शिवसेनेचे खरे आमदार असाल तर योजनेला बाळासाहेबांचे नाव द्या- शशिकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:17 PM2021-10-19T22:17:41+5:302021-10-19T22:17:52+5:30

कोरेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिहे-कठापूर योजनेचे काम १९९७-९८ पासून सुरु झाले.

If you are a true MLA of Shiv Sena, name the scheme after Balasaheb Thackeray; NCP Leader Shashikant Shinde | शिवसेनेचे खरे आमदार असाल तर योजनेला बाळासाहेबांचे नाव द्या- शशिकांत शिंदे

शिवसेनेचे खरे आमदार असाल तर योजनेला बाळासाहेबांचे नाव द्या- शशिकांत शिंदे

googlenewsNext

कोरेगाव : ‘महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जिहे-कठापूर योजना मार्गी लागली. त्यासाठी ६३७ कोटी रुपयांचा निधी दिला. ६२१ कोटी रुपये खर्च झाले. लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव योजनेला देण्यापलीकडे भाजपने काही केले नाही. ज्यांना योजनाच माहिती नाही, कसला अभ्यास नाही, ते श्रेय घ्यायला निघाले आहेत. महाविकास आघाडीचा धर्म पाळत मी शांत राहिलो, मात्र  आता शांत बसणार नाही,’ असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कोरेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिहे-कठापूर योजनेचे काम १९९७-९८ पासून सुरु झाले. योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारे तेव्हा कोठे होते. त्यांना योजना नेमकी काय हे माहीत आहे का?, मुळात त्यांचा अभ्यासच नाही, दोन वर्षांपूर्वी केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असताना भाजपचे गुणगाण गाणाऱ्यांनी केंद्र सरकारकडून नेमका किती निधी आणला, हे कागदोपत्री सिद्ध करावे.  

शिंदे म्हणाले, ‘नाबार्डमधून कर्जरुपी एक पैसा आला नाही. भाजपचे तेव्हाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात येऊन गेले. योजनेचा केंद्र सरकारच्या योजनेत समावेश करतो, निधी आणतो, अशी वल्गना केली, मात्र एक रुपया देऊ शकले नाही. या योजनेचा केंद्रीय जल आयोगात अद्याप समावेश नाही. केवळ समावेशा बाबतचे पत्र राज्य सरकारने दिले आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. केवळ राज्य सरकारने आजवर निधी दिला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्रिपद पाच वर्षे भाजपकडे होते. त्यावेळी त्यांनी वाढीव निधी दिला नाही, जी योजनेसाठी मंजूर असते त्याप्रमाणे दरवर्षी तरतूद होऊन रक्कम वर्ग होते. ७० कोटी रुपयांच्या आसपास रक्कम असून, तेवढीच त्यांनी दिली, मात्र काहीजण उगाच श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना योजना नेमकी काय आहे, हे माहीत नाही.’

‘वास्तविक जिहे-कठापूर योजनेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह प्रमुख मंत्रिगण आणि नेतेमंडळींच्या उपस्थितीत करण्याचे ठरले होते. हे माहीत असताना श्रेय मिळाले पाहिजे, या संकुचितपणातून काहीजणांनी मंगळवारी सकाळीच जलपूजन कार्यक्रम उरकून घेतला.  महाविकास आघाडीचा प्रमुख घटक या नात्याने आघाडी धर्म म्हणून मी दोन वर्षे शांत राहिलो. आता जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यामुळे राष्ट्रवादीवर टिका करण्यापूर्वी या योजनेचा संपूर्ण अभ्यास करुन घ्यावा. अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल,’ असेही शशिकांत शिंदे म्हणाले.

किती निधी आणला हे सिद्ध करुन दाखवा-

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना भाजपचे गुणगान गाणाऱ्यांनी आणि शिवसेनेत असल्याने महाविकास आघाडीचे आहोत, असे दाखविणाऱ्यांनी केंद्र सरकारकडून किती निधी आणला, हे कागदोपत्री सिद्ध करून दाखवावे. स्वत:ला शिवसेनेचे आमदार म्हणवता, तर योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन दाखवा, असे आव्हान आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.

‘त्यांना’ संस्कृती दाखविण्याची वेळ-

याला दम दे..त्याच्याकडे बघून घेतो..त्यांनी दोन वर्षांत काय उद्योग केले, हे माहीत आहे. आम्ही टीका करीत नव्हतो, मात्र आता वेळ आली आहे. दोन वर्षांत त्यांनी काहीच केले नाही, त्यांचे काम लवकरच लोकांसमोर आणूनत्स त्यांचे काम नक्कीच काढू अशा इशाराही  शिंदे यांनी दिला आहे.  

कोणाला पोटात दुखण्याचे कारण नाही-

ज्यांनी कष्ट केले त्यांनी पाणी सुटल्यानंतर आनंद व्यक्त केला. त्यामध्ये कोणाला पोटात दुखण्याचे कारण नव्हते. १९९७ पासून जिहे-कठापूर योजनेचे काम सुरू आहे. खटावचे तत्कालीन आमदार भाऊसाहेब गुदगे, डॉ. दिलीप येळगावकर, आमदार जयकुमार गोरे व माझ्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी या योजनेसाठी योगदान दिले आहे. एका वर्षात काय ही योजना उभी राहिली नाही, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. 
 

Web Title: If you are a true MLA of Shiv Sena, name the scheme after Balasaheb Thackeray; NCP Leader Shashikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.