द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या मागणीसाठी 'स्वाभिमानी'चा चड्डी मोर्चा

By अशोक डोंबाळे | Published: June 8, 2023 06:33 PM2023-06-08T18:33:52+5:302023-06-08T18:34:07+5:30

२० जूनपर्यंत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Swabhimani march for the demands of grape and currant producers | द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या मागणीसाठी 'स्वाभिमानी'चा चड्डी मोर्चा

द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या मागणीसाठी 'स्वाभिमानी'चा चड्डी मोर्चा

googlenewsNext

सांगली: द्राक्ष उत्पादकांना एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना टनाला एक लाख रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर गुरुवारी चड्डी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी संचारबंदी असल्याचे सांगून मोर्चा रोखला. त्यानंतर आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत तळपत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, खाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन २० जूनपर्यंत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

सांगलीच्या विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे पालकमंत्री खाडे यांच्या घरावर मोर्चा काढू नये, अशी सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिली. त्यानुसार आंदोलकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला. चड्डी आणि बनियनवर शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले होते. द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले होते.

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आंदोलकांना २० जूनपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबरोबर बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच लेखी पत्र पालकमंत्री खाडे यांचे प्रतिनिधी मोहन व्हनखंडे यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्याकडे दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात संजय खोलखुंबे, भरत चौगुले, उमेश मुळे, संजय बेले, राजेंद्र माने, रावसाहेब पाटील, सूरज पाटील,  सुरेश वासगडे, राजेंद्र पाटील, श्रीधर उदगावे, सुरेश घागरे, अनिल वाघ, नागेश पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, नागेश खामकर, रोहित वारे, जगन्नाथ भोसले, भरत पाटील, विनायक पवार, शांतीनाथ लिंबेकाई आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होते.
 
पोलिसांकडून बळाचा वापर - महेश खराडे
महेश खराडे म्हणाले, जिल्ह्यात पोलिसी बळाचा वापर सुरू आहे. पोलिसांनी पालक मंत्र्याच्या घरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारून संचारबंदीचा आदेश लागू केला. कितीही दहशतीचा वापर केला, तरी द्राक्ष व बेदाणा उत्पादकांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. द्राक्ष उत्पादकाला एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना प्रतिटन एक लाख अनुदान मिळालेच पाहिजे. पालकमंत्री खाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार, असे आश्वासन दिले आहे. २० जूनपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार आहे.

Web Title: Swabhimani march for the demands of grape and currant producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.