अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 02:15 AM2018-09-05T02:15:57+5:302018-09-05T02:16:35+5:30

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत.

The basic purpose of Indian philosophy is to predict and explore | अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश

Next

- विजयराज बोधनकर

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत. त्यात कथासार आहे. कथा ऐकणे हा मानवाचा स्वभाव आहे आणि म्हणून कथेतून मूळ तत्त्व प्रणालीची पेरणी करत, भारतीय महामुनींनी ही दोन महाकाव्ये जन्माला घातली, पण त्यातली जगली ती फक्त कथा आणि त्यात या तत्त्वज्ञानाचा खरा शोध आणि कथेतले विविध अंदाज हे बाजूला पडत गेले व उरला तो निव्वळ कथेचा सांगाडा.
विचार करण्याची संधी फक्त मानवालाच निसर्गाने बहाल केली. आर्य चाणक्यासारख्या एका शिक्षकाने चंद्रगुप्त मौर्यसारख्या अत्यंत गरीब घरातल्या मुलाला राजपदापर्यंत नेले. याचा हाच अर्थ निघतो की, निसर्ग क्षमतेचा वाटत करताना गरीब व श्रीमंत हा भेद करीत नाही. प्रत्येकाला बुद्धिमत्ता सारखीच प्रदान करतो. जो इथल्या मोहमायेपासून स्वत:च संरक्षण करतो, तो प्रगतीच्या मार्गावरून भ्रमण करीत राजयोगापर्यंत पोहोचतो आणि जो मोहमायेच्या गराड्यात सापडतो, शेवटी त्याचा दुर्योधन किंवा रावण होतो.
रायायण, महाभारत या कथा प्रत्यक्ष घडल्यात की नाहीत, हा अजिबात महत्त्वाचा विषय नाही, परंतु त्या काव्यग्रंथातून नेमका कुठला अभ्यास मानवाने करावयाचा आहे, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. निसर्गशक्तीचा अभ्यास करून ज्याला अनुभूती झाली, त्याला खऱ्या अर्थाने भारतीय तत्त्वज्ञान समजू शकते. पंचमहाभूतांवरच आधारित हे तत्त्वज्ञान रचलेले आहे. एका सूक्ष्म शुक्राणूपासून इथला मानव शरीर धारण करतो. या शुक्राणूचा निर्माता कोण असेल, याचा शोध घेणेसुद्धा एक अभ्यासच होऊ शकतो. याच मूळ अभ्यासामुळे मानवाच्या मूळ प्रवृत्तीचा अभ्यास होऊ शकतो आणि याच मानवी प्रवृत्तीतून ही दोन महाकाव्य रचली गेलीत, याचा पूर्णपणे अंदाज येऊ शकतो. मानवी जीवन ही शक्यतांची मांदियाळी आहे. मग त्या महाकाव्याची फक्त पूजाच करायची की, महाकाव्याचा शोध घेऊन उत्तरे शोधायची याचा प्रत्येकाने जर विचार केला, तरच ही ग्रंथ सफल ग्रंथ ठरू शकतात अन्यथा तो फक्त कथानकाचाच भाग राहू शकतो.

Web Title: The basic purpose of Indian philosophy is to predict and explore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.