सब पैसेके भाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 04:35 PM2019-04-28T16:35:27+5:302019-04-28T16:37:47+5:30

श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या आणिक स्तोत्रापैकी चर्पटपंजरी नावाच्या स्तोत्रात एका श्लोकात जीवनातील एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे ते म्हणतात

All the money brothers | सब पैसेके भाई

सब पैसेके भाई

Next

अहमदनगर : श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या आणिक स्तोत्रापैकी चर्पटपंजरी नावाच्या स्तोत्रात एका श्लोकात जीवनातील एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे ते म्हणतात
श्लोक : यावव्दित्तोपार्जनसक्तस्तावन्निजपरिवारो रक्त: ।
     पश्चाध्दावति जर्जदेहे वार्तां प्रुच्छति कोपि न गेहे ॥
सब पैसेके भाई, अपना कोई नही । पैशाची जादु उभ्या जगावर चालते, पैसा नसेल तर कोणतेही कार्य करणे अवघड आहे. अर्थस्य पुरुषो दास। असे एके ठिकाणी म्हटले आहे. परमार्थातही धनावाचून काही होत नाही. आणि आता तर एक वेगळेच फ्याड आले आहे ते म्हणजे देवाच्या दरवाज्यावर सोन्याचा मुलामा, देवाचे सिंहासन सोन्याचे, मखर सोन्याचे, विशेष म्हणजे देवाचा मुकुट सोन्याचा आणि तोही १४-१५ किलो वजनाचा, बरे हे सर्व एक वेळ ठिक आहे असे समजु परंतु त्या सोन्याच्या रक्षणासाठी पाहारेकरी पाहिजेत म्हणजे ज्या देवाला आपण रक्ष माम परमेश्वर ॥ म्हणायचे त्यालाच संरक्षण हवे. ख-या परमार्थाचिया चाडा । कोणी वेचिना कवडा । भुल कैसी पडली मुढा । रोकडा परमार्थ विसरले ॥
                 भारतीय संस्कृतीमध्ये धन हे दुसरा पुरुषार्थ (धर्म-अर्थ-काम-मोक्ष) म्हटले आहे पैसा मिळवु नये असे नाही, मिळवावा पण तो योग्य मागार्ने मिळवला पाहिजे.
श्री तुकाराम महाराज म्हणतात -
वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी॥  सरळ मागार्ने पैसा कमावावा पण अवास्तव चैन, हौस भागविण्यासाठी धन आवशक वाटते आणि ते मिळविण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिले जातात. बरे हे सर्व कोणासाठी ? तर हे सर्व माज्या कुटुंबासाठी, ज्यांना मी माझे म्हणतो त्या माझ्या सगे-सोय-यांसाठी करायचे.
                 जववरि बरवा चाले धंदा । तववरि बहिण म्हणे दादा॥  पैसे असले तरच बहिणसुध्दा मान देते गरिब भावाकडे जाणार नाही. मायबापे पिंड पाळियेला माया, मायेच्या पोटी, लोभाचे पोटी सर्व नातेवाईक जवळ येत असतात. सोयरे धायरे, दिल्या घेतल्याचे । अंतकाळिचे नाही कोणी ॥
जोवरी पैसा तोवरी बैसा ही म्हण खरी आहे. श्रीमंत मनुष्य आला तर त्या ठीकाणी कितीही मोठा विव्दान उपस्थित  असला तरी त्याला मान न मिळता तो श्रीमंत माणसाला मिळतो व विव्दानाची उपेक्षा होते. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा । वेश्यांना मणीहार । उध्दवा अजब तुझे सरकार....  धनवंता घरी धनचि काम करी॥
