नगाबाई लाटकरची झाली सुलोचनादीदी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:29 AM2023-06-05T08:29:37+5:302023-06-05T08:34:09+5:30

कोल्हापूरच्या चित्रनगरीतून श्रीगणेशा करून मुंबईच्या चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुलोचनादीदींच्या बालपणीच्या आठवणींना बंडा सरदार यांनी उजाळा दिला...

Nagabai Latkar became Sulochnadidi Veteran actor Sulochana dies at 94 pune | नगाबाई लाटकरची झाली सुलोचनादीदी...

नगाबाई लाटकरची झाली सुलोचनादीदी...

googlenewsNext

पुणे : निपाणीजवळ चिकोडीतलं खडकलाट हे सुलोचनादीदींचं मूळ गाव. त्यांचं पाळण्यातलं नाव नगाबाई. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची आवड होती आणि पुढे त्यांनी त्याच क्षेत्रात करिअर घडवत गावाचं नावही रोशन केलं, अशी आठवण खडकलाटचे रहिवासी कमलाकर ऊर्फ बंडा सरदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. कोल्हापूरच्या चित्रनगरीतून श्रीगणेशा करून मुंबईच्या चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुलोचनादीदींच्या बालपणीच्या आठवणींना बंडा सरदार यांनी उजाळा दिला.

सुलोचनादीदींचं प्राथमिक शिक्षण खडकलाटच्या श्री संताजी विद्यामंदिर इथं झालं. प्लेगची साथ आल्यामुळं त्यांचं कुटुंब खडकलाट सोडून चिकोडीला राहायला गेलं. तिथं भालजी पेंढारकरांच्या परिचयाच्या एका गृहस्थांच्या घरात ते राहू लागले. परिचय झाल्यावर या गृहस्थांनी एक दिवस भालजींना ‘ही मुलगी चुणचुणीत आहे, चित्रपटात घेता येईल का बघा,’ असं सांगितलं. भालजींसोबत एक-दोन भेटीही झाल्या; पण दीदींना चित्रपटाच्या क्षेत्रात आणण्याचं श्रेय जातं ते दीदींच्या आत्या बनाबाई यांच्याकडे. त्यानंतर घडलेला इतिहास आपल्या समोर आहे.

गावासाठी नाव बदललं

सुलोचनादीदींचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं आडनाव कलावंत होतं. पण, पुढे त्यांनी ते बदलून लाटकर असं करून घेतलं. त्यांच्या आडनावाच्या रूपानं खडकलाट गावाचं नावही जगभरात पोहोचलं.

गावाला दरवर्षी भेट

खडकलाट गावात दरवर्षी गैबीपीराचा उरुस होतो. त्याला दीदी आवर्जून हजेरी लावायच्या. गावी आल्या की दोन-तीन दिवस मुक्काम करायच्या. त्यांच्या बालपणीच्या मित्र-मैत्रिणी, गावातले जुनेजाणते यांना भेटायच्या, त्यांची विचारपूस करायच्या. प्रत्येकाचं उत्तम आदरातिथ्य करायच्या. गावाचा त्यांना आणि त्यांचा गावाला लळा लागला होता.

बैलगाडा शर्यतीची आवड

दीदींना बैलगाडा शर्यतीची भारी आवड होती. त्यांचा स्वत:चा एक गाडा प्रत्येक शर्यतीत असायचा. तो गाडा प्रत्येक मैदानात पहिला नंबर मारायचा. त्या गाड्याच्या बैलांवर त्यांचं इतकं प्रेम होतं की त्यांनी त्या बैलांना विमानाने दिल्लीपर्यंत नेलं होतं.

Web Title: Nagabai Latkar became Sulochnadidi Veteran actor Sulochana dies at 94 pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.