अलिबागच्या कांद्याला स्वतःची ओळख, पेटंट विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 07:10 AM2022-07-24T07:10:02+5:302022-07-24T07:10:24+5:30

या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही १८८३ मधील कुलाबा गॅझेटमध्ये पाहायला मिळतात

Alibaug's Onion gets its own identity, patent department's proposal approved | अलिबागच्या कांद्याला स्वतःची ओळख, पेटंट विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी

अलिबागच्या कांद्याला स्वतःची ओळख, पेटंट विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्वतःची एक ओळख प्राप्त झाली आहे. केंद्राच्या पेटंट विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने पांढरा कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. बाजारात अलिबागचा पांढरा कांदा या नावाने विकल्या जाणाऱ्या अन्य कांदा विक्रीवर रोख लागणार आहे.  १५ जुलैच्या जिओग्राफिकल इंडिकेशन जर्नलमध्ये याबाबतचे पेटंट प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे अलिबागचा पांढरा कांदा हा देशात आपली स्वतःची ओळख निर्माण करणार आहे. 

या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही १८८३ मधील कुलाबा गॅझेटमध्ये पाहायला मिळतात. गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट रजिस्ट्रार कार्यालयात पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. यावेळी कृषी विद्यापीठाच्या भौगोलिक निर्देशांक विभागाचे प्रमुख जितेंद्र कदम आणि आत्माचे कल्पेश पाटील आणि जीएमजीसीचे प्रमुख गणेश हिंगमिरे आणि शेतकरी उत्पादक संघाचे शेतकरी सदस्य उपस्थित होते.  या बैठकीत अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन देण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे पेटंट १५ जुलैच्या केंद्राच्या जिओग्राफिकल इंडिकेशन जनरल नंबर १५८ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

अलिबागच्या पांढरा कांद्याच्या नावाने वेगळा कांदा विकला जात होता, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती. कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. याकरिता कृषी विभाग,  कोकण कृषी विद्यापीठ,  ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात यासाठी एक करार केला होता.

पांढरा कांदा हा औषधी आणि गुणकारी आहे. तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, वाडगाव, सागाव, तळवली, वाडगाव, वेश्वी या गावात लागवड केली जाते. भात कापणी झाल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून अडीचशे हेक्टर जमिनीवर कांद्याची लागवड केली जाते. 

अलिबागमधील शेतकऱ्यांसाठी हा खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे. भौगोलिक मानांकनामुळे अलिबागच्या नावाने इतर पांढऱ्या कांद्याची जी राज्यात विक्री केली जाते,  आता त्यास आळा बसू शकेल. कृषी विभागामार्फत आगामी काळात पांढरा कांद्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातील, लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाईल. 
 - डी. एस. काळभोर, 
कृषी उपसंचालक रायगड

पूर्वापार शेतात आम्ही पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेत आहोत. आजही कांद्याची चव आणि गुणवत्ता आम्ही टिकून ठेवली आहे. आमच्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले, याचा आनंद आहे. त्यामुळे आमच्या कांद्याला मागणी वाढून भावही मिळेल. कांद्याचे उत्पादन वाढीसाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. 
 - गणेश पाटील, शेतकरी

Web Title: Alibaug's Onion gets its own identity, patent department's proposal approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.