आनंद तरंग - देवळाच्या दारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 05:57 AM2019-02-20T05:57:36+5:302019-02-20T05:58:01+5:30

अध्यात्मिक लेख

Anand Tarang - The temple's door | आनंद तरंग - देवळाच्या दारी

आनंद तरंग - देवळाच्या दारी

Next

शैलजा शेवडे

टेकावे जरासे, देवळाच्या दारी,
शिणला हा भारी, जीव वाटे।
शब्द बापुडे हे, काथ्याकूट किती,
काळ दावी भीती, कोठे जावे।
हिणवती सारी, म्हणती अडाणी,
वाळवंटी पाणी, कोण देई।
फिटले फिटले, भ्रम सारे सारे,
जोशातले नारे, आता नाही।
विटले हे मन, पुरे वणवण,
दावी रे चरण, पांडुरंगा।

ते समचरण बघायचेच. त्या पंढरपूरला, भूलोकीच्या वैकुंठाला जायचेच. पंढरपूरला ‘नादब्रह्म असलेले क्षेत्रही म्हणले जाते. किती सुंदर कल्पना- विठ्ठलभक्त अखंड नामसंकीर्तनात रंगलेला असतो. नादातून कीर्तन आणि कीर्तनातून भक्तिभाव प्रकट होतो. भगवंताच्या नावात आणि भगवंतात कोणतेही अंतर नाही. हरिनाम हा दिव्य ध्वनी असतो आणि पंढरपुरात तर सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर चालू असतो. जेव्हा दिंडी येते, तेव्हा लाखो वारकरी एकाच चालीवर, एकाच टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर ताल धरून श्री विठ्ठलाचे गोडवे गातात. हे नादब्रह्म म्हणजे पंढरीस सदैव चालू असलेले ‘श्रवणम, कीर्तनम, संकीर्तनम’ आहे. इथली प्रधानता नामाची आहे. वाळवंटात असो, गल्लीत सर्वत्र कीर्तन, गीत, नृत्य आणि नामाचा जयघोष सुरू असतो आणि जिथे भक्तीने भगवंताचे नाव घेतले जाते, तिथे भगवंत असतोच. छे! हा अनुभव ‘याचि देही याचि डोळा’ घेतलाच पाहिजे. आपल्या घरात राहून परमेश्वराचे चिंतन करतोच आपण, पण लाखो भक्तांच्या सान्निध्यात जेव्हा तेच परमेश्वराचे नाव त्यांच्या सुरात सूर मिसळून घेतो, तेव्हा तो अनुभव अवर्णनीय असतो.

Web Title: Anand Tarang - The temple's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.