शाळकरी मुले ‘व्हेप’च्या नशेत; तुमची मुले तर आहारी गेली नाहीत ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:32 AM2023-03-31T10:32:07+5:302023-03-31T10:34:10+5:30

बंदी असतानाही बाजारात सहजतेने उपलब्ध होणारे हे व्हेप ‘मेड इन चायना’ असल्याचेही दिसून येत आहे...

School children intoxicated by 'vape'; Your children are not addicted, are they | शाळकरी मुले ‘व्हेप’च्या नशेत; तुमची मुले तर आहारी गेली नाहीत ना?

शाळकरी मुले ‘व्हेप’च्या नशेत; तुमची मुले तर आहारी गेली नाहीत ना?

googlenewsNext

- नम्रता फडणीस

पुणे : सिगारेट ओढण्याची इच्छा असलेले लोक हल्ली 'व्हेप'चा वापर करताना दिसत आहेत. तरुणाईबरोबरच आता शाळकरी मुलांनाही ‘व्हेप’ ओढण्याचे व्यसन जडले आहे. मुले बाथरूममध्ये जाऊन व्हेपिंग करताना आढळल्याचे शाळेच्या एका ओरिएंटेशन प्रोग्रॅममध्ये सांगण्यात आले आणि पालकांचे धाबे दणाणले.

बंदी असतानाही बाजारात सहजतेने उपलब्ध होणारे हे व्हेप ‘मेड इन चायना’ असल्याचेही दिसून येत आहे. निम्म्यापेक्षा अधिक पालकांना 'व्हेपिंग’ म्हणजे काय हेच माहिती नव्हते. ऑनलाइनसह शहरातील बहुतेक सर्वच पानटपऱ्या आणि दुकानांमध्ये अगदी सहजतेने हे व्हेप मिळते. सर्रासपणे विक्री होत असल्याने मुलांना ते सहज उपलब्ध होत आहे.

आराेग्याशी ‘खेळ’ :

व्हेप ओढण्याचा थेट परिणाम फुप्फुसांवर होताे. त्यामुळे एक प्रकारे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपला मुलगा-मुलगी व्हेपिंगच्या आहारी तर गेला नाही ना? याची चाचपणी करून त्यांना यातून बाहेर काढणे हेच पालकांसमोरील मोठे आव्हान बनले आहे.

अशी वळली पावले...

किशोरवयीन वय हे अल्लड असल्याने मुला-मुलींमध्ये चांगले-वाईट उमजण्याची बौद्धिक कुवत फारशी नसते. नवनवीन गोष्टी करून पाहण्याची जिद्द्, मित्रमंडळींकडून विशिष्ट गोष्ट करण्यासाठी दिली जाणारी चॅलेंजेस यामुळे मुलांची पावले चुकीच्या दिशेने पडताना दिसतात. यातच कोरोना काळापासून मुले मोबाइलच्या आहारी गेल्यामुळे पालक आणि मुलांमध्ये विसंवादाची दरी निर्माण झाली आहे. अल्लड वयात मोबाइल हातात पडल्याने माहितीचे महाजाल खुले झाले आहे. नोकरीमुळे पालक घराबाहेर राहत असल्याने मुले शाळेत किंवा घरात काय करतात याकडे पालकांचे दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा शाळकरी मुलांकडून घेतला जात आहे. व्हेप ओढणे हा त्याचाच एक भाग आहे, असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

बंदी कागदावरच :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०१९ मध्ये ई-सिगारेट व व्हेपचे उत्पादन करण्यासह आयात-निर्यात, विक्रीवर बंदी घातली आहे. तरी परदेशात वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या ई-सिगारेट व व्हेप भारतात बेकायदा आयात करून त्याची विक्री सुरू आहे.

व्हेप म्हणजे काय?

- ई-सिगारेट किंवा व्हेप पेन हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे द्रवपदार्थांचे पॉड गरम करून ते वाफेमध्ये परावर्तित करते.

- ज्यात निकोटीन, वेगवेगळे फ्लेवर्स आणि इतर पदार्थ असतात. ई-सिगारेटचा वापर धूम्रपान करण्यासाठी अधिक केला जातो.

आई व मुलाचा संवाद...

आई : शाळेत खरंच मुले व्हेप ओढतात का?

मुलगा : हो

आई : व्हेपिंग म्हणजे काय रे?

मुलगा : ते एक उपकरण आहे, ज्यात द्रव्य पदार्थ (लिक्विड) असतो. अनेक फ्लेव्हर्सदेखील उपलब्ध आहेत. ते ओढले की त्यातून वाफ बाहेर येते.

आई : तू ओढले आहेस का?

मुलगा : हो, पण मला आवडले नाही. मी बंद केले.

आई : कुठून मिळाले?

मुलगा : एका दुकानातून आणल्याचे मित्र म्हणाला.

आई : इतक्या लहान मुलाला दिले जाते, वय विचारत नाहीत का?

मुलगा : अगं, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही.

आई : त्यातून काय आनंद मिळतो?

मुलगा : मोठी लोकं जशी सिगारेट पितात तसेच करून पाहण्यासाठी... बाकी काही नाही.

ई-सिगारेट व व्हेपिंगचे दुष्परिणाम काय? :

- ई-सिगारेट किंवा व्हेपचे सेवन केल्यामुळे डिप्रेशन येऊ शकते.

- ई-सिगारेटचे व्यसन करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

- सेवन करण्याचे प्रमाण अधिक असेल तर रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्याही उद्भवू शकते.

- ई-सिगारेटमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचे घातक रसायन असते, जे लहान मुले आणि तरुण दोघांसाठी हानिकारक असते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

- ई-सिगारेटमध्ये कार्सिनोजेनिक घटक आढळतात. निकोटीन असते, ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.

- काेणी सतत वापर करत असेल तर त्याचे वाईट व्यसनात रूपांतर होते. व्हेपिंगचा परिणाम आपल्या फुप्फुसावर होतो आणि त्यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो.

- सतत खोकला येणे, फुप्फुसाला दुखापत, आदी लक्षणे दिसतात.

व्हेप आणि ई-सिगारेटमधील फरक?

‘व्हेप’ला चार्जिंग करण्याची सोय आहे. व्हेपमधला एकदा फ्लेव्हर संपला की ते फेकून द्यावे लागते. ई-सिगारेट मात्र पुन्हा रिफील करता येते. व्हेपची किंमत ४०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत असते, तर ई-सिगारेट १००० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंत उपलब्ध होते.

व्हेप हे ई-सिगारेटसारखेच असते. ई-सिगारेटमध्ये ग्लायकोल नावाचे घातक रसायन तसेच निकोटीन असते. ई-सिगारेट ओढणाऱ्यांना नंतर साधी सिगारेट ओढण्याचे व्यसन लागते. अल्पवयीन वयात मुले व्हेपिंग करत असतील तर त्यांच्या आरोग्यासाठी हे घातक आहे. फुप्फुसासंबंधी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. फुप्फुसाला सूज येऊन ती निकामी होऊ शकतात. व्हेपिंगमुळे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. मुलांमधील व्हेपिंगचे प्रमाण रोखण्यासाठी कायदेशीर कडक पावले उचलणे आवश्यक आहे.

- डॉ. नितीन अभ्यंकर, प्रसिद्ध फुप्फुसरोग तज्ज्ञ

Web Title: School children intoxicated by 'vape'; Your children are not addicted, are they

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.