पुण्यातील नोकरी सोडली, गावातच समृद्धी शोधली; रोपवाटिकेतून साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 02:56 PM2022-12-09T14:56:09+5:302022-12-09T15:02:32+5:30

तेलगावच्या सुचित ठाकरेची यशोगाथा

Nagpur's suchit thakre start vegetable nursery by quitting his job and got financial upliftment | पुण्यातील नोकरी सोडली, गावातच समृद्धी शोधली; रोपवाटिकेतून साधली प्रगती

पुण्यातील नोकरी सोडली, गावातच समृद्धी शोधली; रोपवाटिकेतून साधली प्रगती

googlenewsNext

विजय नागपुरे

कळमेश्वर (नागपूर) : पदवीचे शिक्षण झाल्यानंतर गाव सोडून महानगरात नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या गत दशकभरात वाढली आहे; मात्र आपल्या गावातच समृद्धी शोधण्याचा संकल्प कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव येथील सुचित ठाकरे याने केला. तो वास्तवातही साकारला.

कळमेश्वर तालुक्यात कपाशी, तूर, सोयाबीनसह भाजीपाल्याचे सुद्धा उत्पादन घेतले जाते; मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून रोपे आणावी लागत होती. यासाठी अधिकचा खर्च करावा लागत होता. या संधीचे सोने करायचे सुचित ठाकरे याने ठरविले. त्याने भाजीपाला रोपवाटिका उभारून आपली आर्थिक उन्नती साधली आहे.

बी.ए. (संगीत) शिक्षण झालेल्या ठाकरे याने पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. सोबतच संगीत शिक्षक म्हणून पार्टटाइम काम करून चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वतःकडे असलेल्या ४ एकर शेतीमध्ये नवीन काहीतरी करू या जिद्दीने कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाचा शोध घेताना रोपवाटिका हा नवीन पर्याय त्याला मिळाला. शासकीय योजनेचा लाभ घेत गावातच रोजगार शोधावा असा विचार करून त्याने पुणे सोडत गाव गाठले. तालुक्यातील भाजीपाला उत्पादकांची गरज लक्षात घेता रोपे तयार करून विकण्याचे ठरविले.

याकरिता तालुका कृषी कार्यालयासोबत संपर्क साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून शेडनेट उभारण्याचा निर्णय घेत एक वर्षाच्या अगोदर कृतीत उतरविला.

८ लाख रोपे तयार केली

सुचित याने आतापर्यंत मिरची, टोमॅटो, सिमला मिरची, वांगी, टरबूज, फुलकोबी, पत्ताकोबीची ८ लाख ४० हजारांवर रोपे तयार करून विकली आहेत. यातून त्याला आतापर्यंत शेडनेट, मजुरी, बी बियाणे आदीचा खर्च वजा जाता ३ लाख २५ हजार रुपयांचा नफा झालेला आहे.

पांढुर्णा, सौंसरहून मागणी

रोपवाटिकेतील रोपांचा दर्जा चांगला असल्याने कळमेश्वर, काटोल, सावनेर तालुका तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा व सौंसर येथूनही शेतकरी स्वतः रोपे तयार करण्यासाठी ऑर्डर बुक करतात. यासोबतच त्यांनी गावातील सात ते आठ महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. सध्या कांद्याचे रोप तयार करण्यासाठी सहा किलो बियाणांची लागवड करण्यात आली आहे. रोपवाटिकेसाठी तालुका कृषी अधिकारी राकेश वसु, कृषी सहायक रोशन नान्हे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांसह फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. त्यामुळे दूरवरून रोपे विकत आणण्यापेक्षा परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेचा लाभ दिला आहे.

राकेश वसू, तालुका कृषी अधिकारी, कळमेश्वर

Web Title: Nagpur's suchit thakre start vegetable nursery by quitting his job and got financial upliftment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.