अपघाताच्या एक दिवसआधी विनायक मेटेंनी व्यक्त केली होती एक अपेक्षा; काय म्हटलं होतं, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 10:19 AM2022-08-15T10:19:52+5:302022-08-15T10:29:23+5:30

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते.

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातण बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विनायक मेटे यांच्या निधानाने सर्वांना धक्काच बसला. अपघाताच्या एक दिवसाआधीच विनायक मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधत एक अपेक्षा बोलावून दाखवली होती. महायुती सरकारच्या काळात भाजपाने रासप. रिपाइं, शेतकरी संघटनेला मंत्रिपद दिले. मात्र शिवसंग्रामला दिलेला शब्द ते पाळू शकले नाहीत. परंतु याचा अर्थ भाजपा मित्रपक्षांना संपवत आहे, असं म्हणता येणार नसल्याचं विनायक मेटेंनी सांगितलं.

आता राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आलं आहे. अडीच वर्षाच्या काळात शिवसंग्रामला दिलेला शब्द ते पाळतील, याबद्दल तीळमात्र शंका नाही, असा विश्वास विनायक मेटे यांनी माध्यमांशी बोलताना १३ ऑगस्ट रोजी व्यक्त केला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला येत होते. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मेटे यांच्या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या कंटेनरला गाडीने धडक दिली. चालकाच्या मागील सीटवर बसलेले मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर बराच काळ ते घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. अखेर पोलिसांना माहिती मिळताच एका रुग्णवाहिकेतून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आणले. अपघातात मेटे यांचे अंगरक्षक राम ढोबळे हेही गंभीर जखमी झाले असून, चालक एकनाथ कदम याला किरकोळ इजा झाली.

सामान्य शेतकरी कुटुंबातील विनायक मेटे यांनी मराठा महासंघातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिवसंग्रामची स्थापना करून मराठा आरक्षण चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सलग पाच वेळा विधानपरिषदेत आमदार म्हणून कर्तृत्व गाजविले. मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्नांवर ते झगडत राहिले होते. विनायक मेटे यांना अंतिम निरोप देण्यासाठी राज्यभरातून समर्थक बीडमध्ये दाखल झाले आहेत.शिवसंग्राम भवन येथे अंतिम दर्शनासाठी गर्दी झाली आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ,रामदास आठवले यांचा दौरा निश्चित आहे. मात्र, ऐनवेळी काही मंत्री, आमदार येण्याची शक्यता आहे.