   श्रीमंताचे घरी पैसाच काम करीत असतो. पैशामध्ये अशा वेगवेळ्या प्रकारच्या शक्ति आहेत म्हणुन पैशाची ताकद ओळखुन माणसाने योग्य नियोजन केले तर हाच पैसा त्याला तारणारा ठरणार आहे. त्यातुन त्याला चांगले काही करता पण येणार आहे. म्हणुनच श्रीमद शंकराचार्य म्हणतात, हे मानवा ! जोवर तझ्यामध्ये धन कमावण्याची शक्ति आहे तोपर्यंतच तुझ्या घरातील तुझे आप्त तुझ्यावर फार प्रेम करतात, तुझी विचारपुस करतात पण ! त्यानंतर तुला म्हातारपण आल्यानंतर देह जर्जर झाला. काम करण्याची शक्ति संपली की घरात तुझा कोणालाही उपयोग नसतो मग तुझी कोणीही विचारपूस करीत नाहित. त्यांना तु नको असतो तुझा पैसा हवा असतो. श्री तुकाराम महराज म्हणतात, इंद्रिये मावळली म्हणती आला बागुल आजा । म्हातारा मनुष्य म्हणजे घरातील नातवांचे खेळणे होऊन बसतो.
              तारुण्यात शक्ती असते त्यामूळे माणुस म्हणतो की, लाथ मारीन तिथे पाणी काढीन. पण! एकदा का आयुष्य उतरणीला लागले कि शरीर थकते, त्यामध्ये रोग प्रवेश करतात. बुध्दिसुध्दा कमजोर होते. विसराळूपणा वाढतो. प्रकृती चांगली राहत नाही. वारंवार वैद्याकडे जावे लागते. शेवटी त्याचाही कंटाळा येतो आणि औषधेही नको म्हणतो. अशावेळी त्याची शारीरिक व मानसिक स्थिती ढासळते मग घरातील लोकांना त्याचा उद्वेग येतो. त्याला दडपण येते. भितीने ग्रासला जातो. खरे तर अशावेळी त्याला मदतीची, समजून घेण्याची गरज असते. पण ! होते सारे उलटेच त्याला तर कोणी समजून घेत तर नाहितच पण तो सुध्दा समजून वागत नाही.
आणि हे एवढे घडूनही त्याला गोविंदाचे भजन करण्याची बुध्दि होत नाही हे त्याचे दुर्दैव आहे. जो परिवार त्याला पैसे असतांना प्रेमाने विचारत होता तोच परिवार आता त्याला धनाच्या अभावामुळे, शरिराच्या शक्तिहिनतेमुळे त्याच्याशी बोलतही नाहित. त्यामुळे वार्धक्य न टळणारी गोष्ट आहे, हे जर आपल्याला माहित असेल तर त्याची तजविज अगोदरच का करु नये ? बालपणापासूनच परमाथार्ची सवय लावून घेतली पाहिजे म्हणजे मग जरी प्रतिकूल परिस्थिति आली तरी आपला तोल जाणार नाही. सुखदु:खे समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ ॥ हे गीतेचे तत्वज्ञान समजून घेतले कि मग कोणत्याही परिस्थितीत आनंद भंग होत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, ये साते आलीया वोळंगा शारंगधरु.. नाहीतरी संसार जाईल लया, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृगजलवत जाईल रया, मनुष्य जन्म मिळालाय ना मग सावध होऊन लवकर परमाथार्ला लागा कारण तुमचे कोणी नाही लोभामुळे आणि मायेमुळे एकत्र आलेले आहेत. बालपण गेले नेणता तरुणपणी विषयव्यथा वृद्धपाणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म धरी ेह्व हे संतांचे म्हणणे किती सार्थ आहे बालपणामध्ये काही कळत नसते , तरुणपणी विषयाची आसक्ती असते,वृद्धपणी शक्ती क्षीण झालेली असते त्यामुळे व्यर्थ चिंता करण्याशिवाय तो काहीही करू शकत नाही . त्यातच कधी मृत होतो हे त्यालाही समजत नाही म्हणून वृद्धापकाळ येण्यागोदर सावध होऊन अध्यात्म समजून घ्यावे मग म्हातारपणी सुद्धा चिंता राहत नाही उलट, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी अशी सुंदर अवस्था असते. तोच खरा शेवटचा गोड दिवस .

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी (पा) ता. नगर
मोबा. ९४२२२२०६०३

Web Title: All the money brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.