अध्यात्म- भाषा सौंदर्य- अभिव्यक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 07:44 PM2018-12-08T19:44:25+5:302018-12-08T19:44:47+5:30

सौंदर्य हे मानवी लोकजीवनाचे, साहित्य, कला, संस्कृती आणि अध्यात्माचेही एक श्रेष्ठ मूल्य आहे.

adhytma- language beauty - expression | अध्यात्म- भाषा सौंदर्य- अभिव्यक्ती 

अध्यात्म- भाषा सौंदर्य- अभिव्यक्ती 

Next

- डॉ. रामचंद्र देखणे -  
सौंदर्य हे मानवी लोकजीवनाचे, साहित्य, कला, संस्कृती आणि अध्यात्माचेही एक श्रेष्ठ मूल्य आहे. हे सौंदर्य दिसणारे नाही असणारे आहे. फक्त दिसण्यासाठी जे सौंदर्य असते ते ‘प्रदर्शन’ असते पण असण्यासाठी मात्र जे असते ते दर्शन होय. भाषा, विचार, कला ही सुंदरतेने जेव्हा नटते तेव्हा तीच माधुर्याने अभिव्यक्ती होते आणि अनुभवताही येते. ज्ञानदेवांनी गीतातत्वाच्या आणि गीताकथेच्या सौंदर्याविषयी म्हटले आहे,
‘‘माधुर्यी मुधरता। शृंगारी सुरेखता। 
रुढपणा उचिता। दिसे भले।।’’ माधुर्याला मधुरता, शृंगाराला सुरेखता आणि रुढपणाला योग्यता प्राप्त होणे ही खरी सुंदरता आहे. सौंदर्याचे तत्वज्ञान घडविणारा तत्ववेत्ता म्हणून रवींद्रनाथांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. रवींद्रनाथ आणि म. गांधींचा एक संवाद फार महत्वाचा आहे. रवींद्रनाथांच्या आश्रमात एकदा गांधीजी गेले होते. पहाटे दोघेही फिरायला निघाले. चालताना रवींद्रनाथ म्हणाले, ‘‘मी पहाटे लवकर उठतो कशासाठी? मी पक्षांची गाणी ऐकतो. असणाºया झाडांचे नृत्य पाहतो. हळूच डोकावणाºया सूर्याची किरणे मला मोहीत करतात. मला या सर्वांतून जिकडे तिकडे सौंदर्य दिसते. त्यावर गांधीजी म्हणाले, ‘‘तुम्ही जेव्हा पहाटे निसर्गाचे सौंदर्य पाहता तेव्हा मला पहाटे उडणाऱ्या चिमण्या दिसतात. पंख फडकवून भरारी मारणारे पक्षी दिसतात. त्या चिमण्यांच्या, त्या पक्षांच्या मुखात चार दाणे कसे पडतील? याची चिंता मला भेडसावते. सकाळच्या उजेडात प्रकाशाने चमकणारी माणसे मला दिसतात. पण त्यांची आजची भूक कशी भागणार? हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. हे सौंदर्यच मला अंतर्मुख करते. दोघेही सृष्टीचे उपासक, एकाची दृष्टी सौंदर्यवादी तर दुसºयाची वास्तववादी. दोघांची हृदये करूणेने भारलेली. निसर्ग सौंदर्याच्या अनुभूतीची आस असणारी. दोघेही एका अर्थाने करूणेचीच गीते गातात. एकाच्या गाण्याला सौंदर्याचा ध्यास तर दुसऱ्याच्या गीताला वास्तवाची आस. सौंदर्य देखील अधिक समृद्ध होते ते वास्तवाने. वास्तवाने उभे राहिलेले सौंदर्य आणि सौंदर्याच्या अभिव्यक्तीतून प्रगटलेले वास्तव हे मानवी जीवनाला माधुर्यही देते आणि खरा रुढपणाही बहाल करते आणि मग ज्ञानदेवांनी भाषेला, विचारांना दिलेला रुढपणा. माधुर्याच्या अनुभूतीने ‘उचिता’ म्हणजे भलेपणाला प्राप्त होतो.

Web Title: adhytma- language beauty - expression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.