उरणमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या राजकीय पक्षांच्या घोषणा हवेतच विरल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:11 PM2022-12-08T21:11:03+5:302022-12-08T21:11:34+5:30

राजकीय स्वार्थ व सत्तेसाठी भाजप, महाआघाडीच्या घटकपक्षांची पक्षनिष्ठा,तत्वांना तिलांजली

Political parties announcements of contesting elections on their own in Uran have vanished | उरणमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या राजकीय पक्षांच्या घोषणा हवेतच विरल्या

उरणमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या राजकीय पक्षांच्या घोषणा हवेतच विरल्या

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि सेना-शेकाप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आदी राजकीय पक्षांच्या एकत्रित येऊन महाआघाडीच्या माध्यमातून स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भाजप, महाआघाडीच्या घटकपक्षांनी पक्षनिष्ठा, तत्वांना तिलांजली दिली आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याऐवजी सत्ता हेच उद्दिष्ट ठेऊन वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये फायदेशीर ठरणाऱ्या शत्रू,मित्र अशा मिळेल त्या पक्षांशी युती, आघाडी करून निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत. या निवडणूकीत राजकीय आणि सत्ता स्वार्थासाठी एकत्र आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या युती, आघाडीमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे निवडणुकीत सरळ, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार हे नक्की झाले आहे.

उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यापासून चिन्ह वाटपाचेही सोपस्कार बुधवारी (७) पूर्ण झाले आहेत. घारापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य अशा आठ सदस्यांची याआधीच बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित पाणजे, डोंगरी, रानसई, पुनाडे, सारडे, नवीन शेवा, धुतुम, करळ-सावरखार, कळंबुसरे, बोकडवीरा, वशेणी, पागोटे, पिरकोन, जसखार, चिर्ले, भेंडखळ, नवघर आदी  १७ ग्रामपंचायतीच्या अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. या १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सरपंचपदासाठी ५३ तर १५१ सदस्यांसाठी ३७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

या १७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचा उमेदवार थेट जनतेतून निवडून येणार आहे. त्यामुळे निवडणुकीत ज्या पक्षाच्या सरपंच त्याच पक्षाची ग्रामपंचायतीवर सत्ता, वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.त्यामुळे थेट सरपंच निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भाजप आणि सेना-शेकाप-कॉग्रेस-राष्ट्रवादी आदी महाआघाडीच्या घटकपक्षांनी एकत्रित येऊन महाआघाडीच्या माध्यमातून स्वबळावर निवडणूका लढविण्याचा नारा दिला होता. मात्र स्वबळावर ग्रामपंचायतीची सत्ता येण्याची सुतराम शक्यता नसल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपसह महाआघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी पक्षनिष्ठा, तत्वांना तिलांजली देत गावपातळीवर सोयीप्रमाणे युती-आघाडी स्थापन केल्या आहेत.

काही ग्रामपंचायतींमध्ये तर सत्तेसाठी सेना- भाजप,तर काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपसोबत सेना-शेकाप-कॉग्रेस-राष्ट्रवादी आदी महाआघाडीचे घटक पक्ष एकत्रितपणे येऊन निवडणूक लढवित आहेत. राजकीय स्वार्थ आणि सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सोयीच्या राजकारणासाठी पक्षनिष्ठा,तत्वांना तिलांजली दिली आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याऐवजी सत्ता हेच उद्दिष्ट ठेऊन वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये फायदेशीर ठरणाऱ्या शत्रू, मित्र अशा मिळेल त्या राजकीय पक्षांशी युती, आघाडी करून निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत.त्यामुळे उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरळ, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार हे नक्की झाले आहे.

या राजकीय युती- आघाडीबाबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची मते जाणून घेतली असता स्वबळावर निवडणुका लढवल्या तरी ग्रामपंचायतीची सत्ता एकहाती स्थापन करणे अवघड आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी फायदा होईल अशा गावपातळीवरील स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांशी चर्चा करून गाव आघाडी करण्याची मुभा देण्यात आली असल्याच्या एक सारख्याच प्रतिक्रिया सेनेचे उरण तालुका अध्यक्ष (उद्धव ठाकरे गट) संतोष ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर,उरण तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे ,शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनोज भगत यांनी 'लोकमत'शी बोलताना दिल्या आहेत. 

तरुण उमेदवारांची संख्या सर्वाधिक 
उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी विविध राजकीय पक्षांचे ५३ तर १७ ग्रामपंचायतीच्या १५१ सदस्य पदासाठी ३७१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये युवकांची संख्या सर्वाधिक आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सुमारे ८० टक्के तरुण उमेदवार नशिब आजमावत आहेत. यामध्ये तरुण पुरुष-महिलांचाही समावेश आहे.

Web Title: Political parties announcements of contesting elections on their own in Uran have vanished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.