८४ वर्षापूर्वी भीमरायाच्या स्पर्शाने गावातील ‘त्या’ विहिरीचे पाणी झाले चवदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 05:41 AM2022-12-06T05:41:53+5:302022-12-06T05:42:38+5:30

वाघळी येथे उभारणार महामानवाचे स्मारक : ८४ वर्षांपूर्वी मुक्कामी थांबले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

84 years ago, Dr Bhimrao Ambedkar Stay in Wagholi Village at Jalgaon | ८४ वर्षापूर्वी भीमरायाच्या स्पर्शाने गावातील ‘त्या’ विहिरीचे पाणी झाले चवदार

८४ वर्षापूर्वी भीमरायाच्या स्पर्शाने गावातील ‘त्या’ विहिरीचे पाणी झाले चवदार

googlenewsNext

जिजाबराव वाघ

चाळीसगाव(जि. जळगाव) : तारीख होती १७, १८ व १९ जून १९३८. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खान्देश दौऱ्यावर असताना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या गावी ते मुक्कामी थांबले. या गावातील एका विहिरीचे पाणी ते प्यायले. महामानवाच्या त्या स्मृती जपण्यासाठी चाळीसगाव पंचायत समितीने त्या विहिरीसह  त्यांनी मुक्काम केलेल्या खोलीचे पुनरुज्जीवन करून स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खान्देशवासीयांशी विशेष ऋणानुबंध होते. धुळे न्यायालयात ते कोर्टकज्ज्यांच्या कामासाठी येत. १९३८ मध्ये खान्देशचे पहिले आमदार डी. जी. जाधव यांच्या प्रचारासाठी ते वाघळी येथे आले होते. येथे त्यांनी मुक्कामही केला होता. 
 खान्देश दौऱ्यावर  ते जाधवांकडे मुक्कामी थांबले.  चौकातील विहिरीचे पाणी ते प्यायले. वाघळी येथील भेटीत त्यांनी गावची चावडी, प्राथमिक शाळा, शिक्षणाचा आढावा घेतला होता. एका खोलीत ते थांबले होते. याच खोलीचे व विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहेे. 

पहिल्या टप्प्यात विहिरीतील गाळ उपसून तिचे बांधकाम केले जाणार आहे. ज्या खोलीत डाॅ. बाबासाहेब मुक्कामी होते, तिचेही बांधकाम करण्यात येणार आहे.

पाच ते सात लाखांचा निधी
वित्त आयोगाच्या निधीतून दीड लाखाची तरतूद करण्यात आली आहे. स्मारकासाठी ५ ते ७ लाखांचा निधी लागणार आहे. हा निधी लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. 

बाबासाहेब वाघळी येथे आले होते, त्यावेळी मी आठ वर्षांची होते. बाबासाहेबांना लिंबाच्या झाडाखाली खाट टाकून बसविण्यात आले. रात्री ते मुक्कामी होते. विहिरीचे पाणी प्यायले. - पार्वताबाई जाधव, वाघळी

वाघळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट अविस्मरणीय आहे. या स्मृती चिरंतन राहाव्यात, यासाठी स्मारक उभारले जाणार आहे. विहिरीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरूही झाले आहे. - नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी

Web Title: 84 years ago, Dr Bhimrao Ambedkar Stay in Wagholi Village at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.