Rialway | उन्हाळी सुट्यांचे नियोजन करताय? 'समर स्पेशल' गाड्यांच्या माध्यमातून होणार ९८ फेऱ्या

By नितीश गोवंडे | Published: March 30, 2023 06:07 PM2023-03-30T18:07:51+5:302023-03-30T18:09:33+5:30

५ उन्हाळी विशेष रेल्वेंच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या ९८ फेऱ्या...

indian railway Planning a vacation 98 trips will be made through five summer special trains | Rialway | उन्हाळी सुट्यांचे नियोजन करताय? 'समर स्पेशल' गाड्यांच्या माध्यमातून होणार ९८ फेऱ्या

Rialway | उन्हाळी सुट्यांचे नियोजन करताय? 'समर स्पेशल' गाड्यांच्या माध्यमातून होणार ९८ फेऱ्या

googlenewsNext

पुणे : एकीकडे उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रेल्वे रिझर्वेशन फुल्ल झालेले असताना, मध्य रेल्वेच्या वतीने ९८ उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. यासंबंधीचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, लोक आधीपासूनच रेल्वेचे तिकीट रिझर्वेशन करतात. त्यामुळे नुकत्याच प्लॅन ठरलेल्या नागरिकांसह अन्य नागरिकांना रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातून उन्हाळ्यात प्रामुख्याने प्रवासी तिरूपती, गोवा, केरळ, कर्नाटक, जम्मू यासह आपापल्या मूळ गावी जातात. दरवेळी तिकीट न मिळाल्याने अनेकांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जास्त पैसे खर्च करून दुसऱ्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो, अनेकांना तर सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा बेत रद्द देखील करावा लागतो.

मध्य रेल्वे ५ उन्हाळी स्पेशल रेल्वेच्या माध्यमातून ज्या १०० फेऱ्या चालवणार आहे, त्याचा तपशील असा..

१) पुणे - सावंतवाडी रोड स्पेशल (२० फेऱ्या) रेल्वे नं. ०१२११ ही विशेष रेल्वे पुण्याहून २ एप्रिल ते ४ जून दरम्यान दर रविवारी रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे दहाच्या सुमारास सावंतवाडी रोडला पोहोचेल. तर रेल्वे नं. ०१२१२ ही विशेष रेल्वे ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर बुधवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १२ च्या सुमारास पुण्याला पोहोचेल. ही रेल्वे लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.

२) पनवेल - करमाळी (गोवा) स्पेशल (१८ फेऱ्या) रेल्वे नं. ०१२१३ ही विशेष रेल्वे पनवेल येथून ३ एप्रिल ते ५ जून दरम्यान दर सोमवारी रात्री साडे नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास करमाळी (गोवा) येथे पोहोचेल. तर रेल्वे नं. ०१२१४ ही विशेष रेल्वे ४ एप्रिल ते ६ जून दरम्यान दर मंगळवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास करमाळी (गोवा) येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास पनवेल येथे पोहोचेल. ही रेल्वे रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबेल.

३) पनवेल - सावंतवाडी रोड स्पेशल (२० फेऱ्या) रेल्वे नं. ०१२१५ ही विशेष रेल्वे पनवेल येथून ४ एप्रिल ते ६ जून दरम्यान दर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता पनवेल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे नऊच्या सुमारास सावंतवाडी रोडला पोहोचेल. तर रेल्वे नं. ०१२१६ विशेष रेल्वे ३ एप्रिल ते ५ जून दरम्यान दर सोमवारी सावंतवाडी रोडवरून सकाळी १० वाजून १० मिनीटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री पावणे नऊच्या सुमारास पनवेलला पोहोचेल. ही रेल्वे रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपलूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.

४) लोकमान्य टिळक टर्मिनस - कन्याकुमारी (१८ फेऱ्या) रेल्वे नं. ०१४६३ विशेष रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ एप्रिल ते १ १ जून या कालावधीत दर गुरुवारी दुपारी चार वाजता एलटीटी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास कन्याकुमारी येथे पोहोचेल. तर रेल्वे नं. ०१४६४ विशेष रेल्वे कन्याकुमारी येथून ८ एप्रिल ते ३ जून दरम्यान दर शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास एलटीटी ला पोहोचेल. दरम्यान ही रेल्वे
ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव (गोवा), कारवार, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टावला चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, नागरकोइल जंक्शन ला थांबेल.

५) पुणे - अजनी स्पेशल (२२ फेऱ्या) रेल्वे नं. ०११८९ विशेष रेल्वे पुणे येथून ५ एप्रिल ते १४ जून दरम्यान दर बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाचच्या सुमारास अजनी येथे पोहोचेल. तर रेल्वे नं. ०११९० विशेष रेल्वे ६ एप्रिल ते १५ जून या दरम्यान दर गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अजनी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकराच्या सुमारास पुण्याला पोहोचेल. ही रेल्वे दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेचे बुकिंग ३१ मार्च पासून सुरू होईल, अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

Web Title: indian railway Planning a vacation 98 trips will be made through five summer special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.