राजकीय अस्तित्त्वासाठी वेगळा निर्णय घ्यावाच लागेल, कोकणातील शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 05:25 PM2022-08-10T17:25:20+5:302022-08-10T17:25:44+5:30

परंतु काहीही झाले तरी यापुढे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी अथवा काँग्रेससोबत जाणार नाही.

A different decision has to be taken for political survival, Warning of former Shiv Sena MLA Sadanand Chavan | राजकीय अस्तित्त्वासाठी वेगळा निर्णय घ्यावाच लागेल, कोकणातील शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला इशारा

राजकीय अस्तित्त्वासाठी वेगळा निर्णय घ्यावाच लागेल, कोकणातील शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला इशारा

Next

चिपळूण : गेली अडीच वर्षे पक्षाच्या कार्यक्रमाला असलो आणि नसलो तरी पक्षाला फरक पडत नाही, असेच पक्षश्रेष्ठी आपल्याशी वागत आहेत. पक्षासाठी होतं नव्हतं ते सर्व दिले. आता असह्य होत आहे. तेव्हा यापुढे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला वेगळा निर्णय घ्यावाच लागेल आणि आता ती वेळ आली आहे; परंतु काहीही झाले तरी यापुढे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी अथवा काँग्रेससोबत जाणार नाही. यापुढील निवडणुकादेखील आपल्या नेतृत्वाखाली होतील, असा इशाराच माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी येथे दिला.  

दोन दिवसांपूर्वी शहरातील हॉटेल अतिथी सभागृह येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत माजी आमदार चव्हाण यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. सत्कार समारंभात त्यांना वगळण्यात आले. गेल्या दहा वर्षांत शिवसेना मागे पडल्याचा आरोपही केला गेला. त्यामुळे चव्हाण समर्थक आक्रमक झाले आहेत. दुसऱ्याच दिवशी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन मंगळवारी क्रांती दिनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे बहादूरशेख नाका येथे बैठक झाली.

माजी आमदार चव्हाण म्हणाले की, लोकांना काय वाटतंय यासाठी ही बैठक आहे. गेल्या १८ वर्षांत आपण सांगितल्याशिवाय बैठक होत नव्हती; मात्र आपल्या पराभवानंतर अचानक बदल झाला आणि परस्पर बैठका होऊ लागल्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीचे आपल्याला निमंत्रण आले. आपण मुंबईत होतो. तरीही संघटनेची बैठक असल्याने आपण या बैठकीला हजर झालो. त्या बैठकीत तुमचं कर्तृत्व काय, असा उल्लेख केला गेला. यामुळे कर्तृत्व दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोला अप्रत्यक्षपणे आमदार भास्कर जाधव यांना लगावला.

शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनीही जोरदार भाषण केले. महापुरात ज्यांनी मदत केली, त्यांचे आभार मानण्यात काय चुकले; मात्र रात्री ११ वाजता आपण लावलेला बॅनर फाडण्यात आला, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. चिपळूण शहरात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे स्पष्ट करत सर्वांनी चव्हाणांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली. जोरदार घोषणा देत सर्वांनी सदानंद चव्हाण यांना पाठिंबा दिला. यावेळी उपजिल्हा प्रमुख शशिकांत चाळके, बाळकृष्ण जाधव, विनोद झगडे, अनंत पवार, सदानंद पवार, रश्मी गोखले, रेश्मा पवार, स्वाती देवळेकर, संतोष सुर्वे, सुभाष गुरव, रुपेश घाग, दिलीप चव्हाण, धनश्री शिंदे उपस्थित होत्या.

Web Title: A different decision has to be taken for political survival, Warning of former Shiv Sena MLA Sadanand Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.