माण करणारी यंत्रणाच बदलली आहे. प्रत्येकजण पोटासाठी, संसारासाठी झटतो आहे, आणि देवाकरिता ? खरं तर भगवंतापर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग सद्गुरु दाखवतात. त्यांचा संबंध थेट स्वरूपाशी आहे. ते आपल्याशिवाय वेगळे राहूच शकत नाहीत. जेव्हा आम्ही शरीर टाकतो, तेव्हा आपला देह जाताना भगवंतही आपल्याबरोबर येतो कारण तो दुसरा नसतोच .आपल्यासारखाच जर तो आहे तर तो माझा आहे. किंबहुना तो स्वभाव आपला आहे. म्हणून तो खरा भाव होय. असा हा भाव कोणी वंदला तरी तो घ्या. त्याला हृदयात जागा द्या. सांगणाऱ्यांनी सांगितलं आणि ऐकणाऱ्यांनी ऐकलं तर सांगणाऱ्यांचा आणि ऐकणाऱ्यांचा उध्दार होतो असे म्हणतात.

(शब्द संकलन : किशोर स.नाईक, डोंगरी गोवा)

Web Title: devotion of God by devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.