झाडीपट्टीत यंदा झगमगाट, कलावंतांचे चेहरे उजळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:27 AM2021-10-27T05:27:01+5:302021-10-27T05:28:27+5:30

Chandrapur : नाटकांचा काळ दिवाळीपासून सुरू होऊन होळीपर्यंत चालतो. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या चार प्रमुख जिल्ह्यांतील बहुतेक गावांत मंडईचे आयोजन होते.

This year, the faces of the artists shone brightly in the bushes in Chandrapur | झाडीपट्टीत यंदा झगमगाट, कलावंतांचे चेहरे उजळले

झाडीपट्टीत यंदा झगमगाट, कलावंतांचे चेहरे उजळले

Next

- घनश्याम नवघडे

नागभीड (जि. चंद्रपूर) : झाडीत पुन्हा लगबग सुरू झाली आहे. नाट्य संस्थांच्या कार्यालयांची कुलुपं उघडली आहेत. नाटकांच्या स्क्रिप्टवरील धूळ झटकली गेली आहे. कोपऱ्यात बांधून ठेवलेली वाद्ये बाहेर निघाली आहेत. नाटकं बूक होऊ लागली आहेत. तालमी सुरू झाल्या आहेत. कलावंतांचे चेहरे उजळले आहेत. झाडीपट्टी पुन्हा नव्या जोमानं कलाविष्कारासाठी सज्ज झाली आहे.

कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगावर लादण्यात आलेल्या मर्यादा उठविण्यात आल्याने अवघी झाडीपट्टी रंगभूमी आनंदली आहे. सुमारे ५० कोटींच्या उलाढालीस चालना मिळणार असल्याने दोन वर्षांपासून तंगीत असणाऱ्या कलावंतांना यंदा चांगले दिवस दिसतील. मुंबई - पुण्यातील कलावंतांनाही आधार होईल. नाटक हा झाटीपट्टीचा अविभाज्य घटक आहे. ‘ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही’ ही म्हण गेल्या काही वर्षांत झाडीपट्टीत रूढ झाली आहे.

नाटकांचा काळ दिवाळीपासून सुरू होऊन होळीपर्यंत चालतो. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या चार प्रमुख जिल्ह्यांतील बहुतेक गावांत मंडईचे आयोजन होते. अलिकडे नागपूर व वर्धा जिल्ह्यातही नाटकांचे आयोजन सुरू झाले आहे. एवढेच कशाला, झाडीपट्टीची जादू शेजारच्या आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यातही दिसायला लागली आहे. झाडीच्या चार जिल्ह्यांत जवळपास ५५ नाटक कंपन्या आहेत. एक कंपनी एका नाट्यप्रयोगासाठी ५५ ते ६० हजार रुपये शुल्क आकारते. होळीपर्यंत अडीच हजारावर प्रयोग होतात.

यांनाही रोजगार 
नाट्य कलावंत, निर्माते, वेशभूषाकार, ध्वनी व प्रकाश संयोजक, हार्मोनियम, तबला, क्लाटवादक व इतर संबंधितांना अर्थप्राप्ती होतेच. 
नाटकासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना चणे, फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे, चहा-पाणी विकून उपजीविका चालविणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांनाही रोजगार मिळेल.

झाडीपट्टी रंगभूमी मुळातच श्रीमंत असली तरी कलाकार मात्र गरीब आहेत. कोरोना आपत्तीमुळे अनेक कलाकारांना विविध संकटांना तोंड द्यावे लागले. आता नाट्यप्रयोगांना परवानगी मिळाल्याने पूर्वीचे गतवैभव प्राप्त होईल.
- सदानंद बोरकर, लेखक-निर्माता, नवरगाव


शासनाने ठरवून दिलेल्या अटींचा झाडीपट्टी महामंडळ आदर करते. मात्र, खेड्यापाड्यात नाटकांना परवानगी देताना अडथळे निर्माण करू नयेत. गेली दोन वर्षे बंदी असल्याने अनेक कलाकारांचे हाल झाले. आता निश्चित बरे दिवस येतील.
- अनिरुद्ध वनकर, अध्यक्ष, झाडीपट्टी मंडळ

Web Title: This year, the faces of the artists shone brightly in the bushes in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.