अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरु, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ; महापुराची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 02:17 PM2022-08-10T14:17:56+5:302022-08-10T14:30:47+5:30

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने दिलासा

One and a half lakh cusecs of water will be released from Almaty dam | अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरु, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ; महापुराची धास्ती

अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरु, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ; महापुराची धास्ती

googlenewsNext

सांगली : सांगली, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. नद्यां-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सांगलीसह कोल्हापूरला पूरस्थिती गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरु होता. आज, बुधवारी सकाळी १० वाजता अलमट्टी धरण प्रशासनाने तो वाढवत आता दीड लाखावर नेला आहे. याबाबतचा अॅलर्ट त्यांनी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागास दिला आहे.

कृष्णेची पाणीपातळी नऊ फुटाने वाढली

शिराळा तालुक्यासह कोयना, वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. शिराळा तालुक्यात ७० मिलिमीटर, तर वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात १३० आणि कोयना धरण क्षेत्रात १७५ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. वारणा धरणातून ५६२८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेले असून कृष्णा दुथडी भरून वाहत आहे.

काल, मंगळवारी दिवसभरात वारणा धरण क्षेत्रात ३७, तर कोयना धरण क्षेत्रात ९२ मिलिमीटर पाऊस झाला. वारणा धरणात ३०.५३ टीएमसी पाणीसाठा असून ८९ टक्के धरण भरले आहे. यामुळे धरणातून पाच हजार ६२८ क्युसेकने विसर्ग होत आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कोयना धरण ७२ टक्के भरले आहे.

दोन लाख क्युसेकने विसर्ग सोडा

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. कोयना, वारणा, राधानगरी धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. यामुळे अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेकने सध्या विसर्ग केला तरच कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांचा महापूर टाळता येणार आहे. यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वारणा नदीकाठी महापुराची धास्ती

संततधार पावसामुळे वारणा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतांमध्ये शिरले असून वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील नदीकाठावरील लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने देण्यात आलेल्या आहेत.

गतवर्षी २३ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधित वारणा नदीला महापूर आला होता.  गतवर्षीच्या महापुरातून अद्याप अनेकजण सावरलेले नसताना आता पुन्हा  वारणेला पूर आल्याने नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने वारणा नदीला पूर आलेला आहे. मांगले, चिकुर्डे, कुंडलवाडीदरम्यान असणारे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणी शेतीमध्ये शिरले आहे.

चिकुर्डेत पुलावर पाणी

वाळवा तालुक्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच चांदाेली धरणातून पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने चिकुर्डे परिसरात वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. चिकुर्डे ते वारणानगर जुना पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.

Web Title: One and a half lakh cusecs of water will be released from Almaty dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.