मुंबई-गोवा महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी २०० कोटी द्या, नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:25 PM2021-10-02T18:25:01+5:302021-10-02T18:25:23+5:30

Mumbai-Goa highway : पुणे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी खासदार तटकरे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. गडकरी यांच्या बरोबरची बैठक अतिशय चांगली झाली.

Pay Rs 200 crore for concreting of Mumbai-Goa highway, demand from Nitin Gadkari | मुंबई-गोवा महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी २०० कोटी द्या, नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

मुंबई-गोवा महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी २०० कोटी द्या, नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

Next

रायगड : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. तसेच पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण पावसामुळे उखडल्याने रस्ता खराब झाला आहे. यावर तोडगा म्हणून पहिल्या टप्प्याचे काँक्रिटीकरण करावे आणि त्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

पुणे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी खासदार तटकरे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. गडकरी यांच्या बरोबरची बैठक अतिशय चांगली झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत गडकरी यांच्याकडे सकारात्मक भूमिका मांडल्यानेच येत्या ५ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये गडकरी यांनी बैठक बोलविल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. या बैठकीत पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे काँक्रिटीकरण करणे हा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

काँक्रिटीकरण करताना जो रस्ता सुस्थितीत आहे, तो तसाच ठेवावा. खराब झालेला रस्ता आणि अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, तसेच यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत सातत्याने पळस्पे-इंदापूर मार्गावर खड्डे पडण्याची समस्या निकाली निघेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

इंदापूर ते परशुराम घाटाकडे जाणारा रस्ता आहे. त्यातील कशेडी घाटातील एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर सुशोभीकरण करावे. लोटे परशुराम एमआयडीसी क्षेत्र मोठे आहे. या ठिकाणी गुणाडे येथे अंडरपास रस्ता करणे गरजेचे आहे. त्यामुळे परिसरातील २५ गावांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याने तो करावा, अशीही मागणी तटकरे यांनी केली आहे.

गडकरी म्हणतात, मोबदल्याची रक्कम जास्त
इंदापूर ते झाराप या दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी जमिनीला चार पट मोबदला दिला जात आहे. या मोबदल्याची रक्कम खूप होते. त्याबाबत गडकरी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. याबाबतही ११ ऑक्टोबर राेजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्वतः मी या बैठकीला उपस्थित असणार आहोत. त्या बैठकीमध्ये भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pay Rs 200 crore for concreting of Mumbai-Goa highway, demand from Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.